कोणतीही नवनिर्मिती वा इनोव्हेशन ही युरेका मुव्हमेंट नसते तर, त्यासाठी चिकाटी, शिस्त आणि भरपूर परिश्रम घ्यावे लागतात. नवनिर्मितीच्या यशाचे शिखर गाठण्यासाठी भरपूर वेळा अपयश पचवावे लागते.
भारतीय बनावटीची पहिली मोटार तयार करताना आम्हीही अशा अपयशाचे चटके सोसले आहेत, असे प्रतिपादन नॅनो कारचे जनक व टाटा मोटर्सचे कार्यकारी अध्यक्ष गिरीश वाघ यांनी नुकतेच पुणे येथे केले.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरच्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. चेंबरचे अध्यक्ष सुधीर मेहता, जीई इंडिया इंडस्ट्रीयलचे व्यवस्थापकीय संचालक अमोल नागर आणि चेंबरचे महासंचालक प्रशांत गिरबाने यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री वाघ पुढे म्हणाले, ऩवनिर्मिती ते यशस्वी उद्योग हा प्रवास चिकाटी, शिस्त आणि कठीण परिश्रमांचा आहे. नवनिर्मितीसाठी मिळणारे पुरस्कार व पारितोषिके हे त्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत. हे लक्षात घेऊन उद्योजकांनी आपली वाटचाल सुरु ठेवली पाहिजे.
औद्योगिक क्षेत्रातील नाविण्यपूर्ण उत्पादनासाठी दिला जाणारा गो. स. पारखे औद्योगिक मान पुरस्कार श्री. वाघ यांच्या हस्ते व्ही. स्मार्ट इन्फोटेकच्या संचालिका मृणालीनी चव्हाण आणि व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह चव्हाण यांना प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराबद्दल बोलताना श्रीमती चव्हाण म्हणाल्या की, फाऊंड्री उद्योगासाठी कार्यक्षम व कॉस्ट इफेक्टिव्ह कार्यपद्धती विकसित करणे, त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हा व्ही-स्मार्ट समूहाचा ‘मोटो’ आहे. पुरस्कारासाठी निवड झालेले ”स्मार्ट कास्ट प्रो” हे आमचे नवे उत्पादनही फाऊंड्री उद्योगांसाठी वरदान ठरणारे आहे. त्यामुळे फाऊंड्रीजचे रिजेक्शन कमी होऊन उत्पादन खर्चात मोठी कपात होऊ शकणार आहे.
बी. जी. देशमुख सीएसआर पुरस्कार, डॉ. आर. जे. राठी ट्रस्टचा हरित उपक्रम पुरस्कार, किरण नातू स्मृती उद्योजकता पुरस्कार, रमाबाई जोशी स्मृती महिला उद्योजक पुरस्कार, सेवानिवृत्त ब्रिगेडियर एस. बी. घोरपडे संरक्षण उत्पादन पुरस्कार, हरिमालिनी जोशी ऩवउत्पादन पुरस्कार आदी पुरस्कारही यावेळी देण्यात आले. प्रशांत गिरबाने यांनी आभार मानले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

– लेखन : सुनील कडूसकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800