आई बाबा होणे हे प्रत्येक जोडप्याचे स्वप्न असते. कारण तो त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील सर्वात सुखद क्षण असतो.
पण आजच्या आधुनिक काळात वंध्यत्व हा ज्वलंत प्रश्न होत आहे. अर्थात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेकांचे आईवडील होण्याचे स्वप्न साकारही होत आहे ही दिलासा देणारी बाब आहे.
हा अतिशय संवेदनशील प्रश्न सोडवण्यासाठी डॉक्टरांच्या रूपातील देवमाणसं अतोनात प्रयन्त करत असतात.
तर जाणून घेऊ शिक्षणाबरोबर उत्तम संस्काराची जोड असणारी अशाच एका महिला डॉक्टरची प्रेरणादायी कहाणी…..
शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे येथील श्रुती हिचा जन्म ९ डिसेंबर १९८६ रोजी झाला. वडील श्री अनिल गाडेकर हे स्वतः डॉक्टर आहेत तर आई सौ सुरेखा अनिल गाडेकर या बँकेत नोकरी करत. घरात आधुनिक विचारसरणी असल्याने मुलींनी शिकून स्वतःच्या पायावर उभे रहावे अशी पालकांची मनापासून इच्छा होती.
श्रुती ही लहानपणापासूनच अतिशय हुशार, अभ्यासू , कष्ठाळू, शांत, संयमी व अतिशय नम्रपणे बोलणारी मुलगी. या स्वभावामुळेच तिने अनेकांचे मने जिंकली.
तिचे प्राथमिक शिक्षण कटारिया इंग्रजी माध्यम शाळेत झाले. शाळेत असताना कायम तिला ९० ते ९५% गुण मिळत. दहावीत ८९% गुण मिळाले. अकरावी व बारावीचे शिक्षण तिने एस पी कॉलेजमधून पूर्ण केले. बारावीत देखील तिला ९१ % गुण मिळाले होते तर
पी सी एम बी गृप मध्ये तिला ९५% गुण मिळाले.
श्रुती ला गुणवत्तेच्या जोरावर पुणे येथील प्रसिद्ध बी जे मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला.
एम.बी.बी.एस.च्या प्रवेश परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून तिचा १५१ क्रमांक होता. बी. जे. मेडिकल कॉलेज मध्ये चौथी, तर मुलींमध्ये ती टॉपर होती. तिथूनच तिने एम.बी.बी.एस.ची पदवी प्राप्त केली.
श्रुतीने पुढे एम एस देखील बी जे मेडिकल कॉलेज मध्ये पूर्ण केले. तिची अशी उल्लेखनीय कामगिरी चालूच होती. आता श्रुती डॉक्टर श्रुती झाली. समाजात एक आदराचे व मानाचे स्थान आज तिने स्वकष्टाने प्राप्त केले.
श्रुतीने अतिशय मेहनतीने, चिकाटीने व जिद्दीने उंच भरारी घेतली ही तिच्या कुटुंबासाठी, शाळेसाठी व कॉलेज साठी अतिशय आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे.
मुली कोठेच कमी नाही हे तिच्या उदाहरणावरून स्पष्ट दिसून येते. तिच्या आई वडिलांचे तिला पूर्ण सहकार्य होते. त्यासाठी त्यांनी देखील खूप मेहनत घेतली असे ती आवर्जून सांगते. वेळोवेळी तिला प्रेरणा दिली त्यामुळेच ती हे यशाचे शिखर गाठू शकली.

श्रुतीची लहान बहीण इशा ही देखील इंजिनिअर असून अमेरिकेत उच्च पदावर कार्यरत आहे.
२०१३ साली श्रुतीचे लग्न झाले व ती मुंबईला आली. तिचे पती श्री सुमेघ अश्विन मांगले हे देखील आधुनिक विचारांचे असल्याने त्यांनी तिला पुढील शिक्षण व प्रॅक्टिससाठी प्रोत्साहन दिले.आता पूर्वाश्रमीची श्रुती सौ श्रुती सुमेघ मांगले झाली. २०१४ साली तिला एक गोंडस मुलगी ही झाली.
लग्नानंतर देखील तिने अतिशय मेहनतीने व जिद्दीने लहान मुलीला सांभाळून शिक्षण पूर्ण करून ती स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र fellowship in Reproductive Medicine
I.S.A.R. – ASPIRF वंध्यत्व निवारण तज्ञ झाली.
श्रुतीने दोन वर्षे मुंबई च्या जे.जे.मेडिकल कॉलेज मध्येही प्रशिक्षण घेतले. २०१६ – २०१७ साली I. V. F. ( In Vetro Fertilization ) fellowship चे प्रशिक्षण पुणे येथे रुबी हॉलमधून पूर्ण केले.
श्रुती ने जपान मध्ये एक महिना राहून सेंट मदर हॉस्पिटल फुकुओका येथे I. V. F. चे प्रशिक्षण घेऊन एक सुपरस्पेशिलिटी डिग्री प्राप्त केली.
श्रुती सध्या मुंबईत Ishwarya fertility सेंटर येथे वंध्यत्व निवारणतज्ञ व स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र डॉक्टर म्हणून कार्यरत आहे.
डॉ श्रुती सांगते की, प्रत्येक जोडप्यास निसर्गतः स्वत:चे मूल होईलच असे नाही. गेल्या दोन दशकांमध्ये वंध्यत्वाची टक्केवारी लक्षणीय वाढली आहे.
गर्भधारण न होणे हेच वंध्यत्वाचे मुख्य लक्षण आहे. या समस्येला स्त्री किंवा पुरुष दोघेहो कारणीभूत असु शकतात. आज देखील याबाबतीत समाजात अनेक गैरसमज आहेत.
एक प्रमुख गैरसमज म्हणजे गर्भधारणा न होणे यासाठी स्त्रीच दोषी आहे आणि हो ! ही परिस्थिती फक्त खेड्यात अथवा अशिक्षित लोकांमध्येच नव्हे तर शहरात व उच्चशिक्षित श्रीमंत समाजात देखील पहायला मिळते ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. असे गैरसमज केवळ डॉक्टरांच्या योग्य समुपदेशनामुळेच दूर होऊ शकतात.
पण यासाठी पती आणि पत्नी या दोघांच्याही चाचण्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व मान्यताप्राप्त लॅब मध्ये होणे तितकेच महत्वाचे ठरते. वैद्यकीय रिपोर्टच्या आधारे व्यक्तिगणिक उपचारांची रूपरेषा तज्ज्ञ डॉक्टर ठरवु शकतात.
वंध्यत्व असलेल्या केवळ स्त्रियांचेच नव्हे तर जोडप्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. हीच त्या जोडप्याची व काळाची गरज आहे. समुपदेशन अत्यंत महत्वाची भूमिका बजावते हे विसरता कामा नये.
सर्वात महत्वाचे म्हणजे उपचारांदरम्यान आपल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवून स्वतः संयम बाळगावा लागतो व डॉक्टरांना सहकार्य करावे लागते.
डॉक्टर प्रथम सर्व तपासण्या करून नैसर्गिक पद्धतीने अथवा प्रजनन औषध उपचार देऊन अथवा काही शस्त्रक्रिया करून गर्भधारणा राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात. मात्र जेव्हा याची शक्यता कमी होते तेव्हा अंतिम उपाय म्हणून आय व्ही एफ म्हणजे इन विट्रो फर्टिलाइजेशन याचा सल्ला दिला जातो.
स्त्रिया नैसर्गिक रित्या गरोदर न राहण्यास अनेक गोष्टी कारणीभूत असतात. जर फेलोपियन ट्यूब ब्लॉक किंवा डॅमेज असेल, पुरुषामध्ये स्पर्म काउंट कमी असेल स्त्रीला ओवूलेशनची समस्या असेल, प्रिमॅचूअर ओवेरीयन फेल्युअर वा गर्भाशयात समस्या असेल तरी गरोदर राहण्यास अडथळा निर्माण होतो.
याशिवाय ज्या स्त्रियांची फेलोपियन ट्यूब काढून टाकली आहे किंवा त्या कोणत्या अनुवंशिक विकाराने ग्रस्त असतील आणि गरोदर राहत नसतील तर अशावेळी आयव्हीएफ प्रक्रियेचा वापर केला जातो.
अशक्य ही शक्य करण्याचे सामर्थ हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने डॉक्टर अनेक जोडप्यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याचे प्रयत्न करत आहे व त्यात त्यांना यश ही मिळत आहे.
श्रुतीला विचारले की तू हेच क्षेत्र का निवडले ? तेव्हा ती म्हणाली की, “स्त्रीला गर्भधारणा होणे, एक आई होणे हा तिच्या आयुष्यातील सुवर्ण क्षण असतो तेव्हा तो आनंद तिला शब्दात देखील वर्णन करता येत नाही. अशा वेळी घरातील सर्व मंडळी अतिशय भावनिक होतात. आपले कुटुंब पूर्ण झाले याचे समाधान त्यांना वाटते. जेव्हा ते प्रथम आजी आजोबा होतात तेव्हा त्यांचे आनंदाश्रू लपवू शकत नाही. तो क्षण डॉक्टरांसाठी व त्या कुटुंबासाठी खूप मोलाचा असतो. हीच त्या डॉक्टरांसाठी त्यांच्या कामाची पोच पावती असते. आपण कोणालातरी आनंद देऊ शकतो हीच भावना लाख मोलाची असते “.
ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाला आपण ही काही देणे लागतो हा शुद्ध हेतू मनात ठेवून आज
डॉ श्रुती आपल्या क्षेत्रात अतिशय प्रामाणिकपणे कार्यरत आहे. या कामात समाधान व आनंद मिळतो. त्यामुळे रात्री शांत झोप लागते. याहून दुसरा आनंद काय असू शकतो ? असे ती आवर्जून सांगते.
आजकाल लग्न उशिरा होत आहे. त्यात स्पर्धेचं युग आहे. त्यामुळे अनेक वेळा डॉक्टरांचा सल्ला न घेता गर्भधारणा होऊ नये त्यासाठी गोळ्या घेतल्या जातात. त्यामुळे स्त्रियांनी असे न करता प्रथम डॉक्टरांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे असा सल्ला डॉ श्रुती देते. एक स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून ती सांगू इच्छिते की, महिलांनी प्रथम आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे व कोणतीही शंका अथवा ताण तणाव असेल तर विश्वासाने डॉक्टरांकडे व्यक्त व्हावे जेणे करून भविष्यात कोणताही त्रास अथवा अडचण येणार नाही व योग्य वेळी निदान झाल्यावर त्या निरोगी व सुखकर आयुष्य जगू शकतील.
लग्नाच्या आधी आई वडिलांच्या व लग्नानंतर सासरच्या मंडळींमुळे म्हणजे सासरे श्री अश्विन मांगले, सासूबाई सौ सुरेखा अश्विन मांगले, तसेच दिर सिद्धांत व पतीच्या पूर्ण सहकार्यामुळे प्रोत्साहनामुळे तिची यशस्वी वाटचाल चालू आहे.
तिचे पती श्री सुमेघ अश्विन मांगले हे इंजिनिअर असून अदानी पॉवर मुंबई येथे डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. दिर इंजिनिअर असून, पुढील शिक्षण अमेरिकेत घेत आहेत तिला सात वर्षाची मुलगी आहे. घर व डॉक्टर अशा दुहेरी जबाबदारीची कसरत ती चोख निभावत आहे. पुढेही तिला शिकायचे असेल तर तिने जरूर शिकावे असे तिचे पती श्री सुमेघ सांगतात .त्यांना त्यांच्या पत्नीचा खूप अभिमान आहे असाही उल्लेख ते करतात.

खरंच, श्रुती स्वतःला खूप भाग्यवान समजते. तिला माहेरी व सासरी देखील पूर्ण स्वतंत्र मिळाले त्यामुळेच ती यशस्वी वाटचाल करू शकली व समाजात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करू शकली.
चित्रकला, भरतनाट्यम करणे, घरी पणत्या रंगवणे, घर सजवणे व कुटुंबाबरोबर वेळ घालवणे हे श्रुतीला खूप आवडते.
अशी ही अतिशय महत्वाकांक्षी व प्रयत्नवादी डॉ सौ श्रुती सुमेघ मांगले आपल्या क्षेत्रात हिंमतीने कार्यरत आहे.तिचा प्रेमळ, समंजस स्वभाव तिच्या क्षेत्रासाठी जमेची बाजू आहे. म्हणून तर म्हणतात ना, डॉक्टरांकडे पाहिल्यावर निम्मा आजार बरा होतो हे त्यामुळेच.
डॉक्टर श्रुतीला तिच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी व भविष्याच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी अनेक शुभेच्छा.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
खूप छान लेख..
एका महत्वाकांक्षी ,प्रयत्नवादी ,समंजस,प्रेमळ कार्यरत व्यक्तीचा
या लेखातून परिचय झाला.
डॉ. श्रुती यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!