आज रक्षाबंधन आहे. या निमित्ताने रक्षाबंधन ही कविता सादर करीत आहे. रक्षाबंधनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
– संपादक.
१.
आज पहाते मी वाट,
येणार माझा भाऊराया..
दाराला स्पर्ष होताच,
पडणार मी त्याच्या पाया..
पोरं बाळ ते पण खुष,
आवरायला आली कामा..
कारण आजच येणार,
त्यांचा लाडका तो मामा..
झाली तयारी ती पूजेची,
मधोमध मांडलाय पाट..
अक्षता, हळद कुंकू दिवा,
नारळ, राखी, मावा ताट..
आई मला सांगायची,
भावाचे तोंड ते पूर्वेला..
दिशा ती योग्य असावी,
तुझे तोंड असो उत्तरेला..
मनोभावे करावे औक्षण,
ब्रम्हा, विष्णू, महेश भेटी..
मनगटावर ते रक्षाबंधन,
माराव्या म्हणे तीन गाठी..
पहिली भावा दीर्घायुष्य,
दुसरी ती करी स्वसंरक्षण..
भावा बहिणीत विश्वास,
तिसरी गाठ ती, प्रेम बंधन..
अश्या गाठी मारतांना,
येऊ नये कंठ कधी दाटून..
आंनदे बघून डोळ्यात,
सुख दुःख ते घ्यावे वाटून..
–– रचना : सुभाष कासार. नवी मुंबई
२.
रक्षाबंधन सण प्रेमाचा
बंधूभगिनी विश्र्वासाचा
कर्तव्याच्या आठवणींचा
भावनिक जिव्हाळ्याचा
वर्षातून एकदा येतो सण
बसते वाटेकडे लावून डॊळे
बहिण ती भावाची प्रेमळ
पाहण्या भावाचे रुप सावळे
गोडधोड पक्वाने रांधिती
प्रेमभावना त्यात ओतून
आग्रहाने वाढते भावाला
पती मुले जाती आनंदून
करी त्याची आरती औक्षण
धागा प्रेमाचा रेशमी बांधून
दिर्घायु परमेश्वरा जवळ मागे
म्हणे कर माझी पाठराखण
माझ्यासाठी नको आहेर
सदिच्छांचा मज दे सागर
मागते तुझ्यासाठी मी वर
होवो तुझे जीवन सुखकर
–– रचना : डॉ. सौ. अनुपमा नरेश पाटील. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800