स्वास्थ्य हा तर प्रत्येकाचा
मूलभूत अधिकार !
सुजन हो, करा तुम्ही
योगाचा स्वीकार ||१||
मिळविण्या मनाची शांती,
करा नित योगाची भक्ती
यमनियमादी अष्टांगासह
साधा योगाचार ||२||
करा योगाचा स्वीकार !
लावण्या शरीरास शिस्त
करावी योगाची शिकस्त
सूर्यनमस्कार घालूनी बारा
होऊ द्या ऊर्जेचा संचार ||३||
करा योगाचा स्वीकार !
रोज करा तुम्ही कपालभाति।
लाभेल तजेला सतेज कांती।
अनुलोम अन् विलोमे साधा
प्राणांचा विस्तार ||४||
करा योगाचा स्वीकार !
देह असे सिद्धीचे साधन
राखा सुदृढ अपुले तनमन
दिव्य ठेव ही जपा निरंतर
करूनी योगाचा स्वीकार ||५||
करा योगाचा स्वीकार !
देही वसति व्याधी अगणित
म्हणूनी करा आसने नियमित
“विहार प्रचुर, आहार सीमित”
हा सुज्ञांचा सुविचार ! ||६||
करा योगाचा स्वीकार !
योगासने स्वास्थ्याचे इंगित,
करूनी सुजन हो साधा स्वहित,
आरोग्याचे मग सुटेल गणित
जीवनी येईल सौख्यबहार ! ||७||
करा योगाचा स्वीकार!
योग असे हे अपुले दर्शन
अपुले हे विज्ञान प्राचीन
राष्ट्राचा अभिमान चिरंतन
ऋषिमुनींचा संस्कार ||८||
सुजन हो ! करा तुम्ही योगाचा स्वीकार !

– रचना : डाॅ. स्मिता होटे.