लोकप्रिय पार्श्वगायक, अभिनेते, निर्माते, संवादलेखक, दिग्दर्शक अशा विविध कामगिऱ्या करणाऱ्या किशोरकुमार यांचा आज जन्मदिन आहे. त्यामुळे पाहू, या अष्टपैलू कलाकाराचा कलंदर जीवन प्रवास…
किशोरकुमार यांचा जन्म मध्य प्रदेशातील खांडवा येथे ४ ऑगस्ट, १९२९ रोजी झाला. किशोरकुमार यांचे मोठे बंधू अशोककुमार बॉलीवुडमध्ये प्रसिद्ध झाल्यावर, गांगुली परिवाराचे मुंबई दौरे वाढत गेले. आभास कुमार यांनी याच वेळी आपले नाव किशोर कुमार ठेवून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. बॉम्बे टॉकीज मध्ये ते समूहगायक म्हणून काम करीत.

किशोरकुमार यांचा अभिनेता म्हणून पहिला चित्रपट “शिकारी” (१९४६) होता. या चित्रपटात अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका होती. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोर कुमार यांना “जिद्दी” (१९४६) या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. हे गाणे होते “मरने की दुआएँ क्यों मांगूँ”. यानंतर किशोर कुमार यांना गाण्याच्या बर्याच संधी मिळाल्या. १९४९ साली त्यांनी मुंबईत राहण्याचे निश्चित केले.
बॉम्बे टॉकीजच्या फणी मजूमदार दिग्दर्शित “आंदोलन” (१९५१) या चित्रपटात त्यांनी नायकाचे काम केले. आपल्या भावाच्या मदतीने किशोर कुमार यांना अभिनेता म्हणून बरीच कामे मिळत असली तरी त्यांना एक यशस्वी गायक व्ह्यावयाचे होते. त्यांना अभिनयात विशेष रूची नव्हती पण अशोक कुमार यांना घाबरत असल्यामुळे ते अभिनय करीत राहिले.
किशोरकुमार संगीत शिकलेले नव्हते. सुरुवातीला ते के.एल्. सैगल यांची नक्कल करीत. सुप्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांना किशोर यांची गायकी खूप आवडे. त्यांच्या सल्ल्यानुसारच किशोरकुमार यांनी नक्कल करण्याचे सोडून आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली.
अभिनेता म्हणून किशोरकुमार यांनी बर्याच नामांकित दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. बिमल रॉय बरोबर “नौकरी” (१९५४) आणि हृषीकेश मुख़र्जींबरोबर “मुसाफिर” (१९५७). सलिल चौधरी, “नौकरी”चे संगीतकार किशोरकुमार यांना त्यांचे संगीतात शिक्षण नाही म्हणून गाण्याची संधी देऊ इच्छीत नव्हते, पण किशोरचे गाणे ऐकून, त्यांनी हेमंतकुमारच्याऐवजी किशोरकुमार यांना “छोटा सा घर होगा” हे गाणे गावयास दिले.
किशोरकुमार यांनी चार वेळा लग्न केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रुमा गुहा ठाकुर ऊर्फ रुमा घोष होते. किशोरकुमार रुमा घोष बरोबर १९५० ते १९५८ साल पर्यंत राहिले. किशोरकुमार यांची दुसरी पत्नी ही प्रख्यात अभिनेत्री मधुबाला. मधुबालाने किशोरकुमारांबरोबर “चलती का नाम गाड़ी” (१९५८) सारख्या बर्याच चित्रपटात कामे केली. त्यांचा विवाह १९६१ साली झाला. मधुबाला ही मुस्लिम होती आणि त्यामुळे दोघांनी कोर्टात लग्न केले. हे लग्न ९ वर्ष टिकले. मधुबालाचा मृत्यू, २३ फेब्रुवारी १९६९ झाला.
किशोरकुमार यांची तिसरे लग्न योगिता बाली यांच्याशी १९७६ मध्ये झाले व ते ४ ऑगस्ट १९७८ पर्यंत टिकले.
नंतर किशोरकुमार यांनी १९८० साली अभिनेत्री लीना चंदावरकर यांच्याशी लग्न केले. किशोर यांना रुमापासून अमित कुमार व लीना चंदावरकर पासून सुमित कुमार ही दोन अपत्ये आहेत.

किशोरकुमार याना आठ वेळा सर्वोत्तम गायकाचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला.
१९६९ रूप तेरा मस्ताना> आराधना
१९७५ दिल ऐसा किसी ने> अमानुष
१९७८ खैके पान बनारसवाला> डॉन
१९८० हज़ार राहें मुडके देखीं> थोडीसी बेवफाई
१९८२ पग घुँघरू बाँध> नमक हलाल
१९८३ हमें और जीने की >अगर तुम ना होते
१९८४ मंजिलें अपनी जगह> शराबी
१९८५ सागर किनारे> सागर
किशोरकुमार यांच्या नावावर फक्त एक मराठी गाणे आहे “गम्मत जम्मत” या सिनेमामध्ये “अश्विनी ये ना” हे युगुल गीत ते गायले, त्यांना या गाण्याला साथ दिली आहे अनुराधा पौडवाल यांनी.
भारतातील आणीबाणीचा किशोरकुमार यांनी जाहीरपणे धिक्कार केला होता. त्याचा सूड म्हणून, किशोरकुमार यांच्या मिळकतीवर आयकर खात्याकडून छापे मारायला सुरुवात झाली. त्यांची गाणी आकाशवाणीवर वाजवू नयेत असे आदेश दिले. किशोरकुमार तुरुंगात जाता जाता वाचले असले तरी ते कफल्लक झाले. यावर उपाय म्हणून ते देशात आणि परदेशांत स्टेज शोज करू लागले. त्यांत त्यांना अपरंपार यश, प्रसिद्धी आणि भरपूर पैसा मिळाला. किशोरकुमार यांचे सर्व स्टेज शोज हाऊसफुल होत. पुढे आणीबाणी संपली तरी किशोर कुमार स्टेज शो करत राहिले.
किशोरकुमार म्हटले की त्यांचे यॉडलिंग आठवते त्यांनी ६०० सिनेमासाठी पार्श्वगायन केले. एकाहून एक सुंदर गाणी म्हटली पण त्यांच्या आवाजातले झुमरू सिनेमामधील सुरवातीचे ‘मै हू झूम झूम झूम झुमरू‘ हे शीर्षक गीत गाताना केलेले यॉडलिंग जबरदस्त.
अशा या हरहुन्नरी कलाकाराचे १३ ऑक्टोबर १९८७ रोजी निधन झाले. किशोरकुमार याना विनम्र अभिवादन.

– लेखन : प्रसाद जोग
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.