सकाळची प्रसन्न वेळ. ॲाक्टोबर महिन्याचे दिवस असल्याने हवेत तसा गारवा होता. पण समोर चमकणारं उन आणि निरभ्र निळंशार आकाश पाहून फारच सुखदायक वाटत होतं. आज चक्क गाडी चालवताना या सर्व गोष्टी मी पाहू शकत होते. याचं माझं मलाच हसू आलं. मन जरा शांत असलं की कोणाच्याही बाबतीत अशी किमया घडतेच की ! त्यात आश्चर्य काहीच नाही.
गाडी रस्त्यावरची वळणे घेत सुसाट चालली होती. हा सर्व सुरेख नजारा न्याहाळत जाताना फारच मजा वाटत होती. निसर्गाचं चक्र अजब आहे. त्याला कोणी ॲाक्टोबर महिना आला बरं का ! असं सांगत नाही पण तो आपला कायम कोणत्याही बदलासाठी तयारच असतो. थंडी येऊ लागते तसे पानांचे रंग बदलू लागतात. हिरव्या रंगात किंचीत पिवळसर छटा येऊ लागते. पाने, झाडे थोडी कोरडीही वाटू लागतात.
मी बाहेर पहात होते. झाडांची संपूर्ण रांग पिवळसर, हलका केशरी, मधेच तांबूस, तपकिरी आणि अजुनही काही ठिकाणी हिरवा अशा रंगात खुलून दिसत होती.
आता निरभ्र आकाशाची जागा चक्क धुक्याने घेतली होती.
एका वळणावर थांबून पुढची वाट अलगद धुक्यात हरवली होती. थोडासाच रस्ता दिसत होता. पुढे काय कसे असेल याचा अंदाज लागत नव्हता. शंकेखोर मनाने लगेच आतल्या आत संवाद करायला सुरवात केली. शी ! आत्तापर्यंत तर सगळं छान होतं, आता हे काय ? आकाशही दिसत नाही. तरी थोड्या अंतराच्या पलिकडे धुक्याच्याही पुढे थोडा प्रकाश दिसत होता. नाही असं नाही. मगाचचं निरभ्र आकाश दिसेनासं झालं. माझं मनही नकळत थोडं सैरभैर झालं. खरं सांगायचं तर ती धुक्यात हरवलेली वाटही आपल्याच मस्तीत हरवल्यासारखी, झाडापानांना वेढून अशी शांत बसली होती. ते ही दृष्य सुंदरच होतं.
झिरझिरीत धुक्यातून थोडा प्रकाश झिरपत होता.
एक छानसं अच्छादन आभाळानी घालावं ना तसं काहीसं वाटत होतं.
२०/२५ मिनिटांच्या प्रवासात आत्तापर्यंत निसर्गाच्या किती छटा पहायला मिळाल्या नाही ? अगदी अनोख्या.
तसचं पुढे जात राहीले आणि अचानक धुक्याचा पदर उलगडला गेला. पुन्हा स्वच्छ आभाळ फाकले होते. पुन्हा लालचुटूक झाडे दिमाखात उभी असलेली दिसत होती.
मगाचची तगमग शांत होऊन पुन्हा काहीसं शांत वाटत होतं.
हे सारे बाह्य गोष्टींचे खेळ म्हणावे की माझ्या मनाने त्यांना दिलेला प्रतिसाद ? खरंतर धुक्याच्या पलिकडे प्रकाश थोडासा का होईना दिसत होता पण माझं मन मात्र त्या धुक्यावरचं खिळलं होतं ? आणि मनातल्या नाराजीने त्यातलं सौदर्य टिपू शकत नव्हतं.
आपल्या आयुष्यात असेच रंग भरून असतात. घडणाऱ्या घटना धडत असतात. उन पाऊस, प्रकाश झाकोळ हे चालूच असतं. बदलणं हा तर निसर्गाचा स्थायी भावचं. आणि बदल नसेल तर वैविध्य तरी कसं येणारं ? नवनिर्मिती कशी होणारं ? अशा अनेक घटनांचं मळभ दाटून येतं आणि माणूस गलितगात्र होऊन जातो. आता हीच आपली स्थिती अशी समजूत करून घेतो. असे करण्याची काहीशी सवयच आपल्याला जडली आहे.
संपूर्ण जग धुक्याने भरले आहे असे कधी झाले आहे का ? कुठे तरी उन कुठेतरी धुके असणारच ना ? रात्र आहे म्हणून दिवस आहे ना ? एखादं फुल फार सुंदर आहे म्हणून ते तसचं राहणार आहे का ? त्यालाही त्याच्या त्याच्या सर्व अवस्थातून जावचं लागतं ना ? आणि समजा ते तसंच राहीलं तर नविन कळ्या, फुलं जन्माला कशी येणारं ?
धुकं आलं, मळभ दाटलं तरी एक ना एक दिवस ते जाईलच असा विश्वास का नाही आपणं पक्का करत?
आजचा दिवस, आजच्या संधी उद्यासारख्या किंवा कालसारख्या नसतात. मग कशासाठी आपण मनावरचं ओझं वाहवत राहतो ? आणि या साऱ्यात त्रास स्वतःच भोगतो. जणू आपण स्वतःच स्वतःचे वैरी आहोत असं वाटावं. या फॅालच्या ऋतूत नेहमी जाणवतं. ही पानं आपलं मरण सुद्धा कसं हसत हसत स्विकारतात ? जाताना सुद्धा सर्व रंग अंगावर मिरवून दुसऱ्यांना आनंद देऊन एक दिवस वाऱ्याबरोबर भिरभिरत अलगद मातीत मिसळतात.
माणसं मात्र शेवटपर्यंत दुसऱ्यांना आनंद द्यायचा विसरूनच जातात. हाती असलेल्या क्षणांना पूर्ण उर्जेने न जगता विवंचनातच अडकून पडतात. समोर दिसणाऱ्या आशेच्या किरंणांकडे डोळेझाक करून धुक्यातच हरवून जातात.
आजुबाजूची रंगांची उधळण पहात नाहीत की धुक्याचा अलवार स्पर्श अनुभवत नाहीत. मग जगण्याच्या या यात्रेत आपण सहभागी व्हायचं सोडून कुठे गुरफटतो कळत नाही.
प्रत्येकाला निसर्गदत्त उर्जा आहे. जरा आपल्याच मनाचं निरिक्षण करून हळुवार फुंकर घातली ना तर अंतरंगात विखुरलेली फॅालच्या रंगांची उधळण तुमच्यातच सापडेल. ती शोधण्यासाठी ॲाक्टोबरची किंवा धुकं विरळ होण्याची वाट कसली पाहताय ? सुखेनैव त्या रंगात स्वतःला माखू द्या ! निळं आकाश नक्कीच सोबत येईल पहा.

– लेखन : सौ.शिल्पा कुलकर्णी. केंटकी, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800
Beautiful artical and photography