भारतातील सामाजिक सुधारणांचे प्रणेते छत्रपती राजर्षि शाहू महाराजांची आज, २६ जून रोजी जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनाचं अवलोकन केलं तर त्यांनी घेतलेले क्रांतीकारी निर्णय, राबविलेले सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, प्रशासकीय उपक्रम आपल्याला नतमस्तक करतात……
शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी लक्ष्मी विलास पॅलेस, बावडा येथे झाला. १७ मार्च१८८४ रोजी त्यांचं दत्तक विधान आणि राज्यारोहण होऊन करवीरच्या जनतेकडून त्यांना मानपत्र मिळालं. ३१ डिसेंबर १८८५ रोजी शिक्षणा साठी ते गुजरात मधील राजकोटला रवाना झाले. एप्रिल १८८९मध्ये ते शिक्षण पूर्ण करून परतले. राजकोटला शिक्षण घेत असतानाही ते प्रसंग परत्वे राज्यात हजर राहात. त्यांच्याहस्ते ८ मे १८८८ रोजी कोल्हापूर – मिरज रेल्वे मार्गाची पायाभरणी झाली. तर २० एप्रिल १८९१ रोजी गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या हस्ते या रेल्वे मार्गाचं उद्घाटन झालं. शाहू महाराजांनी या रेल्वेचं स्वागत केलं.
बडोदा येथील गुणाजीराव खानविलकर यांच्या कन्या लक्ष्मीबाई यांच्या बरोबर १ एप्रिल १८९१ रोजी त्यांचा विवाह झाला. १० मार्च १९९४ रोजी त्यांना राधाबाई ऊर्फ आक्कासाहेब हे पहिलं कन्या रत्न झालं.
शाहू महाराजांना गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या हस्ते २ एप्रिल १८९४ रोजी राज्य कारभाराची सूत्रं बहाल करण्यात आली. ही सूत्रं हाती येताच त्यांनी प्रजेला उद्देशून जन कल्याणाची ग्वाही देणारा पहिला जाहीरनामा जाहीर केला. स्त्री पुरुष समानतेची त्यांची भूमिका प्रत्यक्ष राज्य कारभारातून दिसू लागली. १ सप्टेंबर १८९४ रोजी त्यानी सौ राधाबाई उर्फ रखमाबाई केवळेकर यांची स्त्री शिक्षण खात्याच्या अधीक्षक म्हणून तर जानेवारी १९०२ मध्ये कृष्णा बाई केळवकर यांची अलबर्ट एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सहायक डॉक्टर म्हणून नेमणूक केली. व्यापार उद्योगाचं महत्त्व ओळखून त्यांनी १८९५ मध्ये शाहूपुरी या नवीन व्यापारी केंद्राच्या उभारणीस प्रारंभ केला. तर शिरोळ येथे कापड गिरणीचे उद्घाटन केले. २७ सप्टेंबर १९०६ रोजी त्यांनी श्री शाहू स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची पायाभरणी केली.
शाहू महाराजांनी शिक्षणाचं महत्त्व जाणून १५ नोव्हेंबर १९०६ रोजी दि किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेचे ते अध्यक्ष होते. नोव्हेंबर १९०९ मध्ये लक्ष्मीबाई राणी साहेबांच्या हस्ते राधानगरी धरणाचं बांधकाम सुर केलं. ११ जानेवारी १९११ रोजी त्यांनी कोल्हापूर येथे श्री शाहू सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याच वर्षी २० मे रोजी त्यांनी आर्थिक दृष्टीने दुरबल असणाऱ्यासाठी फी माफीचा व पुढे सप्टेंबर महिन्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्याही ही माफीचा क्रांतीकारी निर्णय घेतला. पुढे प्रत्येक गावात शाळा सुरू करण्याचा जाहीर नामा प्रसिद्ध केला.
फासे पारधी लोकांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी घरबांधणी योजना मंजूर केली. शाहू महाराजांनी सहकार चळवळ उभी केली. १ जून १९१३ रोजी त्यांनी भारत सरकारचा सहकारी संस्था कायदा, १९१२ लागू केला. ३० सप्टेंबर रोजी कोल्हापूर अरबन कोऑपरेटीव्ह सोसायटी ही पहिली सहकारी संस्था स्थापन केली. जुलै १९१७ मध्ये त्यानी विधवा विवाह कायदा आणि विवाह नोंदणी कायद्याची अंमलबजावणी केली. त्याच वर्षी त्यांनी सप्टेंबर महिन्यात सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
शाहू महाराजांनी २२ फेब्रुवारी १९१८रोजी बलुतेदारीं पद्धत कायद्याने बंद केली. तर मिश्र व आंतरजातीय विवाहाला पाठींबा जाहीर केला. २७ जुलै १९१८रोजी त्यानी अस्पृश्यांची गुलामगिरी नष्ट करणारा आणि त्यांना मानवी स्वातंत्र्याचे हक्क देणारा जाहीरनामा जारी केला. २९ जुलै रोजी त्यांनी वंश परंपरागत कुळकर्णी नेमणूक बंद करून पगारी तलाठी नेमण्याची पद्धत सुरू केली. मानवी हक्कांची पायमल्ली करणारी गुन्हेगारी जातीच्या लोकांची हजेरी पद्धत त्यांनी बंद केली.
राज्यातील सरकारी आणि सर्व साधारण खात्यात अस्पृश्यांना अग्रक्रम देण्याचा आदेश ८ ऑगस्ट १९१८ रोजी त्यांनी दिला. तसेच अस्पृश्य समाजातील जे तलाठी बुध्दीमान व कार्यक्षम असतील त्यांना कारकून किंवा अवल कारकून म्हणून नेमावे अशी आज्ञा दिली. दुष्काळ निवारण करण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
अस्पृश्यांना समानतेची वागणूक द्यावी म्हणून त्यांनी १ जानेवारी १९१९ रोजी वैद्यकीय सेवा खात्याला आदेश दिले. प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालयात अस्पृश्यांना समानतेची वागणूक देण्याचे व अस्पृश्य नोकरांना दयाळूपणे, समतेने वागविण्याचे आदेश दिले. तसंच वेगळ्या अस्पृश्य शाळा बंद करून सरकारी शाळांमध्ये सर्व जातीधर्माच्या मुलांना प्रवेश देण्याचे आदेश दिले. शाळातील जाती प्रथा बंद करून त्यानी मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षण लागू केले. ७ फेब्रुवारी १९१९ रोजी त्यांनी हिंदू – जैन यांच्यातील मिश्र जातीय विवाहांना कायदेशीर मान्यता दिली.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक वृत्तपत्र शाहू महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू झाले. त्याच वर्षी २२ मार्च रोजी माणगाव येथे बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या अस्पृश्य समाज परिषदेत त्यानी बाबासाहेबांचा गौरव केला. १७ एप्रिल रोजी त्यांनी नाशिक येथे अस्पृश्यांच्या वसतीगृहाच्या इमारतीची पायाभरणी केली. १३ मे रोजी त्यांनी वेठबिगारी बंद केल्याचा कायदा केला. हा कायदा मोडणाऱ्यांस जबर शिक्षेची तरतूद केली. ३० मे रोजी नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे शाहू महाराज अध्यक्ष होते. ७ जून रोजी महारांना गुलामगिरीतुन मुक्त केल्याची आज्ञा त्यांनी दिली. दिल्ली येथे १६ फेब्रुवारी १९२२ रोजी झालेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष स्थान शाहू महाराजांनी भूषविले होते.
अशा या युगप्रवर्तक, सामाजिक सुधारणेच्या प्रणेत्याचा, आधुनिक भारताच्या जडणघडणीला नवी दिशा देणाऱ्या महान नेत्याचं मुंबईतील खेतवाडी येथील पन्हाळा लॉज बंगल्यात ६ मे १९२२ रोजी, वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी आकस्मिक निधन झालं. दुसऱ्या दिवशी पहाटे करवीर नगरीत शिवाजी वैदिक विद्यालयाच्या मराठा विद्यार्थी पुरोहितांनी शाहू महाराजांचे अंत्यसंस्कार केले. ४८ तोफांची सलामी दिली.
शाहू महाराज आपल्यातुन देह रूपाने जरी गेले तरी त्यांच्या विचारांच्या, प्रत्यक्ष कृतीच्या रूपाने ते आपल्यात आहेतच. त्यांनी हाती घेतलेली समाज सुधारणा अजूनही पूर्ण झालेली नाही. ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्याला पार पाडावयाची आहे. शाहू महाराजांना विनम्र अभिवादन.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800.
फार मौलिक माहिती मिळाली श्री.शाहू महाराजांच्या कार्याबद्दल. धन्यवाद. सुंदर लेख आहे.
छत्रपती शाहू महाराज चे विलक्षण कायाॅ ची माहिती खुप छान. शाहू महाराजांच्या कायॅ ला मनापासून प्रणाम 🙏