अ.भा.शेतकरी साहित्य चळवळीच्या विश्वस्तरीय ऑनलाइन् काव्य लेखन स्पर्धेत दुर्गापूर ता राहता येथील ग्रामीण साहित्यिक कवी यशवंत पुलाटे यांच्या “बळीनामा” या कवितेस द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. देश विदेशातून बहुसंख्य कवी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
या स्पर्धेत आपल्या साहित्यातून नगरी बोली व संस्कृतीचा सन्मान करणारे पुलाटे यांनी बळीनामा या त्यांच्या कवितेतून द्रष्टे पणाने वीस वर्षांपूर्वी स्वसंरक्षणार्थ कुणब्यांच्या काळजाची एक पेठ व्हावी ही अपेक्षा व्यक्त केली होती. ती आज कुणबी आरक्षणासाठी सर्व कुणबी वाटेत एक झाल्याचे चित्र पहावयास मिळते. एक काल सुसंगत कविता असेच तिचे वर्णन करता येईल. शेतकऱ्याचा तत्वनिष्ठ भूतकाळ सत्वनिष्ठ वर्तमानकाळ व समृद्ध अस्तित्वाचा आशावादी भविष्यकाळ असे वास्तव चित्रण या कवितेत आले आहे. त्यामुळे ही कविता निवडली गेली.हा सन्मान दुर्गापूर गावाचा प्रवरा परिवाराचा व सर्व नगरी कुणब्यांचा असल्याची भावना पुलाटे यांनी व्यक्त केली. त्यांचे परिसरातून जिल्ह्यातून त्यासाठी कौतुक अभिनंदन होत आहे.
पुरस्कार प्राप्त कविता पुढे देत आहे….
बळीनामा…
बळीराजा तुझं बळ
कोणा कुळान गिळल ;
तुझी वळचणीची दैना
येड्या कोण रे टाळील ?
सोस सोसले उन्हाळे
झाला पाठीचा कातळ ;
तरी तुझ्या सपनात
उगा सारी उष्टावळ.
भेगलेल सुख सदा
त्याची कर सांध मोड ;
उगा रुताडाच्या भेनं
नको करू तडजोड.
तुझी जात शेषशाही
तिन हालव प्रिथवी
बांडगुळाना विचार
अशी पिढी ही कितवी ?
तुझा नेता बळीराम
धारी त्याच्या बळीरामा ;
वामनाना समजू दे
तुझा खरा बळीनामा.
दिस वैऱ्याचे होऊन
तुझ्या पेडी धडकती ;
तरी जागा होऊनिया
आता कर एकमती.
येवो एखादा बळीव
बुडो सारी दुःख बेटं ;
कुणब्याच्या काळजांची
देवा होवो एक पेठ.
इडा पिडा ही टळेल
राज्य बळीचे कळेल ;
फक्त हिरव्या धांदित
सारी वंसळ बळेल.
साता जन्माचा हा ठेवा
मरणा आधीच गळेल ;
माझ्या हिरव्या बांडाचे
तेव्हा पारणे फिटेल.
— रचना : यशवंत पुलाटे.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800