ठाण्यात रामनगर सारख्या कामगार वस्तीत वास्तव्य करणाऱ्या अमिता कदम या व्यक्तिमत्त्वाविषयी वाचून अनेक युवांच्या मनात एक नवी प्रेरणा जागृत होईल…….
ऐन तारुण्यात अचानक आई-वडिलांचे छत्र हरवल्यावर, आयुष्यात भली मोठी पोकळी निर्माण होत असते. अशा भावनिक संघर्षाच्या काळात जीवन जगणे युवतींकरता महा कठीण असते. तरीही न डगमगता आपल्या कर्तुत्वाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणे ही बाब वाटते तेवढी सोपी नसते.
मनात दुःख, वेदना असताना, समाजात आपल्या वैयक्तिक कार्यातून आदर्श निर्माण करायचा आणि तो आदर्श कायम प्रयत्नपूर्वक जपायचा हे करण्याकरता प्रबळ इच्छाशक्तीची आवश्यकता असते. तो प्रबळ आत्मविश्वास मला अमिता कदम या सिंधूताईंच्या लेकीत जाणवतो. कारण अनाथाची माय बनलेल्या सिंधुताईंनी आपल्या गतकालीन जीवनाचे सर्व पाश तोडून नव्या जीवनाला सुरुवात केली. अशाच प्रकारची स्वप्नवत सुरुवात अमिताची झाली आहे.
२०१६-१७ साली एका फोन कॉल वर आमची भेट झाली. तेव्हा अमिता आई-वडिलांसोबत होती. परंतु २०१८ च्या सुरुवातीला एका कामानिमित्तने मला अमिताचा फोन आला. फोनवर बोलता-बोलता मला अमिताच्या आई-वडिलांची दुःखद वार्ता समजली. ते ऐकल्यावर क्षणभर मी शांत झालो. त्या काळात मी अशाच एका काल्पनिक पात्रावर नाटक लिहित होतो. त्यामुळे अमिताची ही जीवन कहानी माझ्या काल्पनिक भावनेशी रिलेट झाली. यातून अमिताचा परिचय मला खऱ्या अर्थाने झाला.
त्या काळात अमिताचा ठाण्यातील शाळेचा जॉब सुटला होता. त्यामुळे अमिताला जॉब करण्याकरता पुण्याला जावे लागले. पुण्यात अमिताची फारशी ओळख नव्हती. त्या दरम्यान मी माझे मित्र कै. राजकुमार काळभोर यांना अमिताच्या निवासाबद्दल सांगितले. त्यांनी ताबडतोब अमिता करता जवळच भाड्याचं घर मिळवून दिले. या जवळकीच्या नात्यामुळे अमिता आणि माझी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होऊ लागली. त्या चर्चेतून अमिताचे भावविश्व उलगडत गेले. मग आम्ही एकत्र लघुपट कथेचे काम सुरु केले. पण कोरोना महामारीमुळे आमचे काम ठप्प झाले.
या सर्वातून माझ्या लक्षात येत गेले. अमिता ही मुलगी अभ्यासू, प्रयत्नवादी आणि विज्ञाननिष्ठ आहे. आजकालच्या विद्यार्थी मनोवृत्तीचा विचार तिच्या मनातून होत असतो. अमिताने शालेय अध्यापन करता करताना अनेक सामाजिक कामांत स्वतःला झोकून दिलेले आहे. अमिता मला भेटण्या आधीच वनवासी कल्याण आश्रमाची सदस्य होती. त्यावेळी तिने आदिवासी समाजाकरता कार्य केले. त्यानंतर या अमिताने आपल्या सामाजिक कार्याचा धडाका लावून धरला. ठाण्यातून पुण्यात गेल्यावरही अमिताने तेजस्विनी संस्थेमार्फत महिला सबलीकरणात आपले काम जारी ठेवले. या कार्यामुळे तेजस्विनी संस्थेने दोनदा अमिताला गौरविले.
ठाण्यात रहात असताना अमिताने २०१८ साली काव्य लेखनाला सुरुवात केली. अल्पावधीतच तिने ललित लेखनाला सुरुवात केली. समाज माध्यमातून अमिताचे लेख प्रसिद्ध होऊ लागले. हळूहळू अमिता जनमाणसांची वाचकप्रिय लेखिका झाली.
मुळातील तत्वशिल, संस्कारशिल असलेल्या अमिताने अतिशय सुंदररीत्या आपल्या लेखनाचे विषय लिहिले. समाजातील अनेक प्रश्नांवर अमिताने मनापासून भाष्य केले. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडावेत या हेतूने अनेक विषय अमिताने निर्मिले आहेत. दुःखितांच्या वेदनेवर अमिताने कायम फुंकर घालतली आहे. अमिताच्या या अंतरिक स्वभावामुळे, तिच्यातील सामाजिक जाणीवेमुळे काही दिवसात अमिताचा कल पत्रकारितेकडे वळला. त्यातून आज ती आईडियल जर्नलिस्ट एसोसिएशन महाराष्ट्र राज्य तसेच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड महिला प्रभारी म्हणून कार्यरत आहे.
अमिताची जी प्रगती झाली तिचे श्रेय ती सतीश ज्ञानसाधना महाविद्यालय तेथील शिक्षकांना देते कारण ती महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.आणि तिच्यामध्ये जे नेतृत्वगुण विकसित झाले त्यात महाविद्यालयाचा मोठा सहभाग होता.अमिता महाविद्यालयात असताना राष्ट्रीय सेवा योजनेत कार्यरत होती. समाजसेवा करणे हे तिच्या रक्तात तेव्हाच भिनले गेले.
अमिता ती ज्या व्हिनस वर्ल्ड स्कूल हडपसर येथे शिक्षिका म्हणून काम करत होती त्यांना सुद्धा यशाचे श्रेय देते, कारण त्या शाळेत जाॅईन केले आणि अमिताच्या प्रगतीला सुरुवात झाली आणि तिला पहिला पुरस्कार सुद्धा या शाळेत असताना मिळाला. २६ जानेवारीला ठाणे येथील प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्थेतर्फे “कोरोना योद्धा” पुरस्कार मिळाला.त्यानंतर अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्रलेखक संघ आयोजित “राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान २०२१” हा दुसरा पुरस्कार मिळाला.
अमिताच्या या सामाजिक कार्याची, लेखन कार्याची दखल येरवडा कारागृहाचे अधिक्षक डॉ. विठ्ठल जाधव आणि शांतीदूत परिवाराचे अध्यक्ष यांनी घेऊन, शांतीदूत परिवार ठाणे महिला विंग अध्यक्षपद घेण्याची विनंती अमिताला केली . अमिताने त्या विनंतीला मान देऊन ते अध्यक्ष पदही भूषविले. अमिताने कोरोना काळात ठाण्यातील सिग्नल शाळेत शिक्षिका म्हणून अध्यापनाचे कार्य केले. अशाप्रकारे लेखन, पत्रकारिता, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात अमिता नावाच्या समाजसेवी रणरागिणीने उत्कृष्ट कार्यकर्तृत्व गाजवलेलं आहे. येत्या पुढच्या काळात अमिताच्या हातून अशीच लोकोपयोगी कामे होत रहावी. अमिताने वेळोवेळी जे ललित लेख लिहिले आहेत. त्यावर लवकरात लवकर पुस्तक प्रकाशित करण्याचा तिचा मनोदय आहे.
लोक म्हणतात, आज-काल समाजात आदर्श शिल्लकच राहिला नाही. परंतु आपण अमितासारख्या छोट्या छोट्या आदर्शांकडे पाहायला शिकलो पाहिजे. आज समाजात सावित्रीबाई फुले, जिजाऊ माता, अहिल्याबाई होळकर यांसारख्या कल्याणकारी महिला जन्माला येणार नाहीत. त्यामुळे या समाजात आदर्शांची पीछेहट झाली आहे. असे कुणाही म्हणता येणार नाही. कारण आदर्श व्यक्तिमत्व जन्माला येत नाहीत तर ती परिस्थितीनुसार घडत असतात. म्हणूनच मी अमिताला सिंधुताई सपकाळ यांची कन्या म्हणतो आहे.
आज अमिता इवलेश रोपटे आहे उद्या ते रोपटे कदाचित महाकाय वृक्षात रूपांतरित होईल. याकरता अमिताला मी कायम प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो. प्रतिकूलता, जीवनातील संघर्ष हे माझ्या दिव्यांगपणाचे परवलीचे शब्द आहेत. हा माझा अनुभव लक्षात घेऊन मी अमिताला विचारांच्या पातळीवर सहकार्य करू शकतो. अमिताच्या प्रत्येक पावलांत मला समाजकार्याची मोहोर जाणवते. ही मोहोर अशीच कायम उमटत राहो, असे मला मनापासून वाटते. अमिताला पुढील भविष्य काळात एक वृद्धाश्रम काढायचा आहे. हे ही तिचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. हे अमिताच्या मनातलं विश्व आहे. अमिताच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा💐
– लेखन : ऍड रुपेश पवार
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.