Sunday, July 13, 2025
Homeलेखरक्षा हेच बंधन

रक्षा हेच बंधन

रक्षा म्हणजे रक्षण आणि ते करण्याचं बंधन म्हणून रक्षाबंधन !

हे रक्षण कुणी कुणाचं करायचं ? सर्वात प्रथम रक्षण स्वतःचं स्वतः करणे, आईने मुलांचं, पतीने पत्नीचं, मुलाने आई-वडिलांचं, भावाने बहिणीचं, बहिणीने भावाचं, भावाने भावाचं, बहिणीने बहिणीचं, शेजा-यांचं, कुटुंबाचं, गावाचं, शहराचं, राज्याचं आणि सरतेशेवटी देशाचं ! आणि या सा-यांनी एकमेकांचं रक्षण करण्यासाठी घेतलेले व्रत म्हणजे बंधन ! त्या बंधनाचं प्रतीक म्हणून राखी ! साधीसुधी नाही तर रेशमी धाग्यांची ! जी नाजूक, मुलायम पण न तुटणारी ! बंधन मायेचं, प्रेमाचं, अतूट विश्र्वासाचं !

आज समाजात जे चित्र दिसतं ते ये रक्षाबंधनाचा विपर्यास करणारं ! रक्षण सोडून भक्षण करण्याचंच बंधन दाखविलं जातं. मग घराघरात पोहोचलेल्या या दृकश्राव्य माध्यमामुळे पिढीही तशीच वागू लागते. रक्षाबंधनाचा मूळ अर्थच नाहिसा झाला आहे.

आजकाल मुलीसुध्दां कराटे शिकतात. स्वतःचं रक्षण करूं शकतात. पण म्हणून वाटेल तेवढा वेळ एकटीने घराबाहेर राहणे योग्य आहे कां ? कितीही कराटे प्रवीण, अगदी ब्लॅक बेल्ट होल्डर असलात तरी एकटी व्यक्ती दोन किंवा अधिक व्यक्तिंशी सामना करू शकत नाही तेव्हां रक्षणाचं सामर्थ्य असणं ठीक पण तशी आव्हानाची परिस्थिती निर्माण करणं कितपत योग्य आहे ?

बहिणभाऊ सोसायटीत, चाळीत खेळायला गेले की भाऊ लहान असला तरी आपल्याच बहिणीची कड घेऊन भांडतांना दिसतो. तर छोट्या भावाच्या मदतीला बहिण धावून जाते. आपल्या माणसाचं रक्षण करणं हे कुणाला सांगावं लागत नाही. ते उपजतच असतं. पण आज एका वेगळ्या प्रकारची रक्षणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकावर येऊन पडली आहे.

हल्लीच्या ब्लाॅक सिस्टिममुळे शेजारी कोण राहतं हेही आपल्याला माहित नसतं.मग ते एखादे अतिरेकीही असू शकतात. चोरही असू शकतात.पण ‘ मला काय त्याचे ‘ ? ही वृत्ती आणि ‘बघतील दुसरे’ ! ही वृत्ती किंवा हा विचार आज अनेक संकटांना निमंत्रण देत आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आज दुस-यावर गुदरणारा प्रसंग उद्या आपल्यावरही येऊं शकतो हा विचार प्रथम डोक्यात आणला पाहिजे. वेळीच पाऊले उचलली पाहिजेत तरच आपल्याबरोबर इतरांचही रक्षण होईल.

नवीन माणसाला ब्लाॅक विकतांना किंवा भाड्याने देताना त्याची जवळच्या पोलिस स्टेशनला द्या असं पोलीसखातं घसा फोडून सांगत असतं पण आपण त्याकडे सरळ डोळेझांक करतो आणि पेपरमध्ये बातमी येते, ‘या बिल्डिंगमध्ये अतिरेक्यांचा तळ आहे तेथे स्फोटके सापडली’. शेजारच्या घराला लागलेली आग आपल्यापर्यंत पोहोचणारच ना ?

एखादे काम करून घेण्यासाठी नियमांच्या चौकटीबाहेर जाऊन ‘ मी कोणालाही पैसे देणार नाही व कोणाकडून असे पैसे घेणार नाही’ असं बंधन जर प्रत्येकाने पाळलं तर भ्रष्टाचारापासून प्रत्येकाचं रक्षण होईल. पर्यायाने देशाची आर्थिक परिस्थिती सुधारेल. काळा पैसाच निर्माण होणार नाही.

रक्षण पर्यावरणाचं! ही सुध्दां सामाजिक बांधिलकीच ! प्लॅस्टीकचा कचरा न करणं ! खिशात ऐटीत राहणा-या कापडी पिशव्यांचा वापर अगदी सहज शक्य आहे. मग इथे तिथे तुंबणारे नाले व्यवस्थित वाहू लागतील आणि पूरसदृश्य परिस्थिती टळेल.

पावसाळ्यात साथीचे आजार पसरतात. अशावेळी डाॅक्टरांवर नागरिकांच्या आरोग्यरक्षणाची जबाबदारी येऊन पडते. अशावेळी पैशांसाठी अडून न बसतां लागेल ती वैद्यकीय मदत करणं पर्यायाने जीवांचं रक्षण करणं म्हणजे रक्षाबंधनच होय.

सर्वात महत्वाचं म्हणजे सीमेवर शत्रूशी लढणा-या,अनेक संकटांना तोंड देत प्रसंगी मरण पत्करणा-या जवानांचं रक्षण ! आपण सामान्य नागरिकांनी त्यांना मानसिक आधार, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत हा विश्र्वास देणं महत्वाचं !

आज अनेक महिला संघटना राखी पौर्णिमेला राख्या बांधण्यासाठी कश्मिर, लेह, लडाख येथे जातात हे स्तुत्यच होय.

कायदा व नियम पाळणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. नव्हे ते बंधनच आहे. रस्त्याने चालतांना योग्य ठिकाणी क्राॅसिंग करणं, फूटपाथवरूनच चालणं, वाहनचालकांनी वाहनाचा वेग, सिग्नल, लेनची शिस्त पाळली तर अपघात होणार नाहीत. अनाथ बालके, निराधार, ज्येष्ठ, वृध्द, आजारी व्यक्तींचं रक्षण करणं, प्रसंगी पालनपोषण करणं, त्यांना आर्थिक मदत पुरविणं ही समाजाची जबाबदारी आहे.

अशाप्रकारे एकमेकां सहाय्य करून समाजातील अनेक घटकांचं रक्षण करण्याचं बंधन मनापासून स्वीकारलं तर सुजाण नागरिक निर्माण होतील आणि देश प्रगत व सुरक्षित बनेल हे निश्र्चित !
तेव्हां यापुढे असेच होऊ दे रक्षाबंधन !

स्वाती दामले

— लेखन : स्वाती दामले.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments