१. बंध रेशमाचा
राखी पुनव ती आली श्रावणाच्या महिन्यात
बंध रेशमाचा आहे त्याचे गोडवे ती गात
नाते बहिण भावाचे मऊ लोण्याहून मऊ
जीवापाड प्रेमकरे बहिणीवर तो भाऊ..
बालपण ते आठवे खेळ लहानपणीचे
खोटे खोटे ते लढणे भांडण ते गमतीचे
एका ताटातले खाणे एकमेका भरवणे
किती छानच होते हो बालपणीचे ते जीणे..
जाते सासरी बहिण मागे वळून पाहते
देवाकडे औक्ष भावासाठी ती मागते
सुखी ठेव भाऊराया मला अन्य नको काही
भावा साठीच मागते नेहमीच ती दुवा ही…
जाते अधून मधून गोड करण्यास सण
दोन दिसात हो तिचे नाही भरतच मन
पण संसार पाठीशी नाही सोडवत गाठ
मग सोडून जाते ती माहेरात तिची पाठ …
निमिनिमित्ताने असे येती उजळून बंध
भेटी छोट्याशाच पण दरवळतो सुगंध
श्रावणातले हे सण मोठे असती गोडीचे
मोती पाचू आणि सोने अमृताच्याच तोडीचे….

–– रचना : प्रा.सौ.सुमती पवार. इंग्लंड

२. राखी पौर्णिमा
बंधन राखीचे
अतूट बंधांचे,
समंजस नात्याच्या
विचारांच्या जाणिवेचे.
बंधन राखीचे,
बहिणीच्या रक्षणाचे
भक्कम आधाराचे,
निश्चिंत मनांचे.
बंधन राखीचे
प्रेमाच्या ओढीचे
गाढ विश्वासाचे
सावलीच्या जिवाभावाचे
बांधुनी राखी
वेचू या क्षण आनंदाचे
करूया सण साजरा
सोहळे भावनांचे.

— रचना : मीरा जोशी
— संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800