Thursday, March 13, 2025
Homeसंस्कृतीयुनोत मराठी हवी...

युनोत मराठी हवी…

आज २१ फेब्रुवारी, जागतिक मातृभाषा दिन. या निमित्ताने हा विशेष लेख…

१९४८ ला पूर्व पाकिस्तानच्या (सध्याच्या बांगलादेश) संविधान सभेमध्ये उर्दू भाषेला राजभाषा म्हणून घोषित करण्यात आले व इतर भाषांचा अधिकार नाकारण्यात आला. बंगाली भाषिक विद्यार्थांनी या निर्णयाविरुध्द २१ फेब्रुवारी १९५२ रोजी ढाका विद्यापिठात उग्र आंदोलन केले. पाकिस्तानी फौजेने आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात पाच विद्यार्थी ठार झाले. पुढे याच मातृभाषेच्या अस्मितेतुन बांगलादेशाचा जन्म झाला. मातृभाषेच्या हक्कासाठी दिल्या गेलेल्या या लढ्याची आठवण म्हणून युनेस्कोने २००० साली, २१ फेब्रुवारी हा दिवस मातृभाषा दिन म्हणून जागतिक पातळीवर साजरा करण्यास सुरुवात केली.

माणसाला सर्वात मोठा वारसा त्याची भाषा हाच असतो. आपण भाषांच्या जागतिक महत्वाबद्दल थोडा विचार करू. भाषेचे जागतिक महत्व ठरवण्याचा सर्वात मोठा निकष लोकसंख्येचे प्रमाण हा असतो. त्यानंतर इतर निकष म्हणजे त्या त्या भाषिक समुहातील ज्ञान, साक्षरतेचे प्रमाण, औद्योगिकरण, व्यापार, लष्करी ताकद, राजकीय दर्जा आणि त्या भाषेचा जगातल्या निरनिराळया प्रदेशांतला विस्तार ही होत.

जागतिक महत्वाच्या असलेल्या भाषा चिरकाल तशाच राहत नाहीत. अनेक भाषांचे महत्व कमी होते तर काही भाषा नष्ट होतात. २०१७ साली भाषातज्ञ डॉ गणेश देवी यांनी दिलेल्या अहवालानुसार जगातील ६००० भाषांपैकी ४००० भाषा संकटात आहेत. भारतातील ७८० भाषांपैकी ४०० भाषा येत्या पन्नास वर्षात नामशेष होतील.

आज युनोमध्ये वापरल्या जाणाऱ्या सहा जागतिक महत्वाच्या भाषांपैकी पहिली चिनी भाषा जगातले पंचवीस टक्के, इंग्रजी दहा टक्के, रशिया आठ टक्के लोक बोलतात. ह्यानंतर चौथा क्रमांक खरे तर हिंदीचा येतो जी सहा टक्के लोक बोलतात, परंतू हिंदीला युनोत स्थान नाही.

समजा बदलत्या परिस्थितीनुसार युनोने सहा ऐवजी मुख्य दहा भाषांना मान्यता द्यावी असा आग्रह कोणी धरला तर त्यात हिंदी बरोबर बंगाली आणि मराठी ह्या भारतीय भाषांना लोकसंखेच्या प्रमाणात जागतिक महत्वाच्या म्हणून मान्यता मिळेल.

आता आपण आपली मातृभाषा मराठी बाबत विचार करू या. महाराष्ट्र हा भाषांच्या बाबतीत अत्यंत समृध्द आहे. कारण मराठी ही आपली राजभाषा असली तरी बहुभाषिकता हे आपले वैशिष्ठ्य आहे. मराठीसह आदिवासी व भटक्या विमुक्तांच्या जवळपास सत्तर बोलीभाषा महाराष्ट्रांत आहेत.

मराठी भाषेची वीस रूपे महाराष्ट्रात बोलली जातात. त्यात वऱ्हाडी, कोहळी, नागपूरी, हलबी, झाडी, अहिराणी, डांगी, कोकणी, सामवेदी, आगरी, वाडवळी, संगमेश्वरी, चंदगडी या सारख्या भाषा आहेत.

भारतातील काही भाषांना केंद्र सरकारने “अभिजात भाषा” म्हणून मान्यता दिली आहे. खरं म्हणजे त्यासाठी आवश्यक असलेले निकष मराठी भाषेत आहेत. भाषा तज्ञांकडून तसा प्रस्ताव तयार करून महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला आहे परंतु अद्याप त्याला मान्यता मिळाली नाही. खरं म्हणजे केंद्र सरकार मध्ये असलेले महाराष्ट्रातील मंत्री, सर्वपक्षीय खासदार, आमदार यांनी एकत्र येऊन पाठपुरावा केला तर मराठी भाषेला “अभिजात भाषा” म्हणून मान्यता मिळू शकेल यात शंकाच नाही.

मातृभाषा ही प्रत्येक माणसाला अनासायासपणे मिळालेली देणगी आहे. त्यातूनच प्रत्येक माणसाची ओळख निर्माण होते. माणसाच्या आयुष्यात जेवढे आईला महत्व आहे तेवढेच मातृभाषेला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करण्यास लोकप्रतिनिधींना वेळ मिळत नसेल तर मराठी शिकवणारे शिक्षक, विद्यापीठांत मराठी शिकणारे विद्यार्थी, साहित्यिक यांनीच आपल्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा.

९६ वर्षांपूर्वी म्हणजे १९२६ साली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून विचार मांडतांना थोर साहित्यिक, विचारवंत राजवाडे यांनी मराठी भाषा लवकरच मरणार आहे म्हणजे नष्ट होणार आहे असे भाकीत केले होते परंतु कवी मोगरे यांनी आपल्या कवितेतून असे विचारले की आपली आई मरणासन्न असेल तर तिला औषध देऊ नये कां ? कवी मोगरे यांच्या विचारांशी सहमत असलेल्या मराठी जनांनी प्रयत्नरुपी औषध देऊन आपल्या मातृभाषारुपी आईला नुसतेच वाचवले नाही तर २००९ साली सातासमुद्रापार अमेरिकेत, जागतिक मराठी साहित्य संमेलन आयोजित करून मराठी भाषा किती समृध्द झाली हे दाखवून दिले.

राजवाडे यांनी केलेल्या वक्तव्याला २०२६ साली शंभर वर्ष होणार आहेत. येत्या चार वर्षात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि युनोमध्ये मराठी भाषेला प्रवेश मिळाला तर आपण आपल्या मातेला योग्य न्याय मिळवून दिला असे वाटेल.

भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करीत असताना हिंदी, बंगाली, मराठी भाषिकांनी आपल्या मातृभाषेला युनोत स्थान मिळवण्याचा प्रयत्न करून जागतिक मातृभाषा दिन साजरा करावा ही अपेक्षा.

दिलीप गडकरी

– लेखन : दिलीप प्रभाकर गडकरी, कर्जत जि.रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अतिशय सुंदर, सविस्तर लेख. मी पूर्णपणे सहमत आहे. धन्यवाद दिलीप गडकरी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित