छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष होते, सतराव्या शतकातील इतिहासाचे नायक होते, असामान्य राज्यकर्ते होते पण त्यांच्या इतिहासात असत्याची भेसळ करून सर्व सामान्य रयतेच्या हृदयसिंहसनावर आरूढ असलेल्या या लोकोत्तर राजाला जातीच्या, धर्माच्या, प्रदेशाच्या चौकटीत बंद करण्याचे पाप काही संकुचित विचारांची मंडळी करीत आहेत. हि संकुचित विचारांची मंडळी आपले गैरहेतू साध्य करण्यासाठी हे पाप करीत आहे त्यापासून सर्वसामान्य शिवप्रेमी रयतेने सावध असले पाहिजे
राजमाता जिजाऊ याच शिवरायांच्या खऱ्या गुरू आहेत. त्यांनीच बाल शिवाजीमध्ये स्वराज्य स्थापन करण्याची महत्वाकांक्षा निर्माण केली. राज्य हे रयतेच्या हितासाठी असते ही शिकवण त्यांनीच दिली. परस्त्री माते समान, स्रियांच्या अब्रूचे रक्षण ही राज्याची जबाबदारी आहे हि शिकवण देखील जिजाऊ मॉं साहेबांनीच दिली होती. बाल शिवाजी ते युगपुरुष छत्रपती शिवाजी याचे शिल्पकार राजमाता जिजाऊ आहेत.
छ. शिवाजी महाराज धार्मिक जरूर होते पण असे असले तरी त्यांनी पुजारी, पुरोहित, साधू, मौलवी, मुल्ला यांना राज्यकारभारात ढवळाढवळ करू दिली नाही. कोणत्याही राजाचे सैन्य सर्वसमावेशक असावे त्याला जाती धर्माच्या भिंती असू नयेत याचे भान महाराजांना होते, त्यामुळेच दौलतखानाला आरमार प्रमुख बनवले तर त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिमखान होता.
तानाजी मालुसरे कोंडाणा जिंकता जिंकता शहीद होतो. मदारी मेहतर शिवरायांची आग्र्याहून सुटका होण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतो. जीवा महाला सय्यद बंडाचा वार हवेतच अडवून शिवरायांचे प्राण वाचवतो. लोक म्हणतात ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’. बाजी प्रभूदेशपांडे पावन खिंड अडवून प्राण पणाला लावतो. शिवा न्हावी पन्हाळगडाचा वेढा सैल करण्यासाठी स्वतः शिवाजीचे रूप घेऊन आपली जान कुर्बान करतो. सिद्दी हिलाल आणि त्याचा मुलगा वाहवाह शिवरायांची सुटका करण्यासाठी सिद्दी जोहारशी लढता लढता जखमी होतात. यासारख्या शेकडो घटना शिवराय किती महान होते याची साक्ष देतात.
शिवरायांचा समकालीन इतिहास पाहता मोगल बादशहा असो, की निजामशाहीतील निजाम असो किंवा दस्तुरखुद्द आदिलशाही असो या सर्व राजवटीवर राज्य करण्याचे हक्क तत्कालीन राज्यकर्त्यांना वारसाहक्काने मिळाल्या होत्या. शिवरायांना मात्र स्वतःची स्वतंत्र आणि नवीन राजवट निर्माण करायची होती. अशी राजवट निर्माण करायला मोगलशाही, निजामशाही, आदिलशाही राजवटींनी विरोध केलाच पण मराठी मुलखातील बहुसंख्य कुलकर्णी, पाटील, वतनदार, देशमुख, जहागीरदार यांनीही विरोध केला.
शिवपूर्वकालीन इतिहासात राजा आणि प्रजा यांचा कोणताच संबंध दिसत नाही, एक राजा विरुद्ध दुसरा राजा यांच्या लढाईत जनतेला काहीच देणे घेणे नव्हते, ती राजा राजांची लढाई असे, त्यात दोन्हीकडचे सैन्य झुंजत असे, कोणी जिंकत असे कोणी हरत असे पण त्याने सर्व सामान्य जनतेला काहीच फरक पडत नसे. विषमताग्रस्त समाजव्यवस्था, शिवाशिव, वर्णाश्रम व्यवस्था यांमुळे राजाचा तळागाळातील प्रजेशी कोणताच संबंध नव्हता. समाजातील कष्टकरी वर्गाला राजा कोणीही असला तरी फरक पडत नव्हता कारण राजा कोणीही असला तरी त्यांच्या नरकयातना चुकलेल्या नव्हत्या.
छत्रपती शिवराय मात्र याला अपवाद ठरले,
शिवरायांच्या सोबत सर्व जाती धर्मातील मावळे होते, त्यांनी सामान्य माणसांना सोबत घेऊन अनेक लढाया लढल्या. यातील काही लढाया आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही यांच्याशी झाल्या तर बाकी सर्व लढाया त्यांना घाटगे, खंडांगळे, बाजी घोरपडे, बाजी मोहिते, निंबाळकर, डबीर, मोरे, बादल, सुर्वे, खोपडे, पांढरे, देसाई, देशमुख, व्यंकोजी भोसले, मंबाजी भोसले, जगदेवराव जाधव, राघोजी माने यां सगेसोयऱ्यांशी लढाव्या लागल्या.
या सर्व लढायात रयत शिवाजी महाराजांबरोबर भक्कमपणे उभी होती. शिवरायांनी बारा मावळातून आपले मावळे जमा करतांना त्यांची निष्ठा आणि क्षमता हेच निकष महत्वाचे मानले होते. शिवाजी महाराजांचे सैन्य अठरापगड जातीचे होते. त्यात सर्व जाती धर्माचे लोक होते . जातीय उच्चनीचता आणि वर्णाश्रम व्यवस्था यांच्यापासून शिवरायांची फौज कोसो दूर होती. शिवरायांनी आपल्या सैन्याला रोखीने पगार देण्याची पद्धत सुरू केली. जहागीर, इनाम, वतन ही पद्धत बंद केली. वारसा हक्काने नेमणुका बंद केल्या, केवळ कर्तबगारी हाच निकष महत्वाचा मानला. यांमुळे सर्वसामान्य कष्टकरी वर्गातील लोक शिवरायांच्या सैन्यात सामील होऊ शकले. त्यांच्यातील गुणवत्ता पारखून महाराजांनी या वर्गातील अनेकांची मोठ्या जबाबदारीच्या पदावर नेमणूक केली. त्यामुळे महाराजांबद्दल सर्वसामान्य माणसात विश्वासाची भावना निर्माण झाली.
शिवरायांनी गरजेपुरते थोडे खडे सैन्य बाळगले होते. उरलेले सैनिक शेतीच्या हंगामात शेती करीत आणि मोहिमेच्या काळात सैन्यात दाखल होत. एका अर्थाने त्यांनी शेतकऱ्यांच्या एका हातात नांगर तर दुसऱ्या हातात तलवार दिली होती.
शिवरायांच्या सैन्याला रोखीने पगार मिळत असे, त्यांना परमुलुखात जिंकलेली सर्व संपत्ती सरकारजमा करावी लागे.
स्रियांची अब्रू हि भारतीय माणसाला सगळ्यात प्राणप्रिय गोष्ट आहे. शिवपूर्वकाळात भारतात सामंतशाही बोकाळलेली होती, या काळात तळागाळातील स्रियांची अब्रू खूपच असुरक्षित झाली होती, या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या राज्यात स्त्रीयांच्या अब्रूच्या रक्षणाला अग्रक्रम देण्यात आला होता, कोणत्याही वर्गातील स्त्रीच्या इभ्रतीला धक्का लावण्याचे धाडस कोणीही करू शकणार नाही अशी जरब शिवरायांनी निर्माण केली होती. आपल्या जवळच्या नातेवाईकांना देखील त्यांनी या प्रकारच्या गुन्ह्यात माफी दिली नाही. रांझ्याचा पाटलांना केलेली शिक्षा सर्वश्रुत आहे. १६७८ मध्ये सकूजी गायकवाड नावाच्या सेनापतीने बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला, किल्लेदार सावित्रीबाई देसाई नावाची शूर स्त्री होती, तीने २७ दिवस किल्ला लढवला शेवटी सकूजीने किल्ला जिंकला आणि जिंकल्याच्या उन्मादात सावित्रीबाई देसाईवर बलात्कार केला. शिवरायांना ही बातमी समजताच ते प्रचंड संतापले आणि स्वतःचाच सेनापती असलेल्या सकूजीचे डोळे काढून त्याला कायमस्वरूपी तुरुंगात डांबले. सर्वच घटकातील महिलांच्या अब्रूचे रक्षण केल्यामुळे, रयत विशेषतः राज्यातील महिला वर्ग शिवरायांना आपला रक्षणकर्ता मानत होती.
शिवकाळापूर्वी करवसुली हा खूपच कळीचा मुद्दा होता, शेतकऱ्यांकडून होणारी करवसुली हाच राज्याचा उत्पन्नाचा मुख्य श्रोत होता. ही वसुली सामंती पध्दतीने होत असे. गावोगावी देशमुख, देसाई, पाटील, कुलकर्णी व खोत यांना शेतकऱ्यांकडून कर वसुलीचे अधिकार होते, ते मनमानी पद्धतीने वसुली करत, ते मध्यवर्ती सत्तेला ठराविक वसूल देत असत, यात शेतकऱ्यांना कोणतीही सुरक्षा नव्हती, संकट काळात मदत नव्हती. शिवरायांनी ही पद्धत बंद केली. शिवरायांनी जमिनीची धारेबंदी (मोजणी) तीनवेळा केली. उत्तम, मध्यम, कनिष्ठ अशी जमिनीची प्रतवारी केली. पिकाचा आकार कमाल व किमान किती धरावे हे ठरवून दिले. एकूण उत्पन्नाच्या ४० टक्के हिस्सा राजाचा व ६० टक्के हिस्सा रयतेचा हे ठरवून दिले. जमीन महसूल रोखीच्या रूपाने घेतला जात होता, साळी भात, तांदूळ या धान्याच्या रूपाने तसाच तूप, पेंड, मीठ इ. वस्तूच्या रूपाने घेतला जाई. वसूल गोळा करण्यासाठी रोख वेतन देऊन सरकारी कमाविसदार नेमले. या पद्धतीला विरोध करणाऱ्या सामंतांना शिवरायांनी वठणीवर आणले, त्यांचे विशेष अधिकार संपुष्टात आणले.
शिवरायांनी शेतकरी वर्गात विश्वास व स्थैर्य निर्माण केले, एकदा चाळीस टक्के वसूल घेतल्या नंतर शेतकऱ्यांना गुंड, पुंड, लुटारू, दरोडेखोर, सामंत यांच्या पासून संपुर्ण सुरक्षा दिली.
सरकारला लागणारे धान्य,भाजीपाला सरकारने रोखीने विकत घेण्याची पद्धत सुरू केली. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही विनामोबदला हात लावण्याची सैन्याला परवानगी नव्हती. दुष्काळ, पूर, रोगराई इ. नैसर्गिक संकट काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाई यांमुळे शेतकरी वर्गाला शिवराय म्हणजे आपले पंचप्राण वाटू लागले.
शिवराय धार्मिक जरूर होते, ते शिवभक्त होते पण त्यांनी आपल्या राज्यात धार्मिक अवडंबर माजू दिले नाही. व्रत वैकल्ये, जप, जाप यात त्यांनी हस्तक्षेप केला नाही पण त्याला प्रोत्साहन देखील दिले नाही. त्यांनी अनेक देवळे, मशिदी, मठ, पीर यांना मदत दिली.
रयतेच्या वित्ताचे, जीविताचे आणि अब्रूचे रक्षण करणे हे राजाचे प्रमुख कर्तव्य आहे अशी शिवरायांची धारणा होती.
शिवरायांनी सुरत, राजापूर, रायबाग, हुबळी, शहापूर, बऱ्हाणपूर, कारंजा, अथणी, संगमा,चोपडे, धरणगाव, कल्याण, भिवंडी, जालना, पोळ, बेरगिरी, भागानागर, गोवे, बार्सिलोर, कारवार, श्रीरंगपट्टण, नाशिक, त्र्यंबकेश्वर, नगर, बेदर आदी शहरांवर आक्रमण करून तेथील बाजारपेठेतील धन द्रव्य ताब्यात घेऊन आपल्या राजकोषात जमा केले. काहींनी याची लूट म्हणून संभावना केली पण शिवरायांनी या शहरांवर आक्रमण करून मोगलशाही, आदिलशाही आणि निजामशाही या तिन्ही राजवटी त्यांच्या राज्यातील प्रजेचे, जीविताचे, वित्ताचे रक्षण करण्यास असमर्थ आहेत हा संदेश सर्वदूर पोहचवला.
अफजलखानाचा वध, हि घटना हिंदू विरुध्द मुस्लिम अशा स्वरूपात रंगवण्याचा प्रयत्न केला जातो पण खरे तर अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता तर शिवरायांचा वकील काझी हैदर होता हि एकच बाब यातील फोलपणा स्पष्ट करते.
शिवरायांचे धोरण उदारमतवादी होते, तर त्यांचा प्रमुख शत्रू औरंगजेब हा कट्टरतावादी होता. औरंगजेब शिवरायांचे राज्य नष्ट करण्यासाठी १६८१ मध्ये दक्षिणेत आला, त्यावेळी शिवरायांचे निधन झालेले होते. त्यांच्या पश्चात शंभूराजे, राजाराम राजे, ताराबाई, धनाजी, संताजी यांनी शिवशाहीचे रक्षणासाठी चिवटपणे लढा दिला, कोणताही नेता नसतांना मराठी सैन्य औरंगजेबाशी लढत राहिले.औरंगजेब अनेक लढाया जिंकला, पण तो मराठ्यांचा निर्णायक पराभव करू शकला नाही.
१६८१ ला दक्षिणेत आलेला औरंगजेब ३ मार्च १७०७ रोजी दक्षिणेतच नगर जवळ भिंगारला मरण पावला. त्याच्या पश्चात लवकरच मोगल साम्राज्य लयाला गेले कारण त्याच्या कट्टरतावादी धोरणाचा तो परिणाम होता. या उलट ३ एप्रिल १६८० रोजी छ. शिवाजी महाराज यांचे निधन झाले त्यानंतर देखील मराठी माणसे मराठी राज्याच्या रक्षणासाठी दीडशे वर्ष झुंजत होती. एखादा राजाच्या मृत्यू पश्चात त्याचे राज्य टिकावे म्हणून सर्वसामान्य जनतेने एवढा मोठा प्रदीर्घ काळ संघर्ष केल्याचे जगात दुसरे उदाहरण नाही.
आज देखील महाराष्ट्रातील तरुणांच्या हृदय सिंहासनावर छ. शिवाजी महाराजांचेच अधिराज्य आहे. ते तरुणांचे आदर्श आहेत. आपल्या या लोकोत्तर कुळवाडी भूषण राजाला म्हणजे छ. शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करण्यासाठी हे तरुण प्रचंड मोठया उत्साहात शिवजयंती साजरी करतात. त्या उत्सवातील तरुणांचा सळसळता सहभाग आणि उत्साह पाहून शिवरायांच्या प्रती असलेला आदर शतपटीने वाढतो. शिवजयंतीच्या निमित्ताने शिवरायांना त्रिवार अभिवादन.

– लेखन : हिरालाल पगडाल, संगमनेर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
हिरालाल पगडालाल यांनी शिवाजी राजा आणि त्यांच्या संपूर्ण कार्यपद्धतीचा अतिशय सुरेख आढावा घेतला आहे..
पुन्हा पुन्हा वाचावा असाच हा प्रेरणादायी इतिहास आहे..जाणावा शिवाजी..ओळखावा शिवाजी..