“या जन्मावर शतदा प्रेम करावे!” या विषयावर लेख लिहायचा म्हटल्यावर माझ्यापुढे अनेक प्रश्न निर्माण झाले. म्हणजे कोणत्या जन्मावर ? मग जन्म म्हणजे काय ?
शतदा… शतदा म्हणजे एकदा, दोनदा नव्हे तर शंभर वेळा आणि प्रेम म्हणजे काय? ते कां करावे? आता करावे म्हणजे काय केले पाहिजे ?
असे एक ना दोन, अनेक प्रश्न माझ्या डोळ्यांसमोर उभे राहिले. खरंतर चालू असलेल्या जन्मावर, परमेश्वराने आपल्याला पूर्वसंचितानुसार जो जन्म दिला आहे त्याच्यावर एकदा नव्हे तर शंभर वेळा प्रेम करावे.
असा मानवी देह असलेला जन्म आपणा सर्वांना मिळालेला आहे. निरनिराळ्या प्रकारची पुण्य करणे फार महत्त्वाचे आहे. यातून मुक्ती मिळविण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण हा मनुष्यदेह केवळ इतर कोणत्याही प्राणीमात्राला मिळालेला नाही. तो फक्त आपल्याला म्हणजे मानवाला मिळालेला आहे. त्यामुळे मिळालेल्या जन्मावर लाख वेळा प्रेम करावे. प्रेम एका व्यक्तीवर नाही… एका क्षणावर नाही… एका निसर्गावर नाही… एका आकाशावर नाही… एका पाण्याच्या थेंबावर नाही… तर आपल्या अवतीभवती असलेल्या सर्वांवर प्रेम करणे हाच केवळ एकमेव इलाज आहे.
परवाची गोष्ट, प्रचंड ऊन होतं, अत्यंत गरीब माणूस एका झाडाखाली सावलीत झोपला होता.अत्यंत कष्ट करणाऱ्यांपैकी तो एक होता.गरीबी-श्रीमंती ही आपल्याला वडीलोपार्जित मिळालेली देणगी आहे. आपल्या प्रयत्नांनी मिळवलेली ती एक साधना असून, त्यात आपण स्वतः होत्याचं नव्हतो होतो किंवा नव्हत्याचे होतो असं पूर्व संचितावर अवलंबून असतं. आपण यशस्वी होऊ शकतो, फक्त आपले प्रयत्न अतिशय महत्त्वाचे आहेत.
त्या गरीब माणसाशी बोलण्याची संधी मिळाली. काही दिवसांपूर्वी त्याच्या मनात स्वतःचे आयुष्य संपविण्याचा विचार चालू होता. आज अजूनही तो याच विचारात येथे पडून राहिलेला होता. अशा भर उन्हात अत्यंत त्रासलेल्या त्याच्या जीवाला पावसाचा एक थेंब सुखावून गेला आणि त्याने आपण आयुष्यात आता अजिबात उन्हाचे चटके सहन करायचे नाहीत असा विचार केला. सुखावलेल्या एका पाण्याच्या थेंबाने त्याला अमृत मिळाल्यासारखे वाटले व त्याने यापुढे कधीही दुःखाचा विचार करायचा नाही आणि या पाण्याच्या थेंबाकडून मिळालेली ऊर्जा आयुष्यभरासाठी संचित करायची असे ठरविले.
तो पुन्हा नव्या जोमाने जीवन जगण्याची संधी मिळवू लागला. कर्म-धर्म संयोगाने त्याचा एका गुरूशी संपर्क आला. गुरु आज्ञेनुसार वागून आपले जीवन घालवीत असताना त्याला आता खूप खूप जगावेसे वाटू लागले होते. त्याच्या मनातील आत्महत्येचा विचार कितीतरी दूर निघून गेला होता. काही दिवसातच अशा प्रकारे आत्महत्या किंवा आपला आयुष्य संपविण्याचा विचार करणाऱ्या अनेक व्यक्तींच्या संपर्कात तो आला. आज त्याने अनेकांचे संसार वाचविले आहेत. त्याने आपल्या आयुष्यावरती एवढे प्रेम करायचे ठरविले की, त्यानंतर त्याला हे आयुष्य कमी पडत आहे असे वाटू लागले.
त्याने परमेश्वराला विनंती केली की, हे परमेश्वरा, देवा मला अजून खूप आयुष्य दे. मला अनेकांचे आयुष्य उभे राहीलेले पाहायचे आहे, त्यांना खूप खूप यशस्वी करायचे आहे.
त्यानंतर एक दिवस या सदृहस्थांनी एका वृद्धाश्रमाची निर्मिती केली. या वृद्धाश्रमात अनेक वयस्कर, निराधार महिला पुरुष येऊ लागले. आपल्या आयुष्याचा अंतिम काळ ते वृद्धाश्रमात घालवू लागले.
मनात प्रेम होतं, विश्वास वाढला, त्यानंतर श्रद्धा निर्माण झाली.त्याने स्वतः आयुष्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न केला आणि जन्मभर अनेकांना या जन्मावर प्रेम करायला शिकविले. या सदृहस्थांनी आपल्या गुरूच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन, या प्रकारचे कार्य केले. त्यामुळे त्याला आयुष्यावर, या जगण्यावर शतदा नव्हे तर लाख वेळा प्रेम करावेसे वाटले.
अशी व्यक्ती आजही अस्तित्वात आहे ही गोष्ट आपल्या सर्वांच्या मनाला आनंद देणारी आहे कारण आज अनेक जणं आपलं आयुष्य संपविण्याच्या विचारात आहेत.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांच्या जीवाची घालमेल होत आहे, नको ते वाईट प्रसंग जगभर चालू आहेत. कलियुगाची लक्षणे पावलोपावली दिसून येत आहेत.असे असतांना कुठेतरी “रानात एकटच पडलेलं फूल” उमलू लागलं आहे. त्या उमललेल्या फुलाचा सुवास आणि बहर पाहून मलाही असंच वाटतं की, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
— लेखन : पांडुरंगशास्त्री कुलकर्णी. पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800