सध्या विद्यापीठात विविध शाखांचे प्रवेश सुरू आहेत. त्या संबंधीच्या बातम्या या सामान्य माणसाला गोंधळात टाकणाऱ्या आहेत.
एकीकडे आपली अशी समजूत झालीय किंवा करून देण्यात आलीय की कॉलेजचे प्रवेश म्हणजे कठीण स्पर्धा. या स्पर्धेचे टेन्शन पाल्य, पालक सगळेच घेतात.दुसरीकडे अनेक विद्यापीठात प्रवेश पूर्ण झाले नाहीत. अनेक विभागात अनेक (शेकडो नव्हे हजारो) जागा रिक्त आहेत. अनेक कॉलेजेस मध्ये तर सत्तर ऐंशी टक्के जागा रिकाम्या असतात. आता तर इंजिनियरिंग च्या प्रवेशा बाबतीत देखील असेच काहीसे वृत्त येते आहे. केवळ तीस पस्तीस हजार विद्यार्थ्यांनी फी भरून प्रवेश घेतले. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांचा निर्णयच झालेला नाहीय ! एक मेडिकल चे क्षेत्र सोडले तर गरजू विद्यार्थी कमी अन् विभाग, कॉलेजेस, प्रवेश संख्या त्या मानाने जास्त अशी परिस्थिती दिसते.
या सर्व प्रक्रियेत पाल्य, पालक यांचे अज्ञान, अपुऱ्या माहितीपोटी शिक्षणाविषयीची अनास्था, खोलात शिरून माहिती न घेण्याची बेफिकीर वृत्तीच दिसून येते. अमुकच विषयाला, शाखेला महत्व द्यायचे, इतर शाखांना कमी लेखायचे असाही मत प्रवाह दिसून येतो. अगदी इंजिनियरिंग चे उदाहरण द्यायचे तर अनेक सुशिक्षित पालकांना देखील बी इ, अन् बी टेक या दोन पदव्यातला, इंजिनियरिंग कॉलेज आणि कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी यातला फरक माहिती नसतो. संगणक शाखेत, कॉम्पुटर सायन्स मध्ये विज्ञान शिकवतात की इंजिनियरिंग असाही प्रश्न पडू शकतो. शिवाय नव्याने आलेल्या ए आय, एम एल, डेटा सायन्स या शाखेत नेमका फरक काय ?कोणत्या शाखेत कोणते विषय शिकवले जातात, याची तरी चौकशी केली जाते का ? किंबहुना या नव्या शाखेचे नवे विषय शिकवणारे तद्न्य प्राध्यापक उपलब्ध आहेत का? त्या कोर्सेस साठी लागणाऱ्या अद्ययावत प्रयोगशाळा त्या कॉलेजात आहेत का ? ज्या आधुनिक विषयावर प्रोजेक्ट करायचे, सेमिनार द्यायचे त्यासाठी मार्गदर्शन करणारे तद्न्य, तंत्रद्न्य आहेत का ? याबद्दल ना पाल्य जागरूक आहेत ना पालक. कुठूनही आलेली काही ही माहिती वाचायची, त्यावर आंधळा विश्वास ठेवायचा असा प्रकार सुरू आहे अवती भवती !
खरे तर कॉमर्स, सायन्स, आर्ट्स शाखा अशा प्रत्येक क्षेत्रात आज संधी आहे. अनेक नवे व्होकेशनल कोर्सेस सुरू झाले आहेत. मिडिया, एन्टरटेन्मेंट, फॅशन, नर्सिंग, प्यारा मेडिकल, अप्लाइड सायन्स, टुरिझम, हॉस्पिटल मॅनेजमेंट, सर्व्हिस सेक्टर अशा कितीतरी नव नव्या शाखा आहेत. नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्याला आपल्या आवडीचे क्रेडिट कोर्सेस घेण्याचे स्वातंत्र्य आहे, ही माहिती किती जणांना असेल ? किंवा ही सगळे जाणून घेण्याची इच्छा असते ?
केवळ प्रवाहाबरोबर वाहत जाण्याने आपल्या आवडीचे स्थानक, आपल्या आवडीचे उद्दिष्ट साध्य होईलच याची खात्री नसते.
आज या सर्व बाबतीत, एकूणच शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत, उपलब्ध संधी, त्याचे भविष्यातील महत्व, उद्याच्या गरजा, त्यासाठी करावयाची मानसिक तयारी या सर्व बाबतीत पाल्य, पालक दोघेही अनभिज्ञ असतात. या बाबतीत उचीत कौन्सिलिंग करणारी यंत्रणाच आपल्याकडे नाही. विद्यापीठ प्रशासन, शासनाचे शिक्षण विभाग, खाजगी कॉलेजेस चे व्यवस्थापन सगळेच याबाबतीत उदास, बेफिकीर दिसतात. मला काय त्याचे ? हिच वृत्ती दिसून येते.कारण प्रवेश झाले नाहीत,विद्यार्थी संख्या कमी म्हणून कुणाचे पगार कमी होत नाहीत, की कुणाची नोकरी जात नाही. त्यामुळे अशा कौन्सिलिंगचे उत्साही तद्न्य देखील दिसत नाहीत. शिक्षणाचे खाजगीकरण म्हणजेच व्यापारीकरण झाल्यामुळे अशा समुपदेशनाच्या बाबतीत प्रचंड उदासीनता दिसून येते.
कोर्सेस, विषय निवडताना सर्वात जास्त महत्वाची असते व्यक्तिगत आवडनिवड. मला काय हवे ? काय आवडते ? हे जास्त महत्वाचे. त्या पाठोपाठ जे आवडते ते करण्याची क्षमता, योग्यता आपल्यात आहे का ? उदा गणित मुळातच आवडत नसेल तर इंजिनियरिंग कडे जबरदस्तीने (पालक किंवा मित्र म्हणतात म्हणून) प्रवेश घेण्यात अर्थ नसतो.एखादी गोष्ट सध्या जमत नसली तरी जिद्दीने ते शिकण्याची, नवे ज्ञान आत्मसात करण्याची निदान जिद्द, चिकाटी तरी आहे का हे तपासायला हवे.
आजकाल सगळीकडे क्याज्यूअल अप्रोच दिसतो. करियर कोर्सेस ची निवड ही गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे. याचे भान पाल्य पालक दोघांनाही हवे.
या पार्श्वभूमीवर कॉलेज, विद्यापीठाच्या रिक्त जागांमागील गणित तपासले पाहिजे, सुधारले पाहिजे, असे कुणालाच का वाटत नाहीय ?

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैदराबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800