जीवनात आलेल्या अपयशाने खचून न जाता यश मिळवण्यासाठी एका नव्या उत्साहाने प्रयत्न करत राहणे म्हणजेच खरे यश.
अनेक वेळा प्रयत्न करून देखील जर यश प्राप्त होत नसेल तर साहजिकच मानवी मनामध्ये नकारात्मकता येणारच. अशावेळी या सर्वातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला गरज असते ती निसर्गाशी थोडा वेळ संवाद करण्याची. ज्याला निसर्गाशी संवाद करता आला तो जीवनात कधीच अपयशाने खचणार नाही.
एखाद्या छोट्याशा रोपट्याचे झाडात रूपांतर होताना जेव्हा आपण बघतो तेव्हा निसर्ग आपल्याला विचार आणि कर्माशी आपण एकरूप राहून आपल्यामध्ये धैर्य आणि सहनशीलता या यशासाठी आवश्यक असणाऱ्या मुळ्या घट्ट होणे किती आवश्यक आहे हा संदेश देत असतो. रोपट्याचे रूपांतर झाडांमध्ये होऊन ज्याप्रमाणे तो इतरांना सावली आणि फळे देऊ लागतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्यामध्ये देखील विचारांची प्रगल्भता येऊ लागते, जीवनातील आलेल्या प्रत्येक वादळाला सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होते.
जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर धैर्यता हा गुण अंगी असायलाच हवा. सूर्य कितीही मोठा आणि शक्तिशाली असला तरी त्याला देखील उगवण्यासाठी रात्रभर थांबावेच लागते. आकाशातील चंद्र जरी कितीही सगळ्यांना हवासा वाटला तरी त्याला देखील पूर्ण दिसण्यासाठी पौर्णिमेपर्यंत वाट पाहावी लागते ना ?
मग आपण तर शेवटी या जगाच्या नाट्य पटावरचे छोटेसे पात्र आहोत. प्रत्येक पात्राची एक ठराविक भूमिका आपण जन्माला आलो त्यावेळेस निश्चित झालेली असते. गरज असते फक्त ती आपली भूमिका ह्या जगाचा नाट्यपटावर काय आहे ती समजून आयुष्यभर त्या भूमिकेत राहून देखील त्यापासून अलिप्त राहण्याची. कारण आपण जे काही करणार ती फक्त आपली भूमिका असणार आहे. त्याव्यतिरिक्त काही नाही.
आपण जरी कितीही म्हटलं तरी एक दिवस हा खेळ संपणारच आहे. हे एकदा का आपल्या लक्षात आले की मग जीवन हे इतरांच्या आशा-आकांक्षा किंवा मान-अपमानाचे ओझे मनावर घेऊन आयुष्यभर झुकत जाणे नसून जीवन म्हणजे आपण आपल्या पद्धतीने आपल्या भूमिकेचे केलेले सादरीकरण होय.
ज्याप्रमाणे नाट्यपटावर एखादी भुमिका केलो की, एखाद्या अभिनेत्याची ती भूमिका कायमची ओळख होऊन जाते. अगदी त्याचप्रमाणे आपण देखील जीवनात ज्याप्रमाणे आपले जीवन जगणार त्यावरूनच लोक आपली भूमिका ठरवणार. मात्र त्यासाठी आपल्याला आपली भूमिका समजून त्याच्याशी समरस होण्याचा सराव करत राहणे खूप गरजेचे आहे.
खरे जीवन कसे असावे याचा सराव निसर्गाच्या सानिध्यात खूप सहजपणे आपण करू शकतो. कारण तिथे उमलणाऱ्या फुलांचा सुगंध असतो, जो आपल्याला इतरांना आनंद कसा द्यायचा तो शिकवतो. आनंदाने बागडणारीं फुलपाखरे असतात. ती आपल्याला आपले जीवन शेवटपर्यंत उत्साहाने कसे जगायचे ते शिकवतात. आकाशात उडणारे पक्षी असतात. ते आपले पंख फडफडत ठेवले की उंच गगनाची भरारी कशी होऊ शकते हे शिकवतात. निखळ आणि निर्झर वाहणारे झरे छोटेसे जरी असले तरी सतत काही ना काही करत राहिलो तर कसे आपण इतरांच्या उपयोगी ठरतो हे आपल्याला शिकवतात.
म्हणूनच जर आयुष्यात खरंच यश मिळवायचं असेल तर सर्वप्रथम आपल्या विचारांवरती यश मिळवा.
जितके आपले विचार सकारात्मक होत जातील तितके आपले जीवन आनंदी आणि उत्साही होत जाईल. आणि ज्याचे व्यक्तित्व आनंदी, सकारात्मक, उत्साही असेल ती व्यक्ती स्वतः तर यशस्वी होईलच पण त्याचबरोबर इतरांसाठी देखील कायम प्रेरणादायी, उत्साही आणि खरीं यशस्वी असेल.

– लेखन : सौ. पुनम सुलाने
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800