बडोदा बँके समोर थांबून मी त्यांना फोन लावला, “ताई कुठे आहात ?” पलीकडून एक आत्मविश्वासी, गोड आवाज आला, “मी बाहेर आहे बँकेच्या. पायऱ्या चढून वर या. मी डाव्या बाजूला थांबले आहे” त्यांनी सांगितल्या प्रमाणे मी पायऱ्या चढून वर गेले आणि परत फोन केला, “तुम्ही पिंक ड्रेस घातला आहे का ?” पलीकडून त्या म्हणाल्या, “हो आणि ओढणी पण पिंक आहे”. मला दिसल्या होत्या त्या. मी जवळ जाताच हसून त्यांनी माझं स्वागत केलं आणि आम्हाला कुठे बसून बोलता येईल याचा विचार माझ्या मनात येत असतानाच त्या म्हणाल्या, “थोडं समोर जुस सेंटर किंवा काहीतरी मिळेल आपल्याला चला.” मी त्यांचा हात धरला त्यांच्या स्पर्शात आपलेपणा जाणवला.
आम्ही पुढे चालत गेलो. पायऱ्या उतरण्या आधी मी त्यांना सांगितलं. त्यावर त्या म्हणाल्या, “तुम्ही तुमच्या स्पीड ने चालत रहा पुढे मी येते तुमच्या सोबत सोबत. आणि आपण फास्ट पण जाऊ शकतो बरं का” असं म्हणत त्या गोड हसल्या. जुस सेंटर ला पोहोचल्या वर आपल्या डोळयावरचा काळा चष्मा नीट करत त्या लगेच म्हणाल्या, “बरं झालं गर्दी नाहीय, जागा पण मोकळी आहे. इथे आपल्याला छान बसून निवांत बोलता येईल”. तिथलं शांत वातावरण आणि मोकळा वारा याचा अचूक अंदाज ताईंनी घेतला होता. आम्ही एका टेबला जवळ गेलो त्यांनी टेबलाला स्पर्श केला आणि अगदी सहज खुर्चीत जाऊन बसल्या. मी न्याहाळत होते. हा त्यांचा अंधाराच्या साथीने सुरू असलेला डोळस प्रवास.
एक प्रकाशमय सेतू बांधणाऱ्या आणि अंधार रात्रीचा प्रवास डोळसपणे जिंकणाऱ्या रीना ताई पाटील नावाच्या तेजोमय पणती ला भेटण्याचा हा सुरेख योगा योग आज जुळून आला होता.
जन्मतः अंध असलेल्या रीना ताई नी काळोखाशी दोन हात करत स्पर्श, स्वर, सुगंध या माध्यमातून जग जाणलं. रीना ताईंनी खडकाळ मार्गातून सक्षम प्रवास केला आहे. अगदी बालपणी पाच वर्षाच्या असताना शिक्षणासाठी त्यांना आपलं घर, आई वडील, बहिणी यांच्या पासून लांब जावं लागलं होतं. पुणे मुलींची अंध शाळा कोथरूड येथे पहिली ते चौथी पर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर अंध मुलासाठी एकात्मिक शिक्षण पद्धती अंतर्गत डोळस मुली सोबत कर्वे शिक्षण संस्थेची हिंगणे स्त्री शिक्षण संस्था या शाळेत शिक्षक खूप छान भेटले असं रीना ताई म्हणाल्या. मदन पुरंदरे हे त्यांचे गुरू आहेत.
आनंद पवार हे त्यांचे मित्र आहेत आणि त्यांच्या नजरेने त्या जग बघतात असं रीना ताई म्हणाल्या. असे मित्र असतील तर अंध व्यक्तीं मध्ये वास्तवतेचे भान निर्माण होईल आणि त्यांना जगात वावरण्याचं ज्ञान मिळेल.
त्या शाळेत त्यांचे दहावी पर्यंतच शिक्षण झालं. या काळात त्यांना खूप छान संधी मिळत गेल्या त्या संधीचं रीना ताई सोनं करत गेल्या.
माझ्या समोर बसलेल्या रीना ताईंना कुवैत मध्ये झालेल्या एशियन ब्लाइंड कॉन्फरन्स ला भारताच्या महिला प्रतिनिधी म्हणून भाग घेण्याचा सन्मान प्राप्त झाला होता. तसेच अमेरिकेतील पोलांडो ला ब्लाइंड वाल्ड युनियन कॉन्फरन्स साठी जाण्याची संधी त्यांना मिळाली. या दरम्यान त्यांना एका गोष्टीची खंत जाणवली की, अंध, अपंग यांच्यासाठी सोई सुविधा अपुऱ्या आहेत. त्या क्षेत्रात काम होण्याची गरज आहे असं त्या पोटतिडकिने म्हणाल्या. त्यांना फिरण्याची खूप आवड आहे. भारतात देखील त्या अनेक ठिकाणी फिरून आल्या आहेत. खूप ठिकाणी एकटीने त्यांनी प्रवास केला आहे.
पाककलेत निपुण असलेल्या रीना ताईनी आपल्या पाककलेचे प्रदर्शन प्रसिद्ध शैफ संजीव कपूर यांच्या कार्यक्रमात केलं आहे. गाणं त्यांना खूप आवडतं. गाण्याच्या पाच परीक्षा त्यांनी दिल्या आहेत. उत्तम वक्तृत्व गुण त्यांनी आत्मसात केला आहे. अनेक गुणांचा खजिना त्यांच्या ओंजळीतून भरभरून वाहतोय.
रीना ताईंचा एक सगळ्यात वाखण्याजोगा गुण म्हणजे आपल्या ओंजळीत जे काही परमेश्वराने दिलं आहे त्यातलं इतरांना देण्याचा मानस आणि कृती पण. रीना ताईंनी आपलं सगळं शिक्षण छोट्या छोट्या नोकऱ्या करून पूर्ण केलं. समाजकार्याची अत्यंत आवड असणाऱ्या रीना ताईंना एक गोष्ट लक्षात आली की, कोणाला मदत देण्यासाठी कायमस्वरूपी आपला आर्थिक प्रश्न सुटायला हवा. त्यासाठी त्यांनी बँकेच्या परीक्षा दिल्या आणि उत्तम मार्क्स मिळवले. कुठलेही आरक्षण/सवलत न घेता त्यांनी केवळ आपल्या मेरिट वर बँकेची नोकरी मिळवली. आणि अत्यंत जबाबदारीने त्या आपली नोकरी करत आहेत.
इंग्लिश लीटरेचर मध्ये एम ए झालेल्या रीना ताई साहित्य क्षेत्राशी पण जोडलेल्या आहेत. आपल्या आई वडिलांचा सांभाळ करत त्यांनी अनेक गरजू लोकांना मदत केली. अनेक सामाजिक संस्थांशी संलग्न असून त्या आपला सिंहाचा वाटा समाजातील गरजूंना देत आहेत.
ताई एक उत्तम बुद्धिबळ पटू आहेत. त्यात त्यांना राज्यस्तरीय बक्षिस मिळाले आहे. अनेक महत्वाच्या पुरस्कारांच्या रीना ताई मानकरी ठरल्या आहेत. शारदा स्मृती पुरस्कार, रोटरी क्लब चा रोटरी क्विन पुरस्कार दोन वेळा त्यांना प्राप्त झाला आहे.
आणखी एक कौतुकाची बाब म्हणजे रीना ताईंना एक दिवसीय आयुक्त पिंपरी चिंचवड ही बहुमानाची संधी देखील मिळाली आहे. हे सगळे पुरस्कार देखील रीना ताईच्या सकारात्मक दृष्टीकोण आणि समाजाला काहीतरी देण्याची वृती नमन करत असतील.
साथी नावाच्या संस्थेसोबत त्या कार्य करतात. आवर्जून सांगण्या सारखी गोष्ट म्हणजे, त्या एकमेव कार्यकर्त्या आहेत ज्या अंध आहेत. त्या हसून म्हणाल्या, “आमच्या संस्थेतील बाकी सगळे कार्यकर्ते बघू शकतात बरं”. त्याच क्षणी माझ्या मनात आलं रीना ताई हे सामाजिक प्रश्न ज्या दृष्टीने अनुभवू शकतात, जणू शकतात ते कदाचित कोणीही बघू शकत नाही. नर्सेस महिलांच्या समस्या, कुठल्या गावात पाण्याचा प्रश्न अश्या अनेक विषयावर त्या कार्य करत आहेत. शतदा नमन त्यांच्या या देण्याच्या वृत्तीला.
माझ्या कामाचं रीना ताईंनी भरभरून कौतुक केलं. “रेड लाईट मधील बालकांच्या शिक्षण आणि भविष्य सुरक्षित व्हावं यासाठी तुम्ही जे काम करता त्या आव्हानात्मक कामात मी पण तुमची साथ देईल” असं त्या म्हणाल्या.
रीना ताई ला मी एक प्रश्न विचारला आणि त्या काहीश्या भावूक झाल्या. मी विचारलं, “एक स्त्री म्हणून या समाजात वावरताना काय अनुभव येतात आणि कोणते क्षण तुम्हाला आतून स्पर्शून जातात?” हा प्रश्न ऐकून ताई मृदू आवाजात म्हणाल्या, “माझे आई वडील या जगातून गेले तो क्षण मला खूप खूप एकटं करून गेला. आणि एक अंध स्त्री म्हणून आव्हान तर आहेच समाजात स्वतः ला सुरक्षित ठेवण्याचं”. शेवटी रीना ताई म्हणाल्या, “अंध असल्यामुळे एखाद्या व्यक्तीचं दुःख त्याचा त्रास त्याने सांगितल्या शिवाय कळत नाही. तो मी बघू शकत नसल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर चे भाव वाचू शकत नाही. म्हणून या अंधत्वा पुढे हरल्या सारखं वाटतं. माणसं वाचता येत नाही हो राणी ताई हीच खंत आहे केवळ. नाहीतर हे अंधत्व मला वरदानच ठरलं आहे.खूप मोठ्या संधी मिळाल्या आणि छान माणसं पण मिळाली”. त्यांचं हे वाक्य ऐकून मी नतमस्तक झाले.
रीना ताई पुढे आपण उघड्या डोळ्यांनी इतरांचे दुःख बघून देखील कधी कधी काहीच करू शकत नाही पण रीना ताईंना ती अलौकिक दृष्टी निश्चितच आहे. त्यांना आणखी छान कार्य करण्यासाठी रवीऊर्जा मिळू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
अंधार झाला होता, का कुणास ठावूक एक खूप ताकतीने उजळलेली किरण मला स्पर्श करत असल्याचं जाणवलं होतं. आम्ही एकमेकींच्या हात धरून गप्पा करत मार्गस्थ झालो.
— लेखन : डॉ राणी खेडीकर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800