Saturday, March 15, 2025
Homeसाहित्ययेड्यागत कोसळतोय

येड्यागत कोसळतोय

येड्यागत करू ऱ्हायलाय
अगदी लेकाचा

मानेतून दाव सोडवून
उंडारनाऱ्या गोह्यागत

सडाला सोकवल्या कारवडीगत
हुंदडतोय हिकडून तिकडं
आन तिकडून हिकडं

डावीकडून उजवीकडं
उजवीकडून डावीकडं

पूर्वकडून पश्चिमेकडं
पश्चिमेकडून पूर्वकडं

उत्तरेकडून दक्षिनेकडं
दक्षिनेकडून उत्तरेकडं

धबधब पडतोय
डोक्यावर पडल्यागत

डोक्यावर पडू ऱ्हायलाय रपारपा
उडवून दिल्यात शेतकऱ्यांच्या झोपा

पुढाऱ्यांच्या टोप्या
पाखराचा खोपा

घरंगळतोय दरडीगत
बे एके बे बनवून पडतोय

बेहिशेब, बेभान,
बेलगाम, बेजबाबदार

बेहया, बेतहाशा, बेमुरवत,
बेपनाह, बेमालूम
बेची रास करतोय,

बेचिराख करतोय
झोपड्यात शिरतोय

उभ्या चिरतोय
वासे रचतोय चितेवर

गावागावात आदेश डखवत
डंख माराल्यागत
डुख धरल्यागत

पाणी न मुरवणाऱ्याला
पाण्यागत पैसा मिरवणाऱ्याला
पाणी पाजू…न पाजून मारतोय

कसला काय अवकाळी बिवकाळी
त्यो त्याच्या मर्जीचा रखवालदार

कोनाला का भेनार !
समद्यासनी भेववनार

हवेचं रूप घिऊन उडनार
हवा लागली का उतरनार

आमच्या आवतनानं का येनार ?
आवतन कसलं !
आम्हीच तं हाकलतो त्येला

लय झालं म्हणतो, जा..
झाली ज्यादा दोन मापट
का आम्ही तर्राट
च्यायला हाय काय आन नाय काय

कोन आलं आन कोन गेलं
आमचं काय गेलं
आलं की आमच्या आता पोत्यात

कुठं हाय धरबंधन आम्हाला
इज वापरायची आकडा टाकून
आन पानी वापरायचं आडवा हात करून

आय माय वर नाय भागलं का द्याचं भोसकून
आपलंच डोस्क ठिकानावर नसल्याल्याच्या
डोक्यात गेला का टाकला भाजून

कांद्यावानी नाय त भरताच्या वांग्यावानी
डोळ्यात उतरली का
घातला हात पटकुराला

म्हाभारतात बी झालतं की
हावस बघत न्हाय पुनव का आवस
येळ लागतो का हैवान बानायला मानूस

कसला आला पानी आन पाऊस
तुम्ही कस्स बी वागायचं
तुम्हीच बिघडवायच सारं काय

तो तुमची पाप धुयाला आला
का म्हणायचं टकुर फिरालया
त्याचं का तुमचं च्यायला…

सुधीर ब्रह्मे

– रचना : सुधीर ब्रह्मे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments