आपल्या पोर्टल वर, आज डोंबिवली येथील कवयित्री सौ योगिनी पंडित यांच्या काही कविता प्रसिद्ध करीत आहे.
सौ योगिनी पंडित यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात मनःपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा .
— संपादक
1. आई…. जन्मदात्री अन् सखी
तिच्या पोटी जन्म घेतला म्हणून तिला आई म्हणते; पण आई असली तरीही ती जास्त मैत्रिण वाटते.
कळत्या वयापासूनच प्रत्येक गोष्ट तिला सांगितल्याशिवाय राहावत नाही; तिच्यापाशी मन मोकळे केल्याखेरीच काही चैन पडत नाही.
तिचे आश्वासक शब्द आणि मायेने डोक्यावर फिरवलेला हात मनाला बळ देतो; प्रत्येक भूमिका यशस्वीपणे पार पाडताना तिचा आदर्श समोर असतो.
तिच्या पाऊलावर पाऊल ठेऊन आजवर विश्वासाने चालत आहे; कारण खात्री असते की ही वाट नक्कीच निर्धोक आहे.
तिची तत्व आचरताना मनात कुठलाही किंतू नसतो; ठाम विश्वास असतो कुठल्याही कृतीने कधीही अपराधीपणा वाटणार नसतो.
तिची आठवण येत नाही असा एकही क्षण जात नाही; मुळात आठवण यायला ती माझ्या मनापासून कधीच दूर जात नाही.
खचलेल्या मनाला उभारी देण्याची तिच्याकडे कला आहे; तिच्या संस्कारांचे आचरण हीच माझी तिच्यावरची श्रद्धा आहे !
2. वास्तव
परिस्थितीचे फटके अन् अनुभवाचे चटके खूप काही शिकवतात.
विचारांच्या अंधारावर मात करून कृतीचा लख्ख मार्ग दाखवतात.
त्यातून बोध घेतला तर मनातला गोंधळ शांत होतो.
भरकटलेल्या विचारांवर संयम ठेवता येतो.
सैरभैर मनाला काबूत आणता येते.
मन भानावर आले की विचारांवरचे मळभ दूर होते.
पारदर्शी विचार करून निष्कर्षावर पोहोचताना बुद्धीचा कस लागतो.
विचारपूर्वक कृती करता येते; कारण कृतीनंतर विचार कामाचा नसतो.
3. आत्मपरीक्षण
वास्तवाचे भान आणि परिस्थितीची जाण;
कर्तव्याच्या मार्गावर चालायला शिकवते.
पल्ला कितीही लांबचा असला अन् मार्ग कितीही खडतर असला तरीही;
खंबीरपणे मार्ग शोधायला बळ देते.
वाकडी वळणे आली तरी वाम मार्गापासून लांब ठेवते; कसोटीच्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जायला येते.
अवघड वाटेवर संयमाने चालता येते; मनाचा तोल ढळू न देता ध्येयाची दिशा शोधता येते.
निःशब्द राहून ठाम कृतीतून व्यक्त होता येते; टिकास्त्राने घायाळ न होता ध्येयाकडे आगेकूच करता येते.
संकटसमयी खचून न जाता पाय घट्ट रोवून उभे रहाता येते; कुठल्याही प्रसंगी चांगुलपणाची कास सुटत नसते.
स्वतःच्याच विचारांशी संघर्ष करून; मनावर ताबा मिळवता येतो, चढाओढ अन् असूयेपासून स्वतःला वाचवता आले की विजय तर आपलाच असतो.
माघार घेतली तरी हार नसते; ताठ मानेने सामोरे जाता येते, वेळ कितीही वाईट असली तरीही; विसरायचे नसते की रात्रीनंतर सकाळ क्रमप्राप्त असते.
हरूनही जिंकता येते कारण जिंकणारा जिंकून हरलेला असतो, न्याय मिळाला नाही वाटले तरी, वरच्याकडे हिशोब चोख असतो.
4. मनिषा
पूर्व जन्माची पुण्याई असावी;
म्हणून तिच्या उदरी जन्म घेतला,
तिने दिलेल्या संस्काराची भेट;
अमूल्य ठेवा म्हणून आजवर जपला.
तिने घालून दिलेल्या आदर्शांच्या पावलांवर;
पाऊल ठेऊन चालले,
चांगुलपणाच्या वशाचे वाण;
कधीच नाही टाकले.
पेरलं तसं उगवतं म्हणतात ना;
नेहमीच चांगलंच पेरत आले,
पण कळलेच नाही कुठल्या झंझावातात;
सगळे काही कधी उन्मळून पडले ?
आपले आपले म्हणता म्हणता;
रक्ताची नाती परकी झाली,
सच्चेपणाचा व्यवहार करता करता;
सगळं कधी गमावलं ते कळलंच नाही.
“ती” नेहमी म्हणते; माणसाला दया येवो न येवो;
देव मात्र नक्कीच निष्ठुर नाही,
त्यालाच साक्षी ठेवून मागणे मागते;
जिच्या कुशीत प्रथम डोळे उघडले; तिच्याच मांडीवर शेवटचा श्वास घेईन !
5. खंत
आयुष्य भरभरून जगायचं होतं, नाईलाजाने जगवायचं नव्हतं.
भावनांचं भांडवल करायचं नव्हतं, पण भावनिक गुंतवणुकीवर जगायचं होतं.
मुद्दल शेवटपर्यंत शिल्लक ठेवून, गुंतवणुकीचं व्याज पुरवायचं होतं.
आयुष्यभराच्या ह्या गुंतवणुकीचा वारसा भरभरून पुढे द्यायचा होता,
एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अखंड तो ठेवायचा होता.
व्याजाचं तर सोडूनच द्या; पण मुद्दलाचीही इथे किंमत नाही,
कितीही मोठ्या ह्या गुंतवणुकीला कुणीही विचारत नाही.
वाटलं नाही कधीच की ह्या गुंतवणुकीचं व्याज शून्य आहे,
एवढंच नाही तरं मुद्दलाचीही किंमत अगदीच न्यून आहे.
गुंतवणुकीची ही बँक डबघाईला आली आहे,
व्याजाचं तरं सोडूनच द्या पण मुद्दल सुद्धा बुडीत खात्यात आहे.
6. जुगलबंदी….बुद्धी आणि मनाची
मनाची आणि बुद्धीची एकदा चांगलीच जुंपली; बघता बघता वादावादी हमरीतुमरीवर आली,
कोणीही पडतं घेईना; भांडण काही संपेना.
श्रेष्ठत्वाचा मुद्दा; दोघांनीही लावून धरला,
बुद्धीच्या हट्टापुढे; मनाने समजुतीचा पवित्रा घेतला.
मन म्हणाले बुद्धीला; तुझे पुस्तकी ज्ञान दर वेळी नाही येत कामाला,
माझ्या अनुभवाची शिदोरी असेल जोडीला; तरच कामे नेता येतात तडीला.
बुद्धी तणतणत पुढे आली; मनाला लांब ढकलत म्हणाली,
तुझी किंमत कवडीमोल; फक्त धनवानचं पेलू शकतात माझे मोल.
मनाने बुद्धीला जे उत्तर दिले; ते ऐकून तर तिचे अवसानचं गळाले,
नको दाखवूस खोटा तोरा; कारण गरिबाच्या घरातही निपजतो ज्ञानाचा अनमोल हिरा.
रागाने लालबुंद होऊन; बुद्धी बोलली मनाचा पाणउतारा करून,
तू तर एकदम कुचकामी; माझ्या जोरावरचं असते पैसे कमविण्याची हमी.
मनाने स्मितहास्य केले; आणि बुद्धीला ते उत्तरले,
अगं वेडे इतके साधे कसे कळतं नाही तूला; तू कधीही नकोस पेटू इरेला !
जेंव्हा जवळ करशील तू अहंकाराला; वळतील तुझी पाऊले आपोआपच अधोगतीला,
तू आहेस अमूल्य ठेवा; म्हणूनच तुझा विनियोग सत्कारणी करावा.
तुझ्यावर चढलेली अविचाराची जळमटे झाडून टाक; अन् माझ्याशी घट्ट मैत्री करून विश्वासाने पाऊल पुढे टाक,
तल्लख बुद्धीला मिळेल जेव्हा निर्मळ मनाची अजोड साथ; अशक्य गोष्टीही निःसंशय उतरतील सत्यात !
एकमेकांसोबत सावलीसारखे राहू; सुखदुःखांच्या खेळांना विश्वासाने सामोरे जाऊ,
कुठ्ल्याही परिस्थितीत अचल राहू, परिस्थितीला धैर्याने तोंड देऊ.
खात्रीने सांगते; अपयश कधीही धाडस करणारं नाही; करण्याचे आपल्याशी दोन हात,
जरी त्याने वार केला तरी; परतून लावू आपण दोघे मिळून तो, बोल तयार आहेस का द्यायला मला आयुष्यभर साथ ?
7. “संसार…. सचोटीची कसोटी”
कालपर्यंतची कुमारिका; आजपासून सौभाग्यवती होते,
आईबाबांच्या लाडक्या लेकीचे; माहेराचा निरोप घेऊन सासरी पदार्पण होते.
आप्तांच्या उपस्थितीत; अन् सनई चौघड्याच्या सूरात,
दोन अनोळखी जीवांचे मीलन; पतीपत्नीचा नात्याने नावारूपाला येते.
गौरीहार नि मंगलाष्टकांच्या साक्षीने; वैवाहिक आयुष्याची वाटचाल सुरू होते,
सप्तपदींच्या सात पावलांनी; साता जन्मीच्या साथीची वचनबद्धता येते.
बोहल्यावर चढल्यापासून; संसाराचा प्रवास सुरू होतो,
एकमेकांचे सूर ताल समजून घेताना खरा कस लागतो.
पवित्र अन् नितळ पतीपत्नीचे हे नाते,
असावे आरशासारखे पारदर्शी लखलखते.
दुभंगते निर्मळ नि निस्सीम असे हे नाते,
भौतिक सुखांसारख्या अशाश्वत गोष्टींना जेव्हा अवाजवी महत्व येते.
“मी”पणाच्या अन् स्वार्थाच्या गर्दीत हरवते हे नाते,
आपले न वाटता अहंपणा स्थिरावतो जेव्हा तेथे.
नात्याच्या कर्तव्याचा आणि जबाबदारीचा; मेळ दोघांनी घालावा,
मानपानाचा अन् हेव्यादाव्याचा गळफास न बसावा.
मतभेदाच्या भोवऱ्यात कधी न फसावे,
तात्विक वाद आणि व्यावहारिक गुंते अलगदपणे सोडवावे.
नात्याच्या समतोलाचा ताळमेळ दोघांनी मिळून घालावा,
अपेक्ष्यांच्या ओझ्याखाली कुण्या एकाचा जीव न घुसमटावा.
रणरणत्या उन्हात सावलीखाली शरीर सुखावते,
एकमेकांच्या आश्वासक शब्दांनी अस्वस्थ मन स्थिरावते.
शब्दांच्या एकाच घावाने ते उन्मळून पडते,
आपुलकीच्या फुंकरीनेही त्याला उभारी येते.
एकमेकांच्या साथीने संसाराचे गाणे सुरेल वाटते,
प्रेमाच्या घट्ट रेशमी धाग्यांनी विणले ते; तर उबदार होते.
असे हे नाते जन्म-जन्मांतरीचे,
जीवात जीव असेपर्यंत मी निभाविन ते.
8. तूच आहेस तुझ्यासाठी
सुख घेता आले पाहिजे; सुख देताही आले पाहिजे,
कुठल्याही परिस्थितीत सुख शोधता आले पाहिजे.
प्रत्येकाला संधी मिळत असते; फक्त डोळसपणे बघता आले पाहिजे,
आलेल्या प्रत्येक प्रसंगाला आव्हान म्हणून स्विकारता आले पाहिजे.
प्रत्येकाची वेळ येत असते; फक्त मेळ घालता आला पाहिजे,
जे नाही त्यासाठी हताश न होता; आहे त्यात समाधान मानता आले पाहिजे.
एक वाट बंद झाली तरी; वेगळ्या वाटा बुद्धी स्थिर ठेवून शोधता आल्या पाहिजेत,
होणाऱ्या टीकांनी खचून न जाता प्रत्येक प्रसंगाला धीराने सामोरे जाता आले पाहिजे.
तो संकटे देत असला तरी त्यावर मात करण्याची क्षमता पण अंगी देत असतो; फक्त ती जागृत करता आली पाहिजे,
स्वतःच स्वतःचा आधार बनून, आपली ताकद वाढवता आली पाहिजे.
कटू आठवणींना मागे टाकून; सुंदर आठवणी तयार करण्याचे अथक् प्रयत्न करता आले पाहिजेत,
घ्यायला तर सगळ्यांनाच आवडते पण; देण्याचीही मानसिकता असली पाहिजे.
लाभलेल्या मनुष्य जन्माचे सार्थक करता आले पाहिजे;
कुणासाठी प्रेरणा होता येईल का हे माहीत नसले तरी विश्वास बनता आले पाहिजे.
9. वाढदिवस….. एक नवा अध्याय
गतं वर्ष सरलं खरं पण; बरचं काही बाकी उरलं,
मागे वळून पाहताना; वर्षभराचं चित्र डोळ्यांपुढे तरलं.
उरल्या सुरल्याचा हिशेब मांडताना; भूतकाळात मन रमलं,
आठवणींची गोळाबेरीज करता करता; मन सैरभैर होऊन गेलं.
आयुष्याच्या कॅलेंडरचं; आणखी एक पान उलटलं,
मनाच्या रोजनिशीचं; नवीन एक पृष्ठ भरलं.
बऱ्यावाईट अनेक अनुभवांनी; ओंजळ गच्च भरून गेली,
शिकवणींची शिदोरी देऊन गेली; पण मनाला चटके लाऊन गेली.
किती उरलं अन् किती सरलं; ठोकताळा बांधताना दमछाक झाली,
काय देऊन गेलं; काय घेऊन गेलं, याची गोळाबेरीज अवघड गेली.
व्याकूळ करणाऱ्या आठवणींनी; हुंदका दाटून आला,
पण नूतन वर्षाच्या आगमनाने; मनाला नवीन हुरूप आला.
पुन्हा सकाळी उगवण्यासाठी; सुर्यालाही मावळणे क्रमप्राप्त आहे,
कालचा दिवस मागे सोडून; उद्याचे स्वागत करणे; हेच तर आयुष्याचं वास्तव आहे!
10. तूच आहेस तुझ्यासाठी
सुख घेता आले पाहिजे; सुख देताही आले पाहिजे,
कुठल्याही परिस्थितीत सुख शोधता आले पाहिजे.
प्रत्येकाला संधी मिळत असते; फक्त डोळसपणे बघता आले पाहिजे,
आलेल्या प्रत्येक प्रसंगाला आव्हान म्हणून स्विकारता आले पाहिजे.
प्रत्येकाची वेळ येत असते; फक्त मेळ घालता आला पाहिजे,
जे नाही त्यासाठी हताश न होता; आहे त्यात समाधान मानता आले पाहिजे.
एक वाट बंद झाली तरी; वेगळ्या वाटा बुद्धी स्थिर ठेवून शोधता आल्या पाहिजेत,
होणाऱ्या टीकांनी खचून न जाता प्रत्येक प्रसंगाला धीराने सामोरे जाता आले पाहिजे.
तो संकटे देत असला तरी त्यावर मात करण्याची क्षमता पण अंगी देत असतो; फक्त ती जागृत करता आली पाहिजे,
स्वतःच स्वतःचा आधार बनून, आपली ताकद वाढवता आली पाहिजे.
कटू आठवणींना मागे टाकून; सुंदर आठवणी तयार करण्याचे अथक् प्रयत्न करता आले पाहिजेत,
घ्यायला तर सगळ्यांनाच आवडते पण; देण्याचीही मानसिकता असली पाहिजे.
लाभलेल्या मनुष्य जन्माचे सार्थक करता आले पाहिजे;
कुणासाठी प्रेरणा होता येईल का हे माहीत नसले तरी प्रत्येकाचा विश्वास बनता आले पाहिजे.
11. विधिलिखित
एक अनपेक्षित घाव असा वर्मी बसला की, मन पूर्णपणे उन्मळून पडलं.
कदाचित हेच गरजेचं होतं कारण, कोसळल्यानंतरच एकाकी मनाला स्वतंत्रपणे उभं करणं विधिलिखित होतं.
त्यामुळेच जाणिव झाली की, आपलं आपलं वाटणं किती चुकीचं होतं.
मागे वळून पाहिल्यानंतर उमगलं की, हे तर नात्यांचं मृगजळ होतं.
एवढही विस्कटायला नको होतं की; आवरण अशक्य होतं.
इतकंही बिघडायला नको होतं की; दुरुस्त होणं दुरापास्त होतं.
कोसळवणारा कोसळवून जातो पण; आठवणींचा पसारा आवरताना आवरणारा कोलमडून पडतो.
प्रश्नांच्या गर्दीत घुसमटलेल्या मनाला भानावर आणणं खूप अवघड होतं.
असंख्य प्रश्नांनी तुटून पडलेल्या मनाची समजूत काढताना गलबलून येतं.
विखुरलेल्या भावनांची जुळवाजुळव करताना मन व्याकुळ होतं.
आपुलकीच्या मुलायम धाग्यांनी घट्ट विणलेल्या नात्यांची ऊब सुखावून जाते.
नाहीतर रुक्ष कोरड्या भावनाहीन नात्यांचे ओझे वाहताना दमछाक होते.
प्रेमाने वाट्याला आलेला घासातला घास जिवाला जीव लावतो.
दिखाऊ नात्यांच्या व्यवहाराच्या विळख्यात जीव गुदमरून जातो.
12. “ती” ची शक्ती
“स्त्रीत्चाचा” उत्सव नको; नको नारीचा जयजयकार,
जाणीव असावी तिच्या दातृत्वाची; न व्हावी तिची अवहेलना वारंवार.
नका दाखवू दया तिला; फक्त आदर असू द्या तिच्या निःस्वार्थी त्यागाचा,
सन्मान करा तिच्या विलक्षण शक्तीचा; वाढविते उदरात दुसरा जीव होऊन उदार जीवावर स्वतःच्या.
विसर नका पडू देऊ तिच्या अस्तित्वाचा; लक्षात असूद्या जगात येणे तुमचे तिच्याकडे आहे उधार,
जाणिव ज्यास नसेल तिच्या मातृत्वाच्या ऋणाची; होऊ द्या त्या स्वार्थीपणाचा धिक्कार.
जरी नाही व्यक्त केली कृतज्ञता कन्या, बहिण, आई अन् बायको ह्या नात्यांना; यथायोग्य न्याय द्या ह्या नात्यांच्या प्रेमाला,
लक्षात असूद्या अस्तित्वच मुळात आहे तुमचे “ती” च्यामुळे; सलाम करा त्या “स्त्री” शक्तीला. 🙏

— रचना : योगिनी पंडित. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
