प्रा वर्षा गायकवाड
“जग बदल घडवण्याचे सर्वात प्रभावी अस्त्र म्हणजे शिक्षण” असे विचार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला दिलेले आहेत. याच विचारांनी प्रभावित सावित्रीची लेक म्हणावं अश्या, माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याशी मनमोकळी चर्चा झाली.
शिक्षणाचं वातावरण आणि शिक्षणास प्रोत्साहन देणाऱ्या पोषक कुटुंबात जन्माला आलेल्या वर्षाताई यांना भेटण्यास गेले असता माझं अतिशय सन्मानपूर्ण स्वागत झालं. वर्षाताई थोड्या वेळात घाईघाईने बाहेर आल्या. येताच माझी विचारपूस केली आणि माझ्या कामाचं कौतुक केलं.
सुशिक्षित, सुसंस्कृत अशी छबी उमटविणाऱ्या वर्षाताई त्यांच्या वडिलांविषयी अतिशय आत्मीयतेने बोलत होत्या. बालपणापासून त्या वडिलांच्या लाडक्या
होत्या. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना देखील घरात शिक्षणाचे कडक धोरण होते. वन रूम किचन आणि कुटुंबात पंधरा सोळा माणसं पण संबंध मात्र जिव्हाळ्याचे होते. वर्षा ताईची आत्या, त्यांची मुलं यांना त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलासारखं सांभाळलंं.
मोठ्या कुटुंबात वावरल्या मुळे वर्षाताईना माणसं कळत गेली. सगळ्यांशी मिळून मिसळून वागणं, घरी येणाऱ्या प्रत्येकांशी बोलणं, वडिलांना राजकीय, सामाजिक क्षेत्रात वावरताना बघून या सगळ्या गोष्टींचे सुक्ष्म निरीक्षण करून वर्षाताई कौशल्य आत्मसात करत मोठ्या होत होत्या.
डॉ बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची पेरणी वडिलांनी बालपणापासून केली होतीच. एकूणच शिक्षणाबाबत व्यापक दृष्टिकोन होता.
एक मुलगी म्हणून वर्षा ताईना त्यांच्या वडिलांची खंबीर साथ होती. राजकारणात प्रवेश करताना देखील आई वडिलांनी वर्षा ताईला पुढे केलं. मुलगा मुलगी अशा भेद न करता केवळ पुरोगामी विचार नाही तर तशी कृती त्यांच्या आई वडिलांनी आपल्या निर्णयातून दाखवून दिली. वर्षा ताईंना बालपणापासून वक्तृत्व आणि समाजातील स्थितीची जाणं हे गुण अवगत होते. त्या गुणांची पारख त्यांच्या वडिलांनी केली होती म्हणून त्यांनी वर्षाताईना राजकारणात प्रवेश करताना पूर्ण संधी आणि साथ दिली. पण एक गोष्ट त्यांना प्रामुख्याने त्यांच्या वडिलांनी सांगितली होती ती म्हणजे स्वतःच्या हिमतीवर आणि गुण कौशल्यावर आपली जागा हासिल करायची.
शालेय शिक्षण मंत्री असताना वर्षाताईंनी अनेक नवीन गोष्टी करण्याचा प्रयास केला. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्यांच्या भविष्यासाठी शैक्षणिक धोरणात काय बदल करता येईल याचा अभ्यास केला. कोरोनाचे आव्हान देखील त्यांना पेलावें लागलं.
एक व्यक्ती म्हणून, स्त्री म्हणून स्त्रियांनी स्वतः ला सक्षम करावं आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊन निर्णय प्रक्रियेत सामील व्हावं, असं मत आणि संदेश वर्षा ताईंनी दिला आहे.
मी वर्षाताईंना भेटले एक महिला म्हणून, एक व्यक्ती म्हणून. बाल पणापासून त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्या साठी आणि मला भेटल्या त्या एक उत्तम वक्तृत्व गुण असणाऱ्या अतिशय साध्या, कळायला सोप्या, मनभरून व्यक्त होणाऱ्या, सहज उलगडणऱ्या,
संवेदनशील मनाच्या अश्या वर्षाताई.
आम्ही दोघींनी अनेक विषयावर चर्चा केली. त्यात मी आचार्य पदवी प्राप्त केली त्या विषयावर देखील बोलणं झालं. वर्षाताई नी माझ्या कामाशी निगडित त्यांचे अनुभव सांगितले. रेड लाईट मधील महिलांशी त्यांनी एकदा चर्चा केली होती. म्हणून त्यांच्या मुलांच्या शिक्षणा विषयी माझं काम जाणून ताईंना या मुलासाठी जरूर शैक्षणिक धोरणात काही करता येईल आणि त्यांचं सहकार्य आणि सहभाग त्या जरूर देतील असं त्या म्हणाल्या. माझ्या कामाचे गांभीर्य समजून ताईंनी त्या मुलांची गरज ओळखली आहे हे जाणवत होतं. शिक्षण व्यक्तीला सर्वार्थाने घडवत असतं हे वर्षाताईच्या वर्तनातून कळत होतं. त्यांच्या या आत्मियतेेचा माझ्यावर सखोल परिणाम झाला.
त्यांच्या पुढील यशस्वी प्रवासासाठी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा.

– लेखन : डॉ राणी खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800