समाजातील वाढती विकृत मनोवृत्ती हा गंभीर चिंतेचा विषय मानला पाहिजे. हा काही विशिष्ट समाजाचा, एका राज्याचा, देशाचा प्रश्न नाही. ही आता जागतिक समस्या झाली आहे. सध्याचा जागतिक युद्धाचा भडका हे त्याचे राक्षसी दृश्य स्वरूप आहे असे समजायला हरकत नाही.
तसेही रोजच्या बातम्या आता साध्यासुध्या राहिल्या नाहीत. त्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या असतात. आपली झोप उडविणाऱ्या असतात. वाढता कौटुंबिक द्वेष कोणत्या स्तराला पोहोचला आहे बघा.. मुलाने आईचा / बापाचा केला खून ! भावाने बहिणीचा गळा कापला चिडून.. बापाने मुलींचा घेतला जीव. मित्राने केला कुऱ्हाडीचा वार ! विद्यार्थ्याचा शिक्षकावर प्राणघातक हमला ! अशा बातम्या काय दर्शवतात ? बायकोने प्रियकराच्या मदतीने केलेला नवऱ्याचा खून हेही कॉमन झालेय आता..
आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. अगदी शाळकरी मुलापासून तर, तरुण मुले मुली, नवरा, बायको, वृद्ध शेतकरी, कामगार असे समाजातील प्रत्येक स्तरात हे आयुष्याला कोणत्या ना कोणत्या कारणाने कंटाळून जीव देण्याचे प्रमाण वाढले आहे. बहुतेक नात्यागोत्यात कटुता आली आहे. पूर्वी सारखा लळा जिव्हाळा राहिला नाही घरात.. त्याची जागा द्वेष मत्सर, तिरस्काराने घेतली आहे. घराघरात वाद होताना दिसतात सारखे. कुणीच सुखी नाही. कुणाचेच कुणाशी पटत नाही. प्रत्येक जण एक दुसऱ्याकडे संशयाने बघतो. एकमेकांना स्पर्धक समजतो. शत्रू समजतो.
लग्न संस्था तर पार विस्कटली आहे. घटस्फोटाचे प्रमाण तर कितीतरी पटीने वाढले आहे. एकमेकांना समजून घेण्याचा पेशन्स राहिला नाही. तडजोड नको आहे.स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा दुराग्रह आहे, अट्टाहास आहे. सत्ता, पैसा, जातीय, धार्मिक बाबी, अंधश्रद्धा याचा अतिरेकी प्रभाव प्रत्येक मनावर खोलवर रुजला आहे. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची, कोणत्याही स्तराला जाण्याची तयारी आहे.
सध्याचे जागतिक युद्ध त्याचेच जिते जागते प्रतीक आहे. दुसऱ्याला ठेचून नामशेष करायचे, स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करायचे, जगाला आपल्या तालावर नाचवायचे यासाठी ही अटीतटीची लढाई आहे. यात कुणाचे किती प्राण जातात, किती नैसर्गिक संपत्तीचे नुकसान होते, पर्यावरण दूषित होते, आरोग्य धोक्यात येते याची कुणाला पर्वा नाही. ज्याचा त्याचा स्वार्थ सर्व श्रेष्ठ ! बाकी सारे दुय्यम.
म्हणजे एकीकडे गेल्या काही शतकात आपल्याच मानव जातीने, एकमेकाच्या सहकार्याने केलेली औद्योगिक, तांत्रिक, सामाजिक प्रगती,आपण स्वतःच नष्ट करायला निघालो आहोत. या विकृतीचा उद्देश मुळात दुसऱ्याचे नुकसान, समोरच्याचा सर्वनाश हे असले, तरी आपणही त्यातून सुटणार नाही. या विद्रोहाची, द्वेषाची, झळ आपल्यालाही पोहोचणारच ! आपण स्वतःही यात होरपळून निघणारच.
एकीकडे आपण तांत्रिक आर्थिक प्रगतीचे दावे करतो. पृथ्वीवर राहून समाधान होत नाही म्हणून चंद्रावर जाण्याच्या गोष्टी करतो, झोपडीतून महालात राहायला जाण्यात आनंद मानतो, आपण शिकून सुविद्य झाल्याचा अभिमान बाळगतो. पण प्रत्यक्षात मात्र आपले वर्तन माणुसकीलाच काळिमा फासणारे.. धार्मिक, जातीय द्वेषाने ग्रासलेले, स्वार्थाच्या चिखलात बरबटलेले ! या विरोधाभासाला काय म्हणावे ?
खोलात जाऊन विचार केला तर ही विकृती मुळात आपण प्रकृतीच्या विरोधात गेल्याने, प्रकृतीशी विध्वंसक खेळ खेळल्याने, निसर्गाचा नाश केल्याने निर्माण झाली आहे. ईश्वर निर्मित निसर्गावर आपण अतिक्रमण केले. नद्या, समुद्र, पर्वत, जंगल, प्राणी, पशुपक्षी.. सर्वच सृष्टीवर आपल्याला अधिराज्य गाजवायचे आहे या तोऱ्यात आपण वागत राहिलो. ज्याला आपण वैज्ञानिक, तांत्रिक प्रगती म्हणतो, त्यातही स्वतःचा विचार जास्त, अवती भवतीचा कमी, अशीच आपली संकुचित स्वार्थी वृत्ती राहिली आहे.
आपल्या विकृतीचा परिणाम अवती भवतीच्या वातावरणावर देखील झालेला आपण पाहतो. हा निसर्ग नियम आहे. ऋतू बदलले आहेत. उष्णता वाढली आहे. अवकाळी पाऊस, पुराचे थैमान, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या रोजच्या झाल्या आहेत. सगळ्या जगाचे पर्यावरण संतुलन पार बदलले आहे. या बदलाविषयी बौद्धिक चर्चा सत्रे होतात. पण ते बौद्धिक फक्त कागदावर राहते. मोठमोठे अहवाल येतात. पण परिस्थितीत फारसा चांगला बदल झालेला दिसत नाही कोणत्याही स्तरावर. खऱ्या प्रगतीचा आलेख वर जाण्याऐवजी खाली घसरतानाच दिसतो.ही वस्तुस्थिती आहे. शिक्षणाच्या संधी, सोयी सुविधा वाढल्या, अत्याधुनिक मल्टी स्पेशल मेडिकल कॉलेजेस वाढले, रेल्वे, विमान, अशी दळण वळणाची साधने, ई शॉपिंग साधने, कितीतरी प्रमाणात वाढली हे खरे. पण त्याच प्रमाणात या सुख समृद्धीने संपन्न झालेल्या समाजात, कुटुंबात आनंदाचे प्रमाण मात्र वाढले नाही.घराचे उत्पन्न लाखात, पण ही समृद्धी भोगण्याची मनोवृत्ती मात्र खड्डयात ! पैशाने माणूस सुखी आनंदी होत नाही.आनंद भाव मानसिक स्वास्थ्याशी संबंधित असतो.बँक बॅलन्स शी नाही ! करोना काळात बँकेत पैसे असूनही आपण घरात हतबल झालो होतो. दुर्दैव हे की आपण या अनुभवापासून काहीच शिकलो नाही. आपल्याच मस्तीत राहिलो. आता या जागतिक मनोरूग्ण विकाराने आपल्याला युद्धाच्या खाईत लोटले.या चक्रव्युहात सगळे जग फसले.
सगळ्या जगाचे सोडा, पण आपल्याकडे आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरेचा बौद्धिक श्रीमंतीचा वारसा असूनही केवळ विवेकाला तिलांजली दिल्यामुळे आपणही दिवाळखोरीच्या गर्तेत फसलो. आपण पदव्या घेतल्या. पण शहाणे झालो नाही. आपण पुस्तके वाचली. पण चिंतन केले नाही. आपण भूतकाळात, स्वतःच्या विश्वात, स्वार्थाच्या चिखलात खोल खोल डूबत गेलो. इतके की आता मोकळा श्वास घेणे देखील कठीण झाले आहे. या विकृतीने गढूळलेल्या वातावरणात ! आपणच आपल्या भोवती विणलेल्या जाळ्यात फसलो आहोत ही मानवी शोकांतिका ! आपण आपल्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा, ती घरातली शिकवण विसरलो, अन् आपल्या भान हरपलेल्या मनाचा ताबा विकृतीने घेतला आपल्या नकळत.आता हे विकृतीचे विषाणू आपल्याच घरापासून बाहेर पसरत गेले.. समाजात, देशात, जगात.. हे रक्तरंजित युद्ध, हा राक्षसी हिंसाचार, हे अघोरी बलात्कार, हा बॉम्ब गोळ्याचा हाहाःकार.. सगळा प्रकृतीशी, निसर्गाशी, विधात्या च्या निर्मितीशी खेळ केल्याचा परिणाम ! त्याची फळे तर भोगावी लागणारच ! जैसी करनी वैसी भरनी !

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे, माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
