Thursday, February 6, 2025
Homeयशकथायुवा उद्योजक : रवींद्र सासवडे

युवा उद्योजक : रवींद्र सासवडे

पर्यावरण पूरक गोष्टी देण्याचा ध्यास बाळगणारे व आपण पाणी तयार करू शकत नाही, पण ते वाचवू नक्कीच शकतो हा मूलमंत्र जपणारे पर्यावरण प्रेमी रवींद्र सासवडे यांची यशस्वी घोडदौड नक्कीच सर्वांना सकारात्मक ऊर्जा देणारी आहे.

रवींद्रजींना त्यांचे वडील नंदकिशोर गजानन सासवडे यांच्याकडून निसर्गावर प्रेम करण्याचे बाळकडू मिळाले. आई अंजली नंदकिशोर सासवडे यांस कडून उत्तम संस्काराची शिदोरी प्राप्त झाली. लहानपणापासून त्यांच्या घरात अतिशय शिस्तबद्ध वातावरण होते.

वडील पर्यावरण प्रेमी असल्याने पाणी वाचवणे, विजेचा योग्य व गरजेपुरता वापर करणे, झाडे लावणे, निसर्गाच्या सानिध्यात रहायला त्यांना आवडे. त्या वेळी ते जिथे रहात होते तिथे आठवड्यातून फक्त एकच दिवस पाणी येत असे. त्यामुळे ते जपून वापरण्याची सवय लागली. रोज सायकलवर पाणी आणून अंगणातील बगीचाची देखरेख केली.

रविंद्र सासवडे यांचा जन्म ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साताऱ्यात दिं.२७ सप्टेंबर १९८२ रोजी झाला. त्यांचे चौथी पर्यंतचे शिक्षण हत्ती खाना तर पुढील दहावी पर्यंतचे शिक्षण अनंत इंग्लिश स्कूल मध्ये तर डी जी कॉलेज मध्ये दुसऱ्या वर्षापर्यंत शिक्षण झाले.

पुढे त्यांनी कॉस्मेटिक्सचा व्यवसाय केला. मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही म्हणून एक दोन नोकऱ्याही केल्या. २००८ ते २०११ असे तीन वर्षे त्यांनी एम आय डी सी मधील युटोपिया सोलर कम्पनीत काम केले. येथील कामाचे त्यांना विशेष आकर्षण वाटले कारण ते निसर्गाशी जोडलेले होते. साहजिकच या क्षेत्राकडे त्यांचा कल जास्त वाढला.

निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. मात्र त्याचा योग्य वापर करणे हे आपले कर्तव्य आहे. आज देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पाणी, जगण्यासाठी लागणारा प्राणवायू याचा आज योग्य वापर केला तरच पुढील पिढीला अडचण येणार नाही असे विचार त्यांना स्वस्थ बसून देत नव्हते. यावर काम करायचे त्यांनी जणू ध्यास घेतला. आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम केल्याने आनंदाबरोबर समाधान ही मिळते.

“थ्री इडियट्स” या सिनेमातील त्यांच्या आवडीचे वाक्य म्हणजे “ऑल इज वेल”! कोणतेही काम लोकांना दाखवण्यासाठी न करता स्वतःच्या मनाचे ऐका, आपल्या हृदयाचे ऐका कारण इंग्लिश मध्ये अशी म्हण आहे, “Although heart is on your left it’s always right.”!

रवींद्रजींनी सुरवातीला भाड्याने जागा घेऊन सौर ऊर्जेचा वापर करून पाणी गरम करणे, सौर ऊर्जेवर चालणारे इन्व्हर्टर, लाईट्स अशा उपकरणाची निर्मिती केली. रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्व पटवून त्याची माहिती देऊन असे प्रकल्प ही केले.

व्यवसायात जम बसल्यावर त्यांनी २०१९ साली स्वतःची जागा घेतली. १९ जानेवारी २०१९ रोजी
गृह राज्यमंत्री श्री.शंभुराजे देसाई ह्यांच्या हस्ते दिमाखात उदघाटन करण्यात आले.

त्यावेळी उपस्थित नव ऊद्योजकांचे देखील सत्कार करण्यात आले. यावरून रवींद्रजींच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. मा.श्री.शंभूराजे देसाई यांनी रवींद्रजींचा कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तो त्यांच्या दृष्टीने एक अविस्मरणीय क्षण होता. त्यांच्या कष्टाचे सार्थक झाले होते. त्या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

“फ्युचर सोल्युशन” या नावाने हा व्यवसाय जोमाने सुरू आहे. स्वतःची जागा घेण्याची प्रेरणा पत्नी प्राजक्ता मुळे मिळाली याचा ते आवर्जून उल्लेख करतात.प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते हेच खरे !

त्यांच्या व्यवसाया बद्दल सविस्तर माहिती अशी की, सौर ऊर्जा हा एक शाश्वत स्त्रोत्र आहे. सौर ऊर्जा आता पर्यायी ऊर्जा राहिली नसून ऊर्जेचा शास्वत स्त्रोत्र बनली आहे. दररोज उगवणारा सूर्य हा आपली दैनंदिन विजेची गरज भागवू शकतो. फक्त गरज आहे ती नियोजित पद्धतीने सौर ऊर्जा आपल्या जीवनात आत्मसात करण्याची.

गेली दहा वर्षांपासून रवींद्रजी यावर काम करीत आहेत. रुटीन सोलर प्रॉडक्ट बरोबर, नवीन पी आय आर सोलर लाईट, सौर सीसीटीव्ही, सौर पंप, सौर कुंपण असे अनेक प्रॉडक्ट्सते देत आहेत.

पुढील काळ हा नक्कीच सौर ऊर्जेचा असणार आहे यात तिळमात्र शंका नाही. येणाऱ्या काळात सर्व वाहने बॅटरीवर व कालांतराने सौर ऊर्जेवर असतील हीच काळाची नितांत गरज आहे, असे त्यांचे मत आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे नक्की काय ? असे विचारल्यावर ते सांगतात की, आपल्या भागात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे आपल्या बोअरवेल व स्टोरेज मध्ये पुन:भरण करणे होय. यामुळे जुनी बोअरवेल असेल तर त्याला चांगले पाणी लागते आणि ते पाणी वर्षभर टिकून रहाते. तसेच ज्या बोअरवेल्स ड्राय पडल्या असतील तर त्या देखील पुनर्वापरात आणता येतात. यामुळे सोसायटी टँकरमुक्त होते.

प्रत्येक सोसायटीच्या छतावरचे अंदाजे २ लिटर पाणी जर जमिनीत मुरवले तर ८० कोटी लिटर पाणी जमिनीत मुरेल. हीच तर आजच्या आधुनिक काळाची व विचारांची वेळ आहे.

प्रत्येक सोसायटीला रेन वॉटर हार्वेस्टिंगचा खर्च अंदाजे ६००० ते १०,००० रुपये येतो. म्हणजे तुम्हीच पहा एक लिटर पाणी जमिनीत मुरवायचा खर्च ३ पैसे इतकाच आहे व ते आपण २० रुपयाला विकत घेतो. म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग मुळे दुहेरी फायदा होतो, तो म्हणजे पैसे ही वाचतात व या पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर होतो. शिवाय आपण निसर्गाचे मित्र बनतो हे एवढे सोपे गणित आहे.

रवींद्रजी सांगू इच्छितात की, आपण सर्वांनी हा संकल्प करू या की हे हजार लिटर पाणी जमिनीला परत देऊ यात कारण सलग दोन तीन वर्षे हे पाणी जमिनीत परत गेले तर विहिरीला अथवा बोअरला मुबलक पाणी असेल व पाणी कपातीची वेळच येणार नाही.

पाणी म्हणजे जीवन ! ज्या शिवाय जगणे अशक्य आहे. पुढील गैरसोय होऊ नये कोणत्याही गावात दुष्काळाची झळ बसू नये, कोणालाही पाण्यासाठी वन वन फिरण्याची वेळ येऊ नये असे वाटत असेल तर पाणी साठवण्याचा व वाचवण्याचा वसा घेऊ या व निसर्गाचे कर्ज फेडू यात निसर्गाचा समतोल राखू यात.

रवींद्रजींचा व्यवसाय आज संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारलेला आहे, त्यांचे काका कै. चंद्रकांत सासवडे यांच्याकडून व्यावसायिक होण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. लोकांशी प्रभावी संवाद साधणे, व्यवसायातील कौशल्य हे ते काकांकडून शिकले. काकांच्या अकाली जाण्याने न भरून येणारी पोकळी त्यांच्या जीवनात निर्माण झाली. त्यांचा विसर कधीच पडू शकत नाही असे ते म्हणतात.

वडिलांकडून शिस्त, कष्ट, प्रामाणिक काम तर काकांकडून मिळालेले व्यवहार ज्ञान हे त्यांच्या यशाचे रहस्य आहे.

मोटीव्हेशनल स्पीकर्स चे लाईफ सेमिनार्ज अटेंड करायला त्यांना खूप आवडते. त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा मिळते असे त्यांना मनापासून वाटते. व्यवसायात चढ उतार होत असतात. अशा वेळी निराश न होता चांगली पुस्तके वाचून अथवा सकारात्मक विचार व ऊर्जा देणारी भाषणे ऐकली की प्रेरणा मिळते. पुन्हा नव्याने काम करण्याची उभारी मिळते असा त्यांचा स्वानुभव आहे.

प्रवास करणे, बागकाम करणे, झाडे लावणे हे त्यांना आवडते. रवींद्रजींच्या कुटुंबात आई, पत्नी प्राजक्ता ही त्यांच्या कंपनीची मुख्य संचालक असून ती व्यवसायात देखील मदत करते. त्यांचा मुलगा नील पाच वर्षांचा असून मुलगी मृणाल सहावीत शिकत आहे.

पर्यावरण पूरक गोष्टी देण्याचा, त्या निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. शहरापासून ते खेड्यापर्यंत व्यवसायाच्या माध्यमातून पोहचण्याचा त्यांचा मानस आहे. सामान्य लोकांनाही परवडेल अशा नैसर्गिक उपकरणांची निर्मिती करण्याची त्यांची मनापासून इच्छा आहे.

निसर्गासोबत, निसर्गासाठी काम करण्याचा आनंद व समाधान त्यांना नित्य दिनी मिळत असते.

असे हे युवा उद्योजक आपल्या मित्रांना सांगू इच्छितात की, या व्यवसायात तरुणांना संधी आहे व प्रामाणिक कष्टाला यशाची झळाळी प्राप्त होते. धीराने व धैर्याने व्यवसाय केला की निश्चितच प्रगती होत जाते. संयम बाळगा, त्याचे फळ गोड असते.

मोठे झाड लगेच दृष्टीच पडते मात्र त्याचे प्रथम बी रोवावे लागते. नित्य नेमाने खत पाणी द्यावे लागते तेव्हा त्याचे एका सुंदर झाडात रूपांतर होते. मात्र त्याचे मूळ घट्ट रोवले असेल तर कितीही संकटे आली तरी ते झाड मोडत नाही, तुटत नाही. आपले विचार त्या भक्कम झाडाप्रमाणे असले पाहिजे. कोणत्याही बिकट परिस्थितीचा सामना न घाबरता, न डगमगता केला पाहिजे. अशा विचारांची ज्योत प्रत्येकाने व्यवसायात रुजवली पाहिजे.

अशक्य काहीच नाही फक्त ते शक्य करण्याचे सामर्थ्य तुमच्यात असले पाहिजे. रवींद्रजींचा व्यवसायिक प्रवास व यशस्वी वाटचाल पहाता हे सर्व त्यांना तंतोतंत लागू पडते असे मला वाटते.

रवींद्रजींच्या पुढील स्वप्नपूर्तीसाठी अनेक शुभेच्छा.💐

रश्मी हेडे

लेखन : रश्मी हेडे.
संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी