“मराठी रंगभूमी आणि अँब्सर्ड थिएटर” तसेच “मराठी रंगभूमी : चर्चा आणि चिंतन” या दोन्ही नाट्यसमीक्षा ग्रंथांचे प्रकाशन नुकतेच वर्धा येथे झाले.
हे दोन्ही ग्रंथ मराठी नाट्य समीक्षेचा प्रांत समृद्ध करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे समीक्षा ग्रंथ असून; नाट्य अभ्यासक, नाट्य समीक्षक, नाट्य संशोधक, नाट्य कलावंत या सर्वांसाठी उपयुक्त ठरणारे आहेत. हे ग्रंथ वगळून कुठलीही नाट्य समीक्षा, नाट्य अभ्यास आणि नाट्य संशोधन पुर्णत्वास जाऊ शकणार नाही, एवढे ते मौलिक नाट्यसमीक्षा ग्रंथ आहेत असे मत महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष, कादंबरीकार तथा अ. भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी स्वागताध्यक्ष श्री लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रसिद्ध लेखक, समीक्षक आणि कादंबरीकार प्रा. अविनाश कोल्हे, विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध कवयित्री, समीक्षक डॉ. पद्मरेखा धनकर तर भाष्यकार म्हणून डॉ. राजेंद्र मुंढे, प्रा. प्रसेनजीत तेलंग उपस्थित होते.
श्री देशमुख पुढे म्हणाले, डॉ. सतीश पावडे हे एक प्रतिभासंपन्न नाट्यकलावंत आहे. त्यामुळे त्यांची नाट्यसमीक्षा ही अधिक सखोल, व्यासंगपूर्ण आणि उपयोजित स्वरूपाची आहे. महात्मा फुले हे मराठी सामाजिक व विद्रोही नाटकाचे जनक आहेत. तर विजय तेंडुलकर हे मराठीचे सर्वश्रेष्ठ प्रायोगिक नाटककार आहेत व नाट्ककारांच्या किमान पुढील तीन पिढ्या त्यांच्या वाटेवरून पुढे जात त्यांनी आजचा आधुनिक मराठी रंगमंच घडविला असल्याचे डॉ. पावडेंनी ग्रंथाच्या माध्यमातून तर्कशुद्धपणे सिद्ध केले आहे.
अध्यक्षपदावरून बोलताना प्रा. अविनाश कोल्हे म्हणले, मराठी रंगभूमीचा इतिहास हा प्रभावांचा इतिहास आहे. मराठी रंगभुमीने हा प्रभाव पचवून, परिष्कृत करुन पुढे त्याला अस्सल मराठी बाज चढवून नवता आणि प्रयोगशिलता सिद्ध केली. ‘मराठी रंगभूमी : चर्चा आणि चिंतन’ या ग्रथांत अशा अनेक अस्पर्शित विषयांची डॉ. पावडे यांनी चिकित्सा केली आहे. ‘मराठी रंगभूमी आणि अँब्सर्ड थिएटर’ हा त्यांचा ग्रंथही प्रादेशिकतेच्या सीमा ओलांडून वैश्विकतेचा परिप्रेक्ष्य मांडतो, हे या पुस्तकाचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. समकालीन रंगभूमीची साक्षेपी समीक्षा करणारी डॉ. सतीश पावडे यांची ही दोन्ही पुस्तके अत्यंत महत्वाची आहेत. डॉ. पावडे हे व्यासंगी आहेत, अभ्यासू आणि परिश्रमी आहेत. लेखक, कलावंत, समीक्षक म्हणूनही जिद्द, चिकाटी आणि समर्पण वृत्तीने ते सर्जनशील प्रक्रियेत रमतात. त्यातूनच या पुस्तकांची निर्मिती झाली आहे. रंगभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी अशा समीक्षापर पुस्तकांची नितांत गरज आहे.
मराठी रंगभूमीच नाही तर अँब्सर्ड नाटकांचा सखोल, संशोधकवृत्ती व चिकित्सक दृष्टीने मांडलेला एक मोठा अवकाश डाँ. सतीश पावडे यांच्या ‘मराठी रंगभूमी चर्चा आणि चिंतन’ व ‘मराठी रंगभूमी आणि अँब्सर्ड थिएटर’ या दोन्ही समीक्षाग्रंथात सामावलेला आहे. हे दोन्ही ग्रंथ नवीन पिढीतील अभ्यासकांसाठी व रसिकांसाठीही एक संचितच आहे, असे मत डॉ. पद्मरेखा धनकर यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रा. प्रसेनजित तेलंग ग्रंथाविषयी भाष्य करतांना म्हणाले, “मुखवटे घालून वावरणाऱ्या समाजाची कलात्मक अभिव्यक्ती म्हणजे प्रस्थापित साहित्य कृती, पण या मुखवट्याआडचा खरवडून अनावृत्त केलेला चेहरा म्हणजे अँब्सर्ड नाटक होय. खरं तर हेच मानवी जगण्याचं सत्य आहे, पण सत्य स्वीकारण्यास नेहमीच अनुत्सुक असलेल्या समाजाला हा आपलाच चेहरा विसंगत वाटतो. सुसंगत विसंगती हेच आपले जगणे, ही विसंगतीच अँब्सर्ड नाटकाचा विषय आहे. “मराठी रंगभूमी आणि अँब्सर्ड थिएटर” या ग्रंथात आपले अत्यंत व्यासंगपूर्ण आकलन डॅा. सतीश पावडे यांनी मांडले आहे. म्हणून या ग्रंथांचे नाट्य समीक्षेच्या क्षेत्रातील स्थान अनन्यसाधारण राहणार आहे.
डॉ. राजेद्र मुंढे म्हणाले, डॉ. सतीश पावडे यांनी आपल्या “मराठी रंगभूमी : चर्चा आणि चिंतन” या पुस्तकात महात्मा फुलेंच्या विचार सुत्रानुसार मराठी नाटयसमीक्षा लिहिली असून तृतीय रत्न नाटक हेच प्रथम सामाजिक नाटक आहे, हे साधार मांडले आहे. त्यांची समीक्षा ही संशोधनात्मक नाट्यसमीक्षा आहे. मराठी रंगभूमीच्या नाट्यसमीक्षेची नवी क्षितीजे विस्तारणारी नाट्यसमीक्षा म्हणून डॉ. पावडेंच्या नाट्यसमीक्षेकडे बघावे लागेल.
याप्रसंगी लक्ष्मीकांत देशमुख यांचा महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच डॉ. सतीश पावडे यांना जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाल्याबद्दल सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच शिवार संमेलानाचे अभिनव आणि यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल सकल्पिका आणि संयोजिका डॉ. रत्ना चौधरी नगरे यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रारंभी अतिथींचे स्वागत रंजना दाते, कवीवर्य संजय इंगळे तिगांवकर, राजू बावने, आयुषी चांदेकर, अश्विनी रोकडे, नीरज आगलावे यांनी केले. सदीच्छा संदेशांचे वाचन अनीता कडू तर सन्मानपत्रांचे वाचन पल्लवी पुरोहित यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक यशंवंतराव दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी केले. संचालन प्रसिद्ध निवेदिका आणि कवयित्री ज्योती भगत यांनी तर आभार संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे कार्याध्यक्ष नंदकुमार वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन प्रदीप दाते, डॉ. राजेंद्र मुंढे, कवीवर्य संजय इंगळे तिगांवकर, डॉ. रत्ना चौधरी नगरे, नंदकुमार वानखेडे, राजु बावने, आयुषी चांदेकर, अश्विनी रोकडे, नीरज आगलावे, अनीता कडू,ज्योती भगत, अनीता कडू, पल्लवी पुरोहित आदिंनी केले.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800.