Thursday, February 6, 2025
Homeलेखयशाच्या काळोख्या सावलीत….

यशाच्या काळोख्या सावलीत….

लहानशा गावातील साधं जोडपं पण उरात स्वप्न मात्र मोठं. आपल्या एकुलत्या एक हुशार मुलाला खूप शिकवायचं.

दोघांनी त्यासाठी अतोनात कष्ट केले. इंग्रजी शिक्षणासाठी आणि नंतर परदेशी जाण्यासाठी पैसे कमी पडले तेव्हा जवळ होते-नव्हते ते विकून टाकले आणि उरलेल्या तुटपुंज्या कमाईवर खर्च भागवत राहिले.

आता त्यांचा उच्चशिक्षित मुलगा यशाच्या पंखांवर आरूढ होऊन जगभर फिरत होता. आपल्या कर्तृत्वाने नाव लौकिक आणि संपत्ती मिळवत होता.

या सर्व गडबडीत व जबाबदारीत त्याला गावाची किंवा आई-वडिलांची विचारपूस करायला कशी सवड मिळणार ? अशी स्वतःची समजूत काढत ते दोघे एकमेकांना आधार देत जगत होते.

एक दिवस म्हातारा मुलाला न भेटताच मरून गेला. आता ती एकटीच राहिली…वृद्ध, गरीब, हतबल आणि अगदी एकटी. रोजची औषधे, खाणे-पिणे यालासुद्धा हाती पैसा राहिला नाही. सरकार म्हणाले की तुझे कोणी नाही किंवा आहे तो मुलगा बघत नाही असे लिहून दिलेस तर निराधार माणसांना मिळते ती मदत तुला देऊ. पण म्हातारीचा स्वाभिमान या गोष्टीला कबूल होईना.

ज्या बाळाला मोठे करण्यासाठी उमेदीची सगळी हयात आणि उतपन्न खर्ची घातले, ज्या लाडक्या मुलाच्या प्रत्येक चढत्या पायरीची आतुरतेने वाट पाहिली तो आज सन्मानाच्या शिखरावर असताना त्याचे नाव असे बेजबाबदार व बेफिकीर म्हणून जाहीर करायचे ?

तो जिवंत असताना आपल्याला कोणी नाही असे म्हणणे हे किती दुःखदायक आहे. लोक हसतील, घराण्याची बेअब्रू होईल आणि आपला मुलगादेखील दुखावला जाईल. नकोच ते. एका शांत संध्याकाळी तिने विष पिऊन चिरनिद्रा स्वीकारली आणि हा प्रश्न संपवून टाकला.

ही सत्यकथा आहे. म्हाताऱ्या लोकांच्या आत्महत्येच्या अशा अनेक घटना दक्षिण कोरिया या देशात घडत आहेत. गेल्या पन्नास-साठ वर्षात वेगाने आर्थिक प्रगती करून हा देश संपन्न झाला आहे. येथील माणसे हुशार कष्टाळू आणि झगडणारी असतात. तरुण लोक परदेशात जाऊन किंवा स्वदेशात उत्तम करिअर करून धनाढ्य झाले आहेत आणि त्यांना मुबलक सुखसोयी उपलब्ध आहेत. पण या यशाच्या चमचमत्या कमानीखाली काळोख दाटलाय तो विभागलेल्या कुटुंबांचा, विसरलेल्या ऋणांचा आणि त्यामुळे झालेल्या मानसिक अधोगतीचा.

दक्षिण कोरियातील वयस्कर लोकांचा हा प्रश्न खरोखर अतिशय गंभीर आहे. आज वृद्ध झालेल्या याच पिढीच्या कष्टांमुळे देशाची भरभराट झाली. यातील बहुतेक माणसे त्यांच्या तरुणपणी चांगला नोकरी व्यवसाय करून खाऊन-पिऊन सुखी होते. मुलांचे संगोपन व शिक्षण यावर त्यांनी हात न राखता खर्च केला. कमावती कर्तबगार मुले हीच त्यांच्याकरता भविष्याची पुंजी होती. पण आता अर्ध्याहून अधिक वृद्ध दारिद्र्यात दिवस काढत आहेत.

भौतिक यशाच्या मागे धावत सुटताना या समाजाने नैतिक मूल्ये गमावली. परीक्षेत पुढे जाण्यासाठी, सर्वात मोठी नोकरी मिळवण्यासाठी आणि इतर सर्वांवर कुरघोडी करण्यासाठी अशी घाई व जीवघेणी स्पर्धा सुरु झाली की हजारो वर्षांच्या परंपरा अगदी कमी काळात मोडीत निघाल्या.

आई-वडिलांचा सांभाळ करणे हे आपले कर्तव्य आहे असे मानणाऱ्या मुलांचे प्रमाण पंधरा वर्षात ९० टक्क्यांवरून ३७ टक्क्यांवर उतरले आणि दुसरीकडे वयस्क लोकांच्या आत्महत्येचं प्रमाण २००० सालापासून तिप्पट झाले आहे. पासष्ट पेक्षा जास्त वयाची हजारो कोरियन माणसे अशा रीतीने आपले आयुष्य संपवतात, पुष्कळदा एकट्याने तर कधी जोडीने. असा जीवनाचा शेवट करताना ते न चुकता अंत्यक्रियेसाठी दोन फोटो आणि कित्येकदा एखादी चिट्ठी ठेवतात – आपल्या मुलाचा यात काही दोष नाही, आपण त्याला भार होऊ इच्छित नव्हतो- अशा आशयाची.

या सामाजिक ऱ्हासाची कारणमीमांसा करून त्यावर उपाय शोधणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया तेथील सरकारने सुरु केली आहे. यात एक वस्तुस्थिती मात्र निश्चित आहे. या वृद्ध व्यक्ती मरण जवळ करतात याची मुख्य कारणे दोनच, गरिबी आणि एकटेपणा.

भारत आणि कोरिया यांच्या मानसिकतेत बरेच साधर्म्य आहे. भारतीय माणूस आपल्या मुलाचे भले व्हावे म्हणून आत्यंतिक प्रयत्न करतो. गरीब पालक पोटाला चिमटा काढून, वेळप्रसंगी जास्तीच्या नोकऱ्या करून मुलांच्या गरजा पुरवतात. श्रीमंत व मध्यमवर्गी घरात मुलांना आजकाल जे हवे ते मिळते आणि त्यांच्यावर अभ्यास नीट करावा या पलीकडे फारसे काही बंधन नसते. ही मुले उद्या कशी वागतील याची काय खात्री ? म्हणूनच बाकी कर्तव्ये निभावताना कुठेतरी सगळ्यांनी आपल्या उतारवयाची सोय करावी. म्हातारपणी जर पैसे आणि सोबत याची गरज पडली तर गर्दीतही कोणी कुणाचे नसते याचे कोरियाचे उदाहरण आहे. त्यातून शिकून काळजी घेण्यातच शहाणपण आहे.

डॉ सुलोचना गवांदे

– लेखन : डॉ सुलोचना गवांदे, न्यू जर्सी, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ, +91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी