मी का जगतोय ? मला मरण का येत नाही ? अनेक मित्र, नातेवाईक यांचे गेल्या काही वर्षात मृत्यू झाले आहेत. त्या प्रत्येक वेळी मलाच का मरण येत नाही ? असे अनेक प्रश्न जेष्ठ चित्रकार, जे जे स्कूल ऑफ चे स्नातक आणि पुणे येथील सिंबॉइसीस इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन या संस्थेतून प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले रमेश औंधकर सर स्वतःला आणि देवालाही विचारत असत.
सरांना असे हे प्रश्न पडायचे कारण की ते त्यांच्या सांसारिक कर्तव्यातुन २०१६ साली मुक्त झाले होते. दोन्ही मुले चांगल्या नोकरीला लागलीत. त्यामुळे त्यांना मुलांच्या भवितव्याची चिंता राहिली नव्हती. मुलांची लग्ने हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असून तो त्यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे योग्य तो निर्णय घेऊन सोडवावा या मताचा ते होते. त्यामुळे आता आपल्या आयुष्याला काही अर्थच न राहिल्याने, आपल्याला मृत्यू यावा, या भावनेने त्यांना ग्रासले होते.
त्यात परत सर ज्या छंदात मन रमवायचे त्या छंदाने त्यांना उत्तर आयुष्यात फसविले. घोर निराशा पदरी घातली. त्यामुळे चित्रकलेचा छंद जोपासावा असेही त्यांना वाटेना. घरात ठेवायला जागा नाही इतकी चित्रे त्यांनी रंगवून ठेवली होती. ती कोणत्याही प्रकारे, ऑनलाइन किंवा प्रदर्शनातुन विकली जात नव्हती. तर मग तो चित्रकलेचा छंद का जोपासावा ? करायचे काय ? बरं सरांना सामाजिक कार्यातही रस नव्हता.त्यामुळे निवृत्त व्यक्तीने ज्या कशात वेळ घालवावा, असे सल्ले दिले जातात त्यापैकी कशातच सरांना रस नव्हता. त्यातल्या त्यात शास्त्रीय संगीत, गायन यात जरी त्यांना रस असला तरी कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांना त्याचा नक्कीच प्रचंड त्रास होइल हे ते जाणून असल्याने तो बेतही त्यांनी रद्द केला.
मग करायचे काय? आपल्या जीवनाला अर्थ कसा द्यायचा ? त्यातच कोविड ने, लॉकडाऊनने भर पडली. वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके बंद होती.टिव्ही वरील त्याच रटाळ मालिका किंवा त्याच त्याच रिपीट डिस्कव्हरी आणि इतर मालिका पहायचाही त्यांना कंटाळा आला होता. त्यामुळे ते फेसबुक आणि इतर सोशल मिडिया वर वेळ घालवू लागले. काही दिवसांनी त्याचाही त्यांना कंटाळा आला. सगळीकडुनच गोची झाली होती. या असह्य कैदेत वेळ घालवायचा कसा
असा गहन प्रश्न त्यांना पडला.
अशा या दारुण परिस्थितीत आणि मनस्थितीत सरांना तारले ते चित्रकलेनेच. जरी गेल्या १५ वर्षांपासून त्यांची चित्रविक्री थांबली होती, ऑनलाइन चित्रविक्रीतही त्यांना अपयश मिळत होते, तरीही त्यांनी परत चित्रे काढायचे ठरवले. पण प्रश्न उभा ठाकला, कसली चित्रे काढायची ? कशावर काढायची ? इथे त्यांना उत्तर मिळाले की यापूर्वी त्यांनी जे विषय रंगविले ते आणि ज्यावर रंगविले ते सोडून दुसरे काहीही, ज्या मध्ये त्यांचे काही नुकसान होणार नाही,अशी चित्रे काढुन ती ठेवण्याची विवंचना उद्भवणार नाही असे काही करावे हे त्यांनी ठरवले आणि ते म्हणजे साधी रेखाटने.
आत्तापर्यंत मानव कोणतेही चित्र हे फक्त एकाच बाजूने पहात आला आहे. त्याच दृष्टिकोनातून चित्रनिर्मितिहि करत आला आहे. अगदी आदिम कालापासून आदिम मानवाने हि चित्रनिर्मिति केली आहे. अल्टामिराच्या गुहेतील चित्रे असोत की अगदी अत्याधुनिक काळातील चित्रे असोत हि सर्व चित्रे आपण समोरून पाया आणि शिखर, वरची बाजू, खालची बाजू , डावी बाजू आणि उजवी बाजू या चारही बाजुंचे स्थान/स्थिती निश्चित असते. या एकाच पद्धतीने/दृष्टीकोनातुन आपण आजतागायत चित्रे पाहात आलो आहोत. त्यात काहीही बदल झालेला नाही. काहीनी अमुर्त चित्रे उलट करून पाहिली, तो अपवाद. पण त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही.
सरांनी ही पद्धत बदलण्याचा प्रयत्न केला. चित्र उलट्या बाजूनेही पाहता येते हे त्यांना उमगले. उभे आणि उलटे किंवा आडवे आणि उलटे अशा पद्धतीने चित्रे प्रथम पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला. चित्ररचनेची खालची बाजू वर म्हणजे उलट,चित्राची डावी बाजू वर आणि उजवी बाजू खाली म्हणजे आडवे सुलट किंवा उजवी बाजू वर आणि डावी खाली म्हणजे उलटे आडवे अशा पद्धतीने ते चित्ररचना कागद/कैनव्हास फिरवून करत गेले . त्याप्रमाणे त्यांनी चित्ररचना केल्या आणि एका जगावेगळ्या चित्ररचना शैलीचा जन्म झाला.
सरांनी चित्रे अशा पद्धतीने रेखाटली की ती चित्रे नेहमी प्रमाणे उभे पाहून आशय प्रदर्शित करतातच पण उलट पाहुनही आशय दाखवितात. तसेच आडवे वा उलट आडवे पाहुनही वेगवेगळे आशय दर्शवितात. असे चार दृष्टीकोनातुन चित्र पाहता येते आणि रेखाटताही येते हे त्यांनी सिद्ध केले.
जगात अशाप्रकारे कोणत्याही चित्रकाराने आता पर्यंत चित्ररचना केलेली नाही. अगदी आदिम काळापासूनच्या आदी चित्रकारापासुन ते अत्याधुनिक समकालीन चित्रकारांपर्यंत असा जगावेगळा ना विचार केला आहे ना कोणी चित्रकाराने तशी कल्पना केली आहे. सरांनी अशी अद्वितीय चित्ररचनाशैली जन्माला घातली आणि विकसित केली.
विशेष म्हणजे कोरोनाच्या भीषण, अंधकारमय काळात त्यांना ते गवसले. कधी कधी संकट ही संधी ठरते, हे सरांच्या बाबतीत खरे ठरले.
एकदा कल्पना निश्चित केल्यावर मग सरांनी साध्या ए ४ आकाराच्या स्केचबुक मधे साध्या पेन्सील, स्केचपेन, मार्करपेन, चारकोल ने अमुर्त रेखांकने करायला सुरुवात केली. ही अमुर्त रेखांकने करताना त्यांनी कोणतेही उद्दिष्टं समोर न ठेवता केवळ चित्ररचना हा उद्देश ठेवला.
सुरुवात करताना त्यांनी काही बिंदू, कागदावर त्यांना दिसणारे डाग किंवा कागदातील अंगभूत दोष यांना पेन्सिलने ठळक करून सरळ, वक्र, नागमोडी वा इतर रेषांनी ते जोडत होते. त्यातून जे काही भौमितिक किंवा नैसर्गिक आकार दिसत त्यात थोडे टेक्शचर आणि गडद टोन भरत होते. हे मुळ स्क्रिबलिंग आणि डुडलिंग झाल्यावर ते स्केचबुक चारही बाजूने फिरवून पहात असत, ते यात अजून काय वाढवता येईल किंवा ते अजून आकर्षक कसे होइल या उद्देशाने. एकेदिवशी त्यांना त्यात गणेश प्रतिमा दिसली. मग त्यांनी त्या गणेश प्रतिमेला योग्य अश्या अनेक गोष्टी त्या आकृतीत दाखविल्या. त्या प्रतिमेला फेसबुकवर पोस्ट केले आणि त्यांना अनपेक्षितपणे उत्तम प्रतिसाद मिळाला. मग अनेक स्वयंभु गणेश सरांनी कागदावर आमंत्रित न करताही अवतरले. ही त्यांच्या वर झालेली गणेशाची कृपाच आहे असे सर समजतात. कारण हे नेमके गणेशोत्सव सुरू असतानाच घडले.
सर त्याच पद्धतीने रेखाचित्रे करत गेले. एके दिवशी त्यांना दोन्ही बाजूनी ओळखीचे आकार दिसणारे रेखाचित्र दिसले. मग तीनही बाजुंनी ओळखीचे आकार दिसले आणि मग चारही बाजूने ओळखीचे आकार दिसणारे रेखाचित्र तयार झाले. हेही नेमके गणेशोत्सव सुरू असतानाच झाले. तेंव्हा ही चौमितीय/चौआयामी चित्रशैली जन्मली तीही अपघातानेच, ध्यानीमनी नसताना ! पण गणेशोत्सव सुरू असतानाच ती सुचली म्हणून सर याचे श्रेय श्रीगणेशांनाच देतात.
सरांनी प्रथम चौमितीय रेखाचित्रे लगेच फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. त्यालाही खूप उत्साह वर्धक प्रतिसाद मिळाला. मग त्यांनी अशा चौमितीय रेखाचित्रे रेखाटनांचा आणि त्यांना सोशल मिडिया वर पोस्ट करण्याचा सपाटा लावला. याचा फायदा असा झाला की, त्यांच्या या चौमितीय रेखाचित्रांची दखल अनेक आर्ट जर्नल्सनी घेऊन त्यांनी ती चौमितीय रेखाचित्रे त्यांच्या आर्ट जर्नल्समधुन प्रसिद्ध केली. अनेक दिग्गज लोकांनी उत्साह वर्धक प्रतिसाद दिला. काही हित चिंतकांनी ही रेखाचित्रे आंतरराष्ट्रीय समुहावर पोस्ट करण्याचे सुचवून काही आंतरराष्ट्रीय समुहही सुचविले. त्याप्रमाणे सरांनी त्या आंतरराष्ट्रीय समुहावर त्यांची चौमितीय रेखाचित्रे पोस्ट केली आणि काय आश्चर्य, स्पेनमधील सिव्हिले या शहरातील ARTAGORA GALERIA या गैलरीच्या क्युरेटर व मालकाला ती चौमितीय रेखाचित्रे फार आवडली.
त्यांनी सरांना त्यांच्या गैलरीत ती चौमितीय रेखाचित्रे प्रदर्शित करण्याचे निमंत्रण दिले. सरांनी ही ते निमंत्रण तत्काळ स्विकारून त्यांना चित्रे निवडण्याची विनंती केली. त्यांनी १२ रेखाचित्रे निवडली. त्यात चार रेखाचित्रे अमुर्त होती आणि आठ रेखाचित्रे चौमितीय होती.
१३ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर २०२१ या महिन्याभरासाठी सरांचे 3D प्रदर्शन त्यांनी ठेवले. रेखाचित्रे अगदी जवळून आणि लांबून पाहाण्याची सोय होती. जणू आपण प्रत्यक्ष गैलरीतच आहोत असा भास होईल अशी ती सोय होती. अत्याधुनिक तांत्रिक सोय वापरून त्यांनी सरांचे परदेशातील प्रथम एकल प्रदर्शन विनामुल्य केले हा सर त्यांचा मोठा बहुमान समजतात आणि ते साहजिक ही आहे. याशिवाय त्यांनी स्पैनिश भाषा जगात जेथे जेथे बोलली जाते तेथे तेथे सरांच्या या प्रदर्शनाची जाहिरात करून त्यांची चौमितीय चित्रशैली पाश्चात्य जगात पोहोचवली.
सरांच्या या यशाची स्थानिक वृत्तपत्रानीही छान दखल घेतली. दूरदर्शन माध्यमानेही योग्य दखल घेऊन सरांच्या या अद्भूत चौमितीय रेखाचित्रशैलीच्या यशाचा यथोचित सन्मान केला आणि लेखाच्या सूरुवातीस सरांना पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळाली.
आता सरांनी त्यांचे उर्वरित आयुष्य याच चौमितीय चित्रशैलिच्या विकासासाठी व्यतित करण्याचे ठरवले आहे. अनेक ध्येये या चित्रशैलीने त्यांच्यासाठी निश्चित केली आहेत. त्यातील प्रथम ध्येय म्हणजे या चौमितीय चित्रशैलीचा कॉपीराईट घेणे हे आहे. कारण अशी चौमितीय रेखाचित्रे/रंगचित्रे करणारा सर प्रथम चित्रकार आहे असे मान्यता पत्र त्यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् या संस्थेने विधीवत दिलेय. संपूर्ण कलेच्या इतिहासात अशी चित्रे आजतागायत कोणत्याही चित्रकाराने काढली नाहीत. सर या चौमितीय चित्रशैलीचे जनक आणि विकासकही आहेत.
सरांचे दुसरे ध्येय आहे ते म्हणजे अशा चित्रांचे प्रदर्शन भारतातील मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बंगलोर आणि हैदराबाद अशा प्रमुख शहरातील गैलरीत भरविणे.
तिसरे ध्येय आहे या चौमितीय चित्रशैलीवर डॉक्टरेट मिळविण्याचे.
एकुण काय तर सरांना आता आयुष्याचा अर्थ गवसला आहे. त्यांचे जीवितकार्य काय आहे, ते समजले. उर्वरीत जीवन सकारात्मकतेने कसे जगायचे त्याची उर्जा आणि प्रेरणा त्यांना या चौमितीय चित्रशैलिने दिली. सरांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
चित्रकलातल्या अनेक शैली याबद्दल खुप दुर्मिळ अशी छान
माहिती मिळाली. धन्यवाद
धन्यवाद भुजबळ सर अलका मैडम.
आपण माझ्या चौमितिय चित्र शैलीची दखल घेऊन योग्य प्रकारे लेख लिहून व चित्र समाविष्ट करून आपल्या पोर्टलवर प्रकाशित केलात.
नमस्कार, नवीन माहिती मिळाली.धन्यवाद !
चित्रकार व चित्रशैली दोन्हींचा परिचय झाला… अलभ्य लाभ.
धन्यवाद .विजया केळकर मैडम.
आपण या चौमितिय चित्र शैलीतील आणखी चित्र माझ्या इन्स्टाग्राम पेजवर पाहू शकता.
https://rameshaundhkar.in/
https://tr.ee/lWSnG6E5Hr
https://www.facebook.com/share/p/19V5ugDNCq/
https://www.facebook.com/share/p/17Krzrs4GE/
Instagram:https://instagram.com/aundhkarramesh?igshid=ZDdkNTZiNT
या लिंक्स वर आपण चौमितिय, चतुरस्र वा चतुर्भुज चित्र पाहू शकतात.