मुंबईतील परळ येथील हाफकिन संस्था परीसर कामगार वसाहती मध्ये माझे बालपण गेले. किती सोन्यासारखे मोरपंखी दिवस होते ते ! निरागसता आणि उस्फुर्तता यांचा सुंदर मिलाफ म्हणजे आमचे बालपण. थोरामोठ्यांचा आदर करणे, शेजारधर्म पाळणे हे नित्याचेच.
फक्त अभ्यास एके अभ्यास अशी करणारी आमची पिढी नव्हती. कारण स्पर्धा, करीअर हे शब्द अजून आम्हाला कळले नव्हते. मैत्रिणीच्या पहिला नंबर आला की जास्त आनंद मला व्हायचा आणि ती किती माझी खास आहे, हे सांगताना अभिमानाने मन भरून पावत असे.
शेजाऱ्यांच्या घरी येणाऱ्या एकमेव वर्तमानपत्रावर जणु आपलीच मालकी आहे, अशा थाटात आम्ही वावरायचो. शेजारच्या काकू काकांना पेपर वाचून दाखवणे हे माझे आवडीचे काम होते. राशीभविष्य आवडीने वाचले जायचे. या आठवड्यात मोठा धनलाभ आहे असे वाचल्यास काका खुश 😂 हातावर एक लिमलेटची गोळी ठेवायचे ….मग खरोखर धनलाभ होतो कि नाही हि गोष्ट गौण असायची.
प्रत्येक पिढी ही मधली पिढी असते. मागची पिढी भाबडी प्रामाणिक आणि सत्यवादी. आमच्या नंतरची पिढी चलाख, स्वकेंद्री व व्यवहार चतुर.आम्ही ना धड इकडचे ना तिकडचे. मधल्या मध्ये लटकणारे. तरीही मोडेन पण वाकणार नाही असा आव आणणारे. असो….
आमच्या वेळी शाळेची बस वैगेरे अशी काही भानगड नव्हती. घरी जो कोणी रिकामटेकडा असेल त्याने मुलांना बाखोटीला धरून शाळेत सोडून यायचे.
थोडं मोठे झाल्यावर आम्ही मित्र मैत्रिणी मिळून मिसळून शाळेत जात असू. सगळा अभ्यास शाळेतच शिक्षक करून घेत असत. आताच्या मुलांसारखे दिड लाख फी भरुन आई वडील प्रोजेक्ट्स व अभ्यास करत नसत.
वेगळंच विश्व होतं आमचं.
विद्यार्थ्यांना कसलाही ताण नव्हता. मस्त हसत खेळत शिक्षण झाले आमचे. तेव्हाही मुले डॉक्टर इंजिनिअर होतच असतं, पण आत्ताच्या सारखा बाऊ नव्हता.
माती जेव्हा ओली असते तेव्हाच तिच्यापासून चांगली मुर्ती घडवली जाते.
तसेच मुलांवर जर लहानपणापासून संस्कार केले, तर ते आयुष्य भर पुसले जात नाहीत.
आम्हाला हे संस्कार घ्यायला कोणत्याही संस्कार वर्गात प्रवेश घ्यावा लागला नाही.
आई, वडील, आजी, आजोबा, काका, मामा यांनीच आम्हाला घडवले.
मुलांना त्यांचे बालपण जगु दिलं जायचं. कुठलाही अट्टाहास नसायचा.
आम्ही मैदानी खेळ भरपूर खेळलो. लंगडी, लगोरी, चोरपोलीस, कब्बडी, पकडापकडी, कुठे टायरला लोखंडी रॉड लावून फिरवत, तर कधी भाड्याने सायकल आणुन ढोपर फोडुन घेतले.
एक फार गमतीशीर खेळ होता. बसची तिकिटे गोळा करण्याचा. ज्यांच्याकडे जास्त तिकिटं तो हुशार.
मला आठवतंय आम्ही मुलं बसस्टॉपवर उभे राहायचो, प्रत्येक माणूस उतरला कि तो तिकीट खाली टाकायचा अवकाश, आम्ही ती तिकिटे पटापट गोळा करायचो. आत्ता आठवलं कि हसू येते.
लहानपणी कधी एकदा मोठे होतो असे वाटायचे पण मोठे झाल्यावर रम्य ते बालपण असेच वाटते.
आत्ता मुलांना एकच खेळ माहीत आहे तो म्हणजे क्रिकेट. आणि हातात चोवीस तास मोबाईल. सगळे बैठे खेळ. शारीरिक व्यायाम नाही कि मानसीक विरंगुळा नाही. एकुलती एक मुलं असल्याने मिळून मिसळून राहण्याची सवय नाही.
आम्ही मावस भावंडं, चुलत भावंडे एकत्र लहानाचे मोठे झालो, त्यामुळे आमच्यात छान बौडिंग आहे. आपापसातील भांडणे आपणच सोडवायची सवय लहानपणापासूनच लागली. एकमेकांना समजून घेणं शिकलो.
आमच्या पिढीतील पालक आपली स्वप्ने आम्हा मुलांवर लादत नव्हते. आम्हाला जे हवे ते करण्याची मुभा होती.
जे करशील त्याला सामोरे जावे लागेल एव्हढेच म्हणणं असायचं. आत्ता पाल्याकडुन आपली स्वप्ने पूर्ण करण्याची जणु शर्यतच लागली आहे. मुलांना जीवघेण्या
स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. त्यांचे बालपण हिरावून घेतले जात आहे.
आजकाल सर्रास घटस्फोट होतात. आत्महत्या होतात. त्याचे खरे कारण तुमच्या बालपणात दडलेले आहे.
कारण आजच्या मुलांना हे रेशमी बंध माहितच नाहीत. एकमेकांना समजून घेणं, माफ करणे, दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानणे, हे जेव्हा घरोघरी शिकवले जाईल तेव्हाच जगण्याचा खरा आनंद आजचा पिढीला मिळेल.
म्हणूनच म्हणते, तुमच्या चांगले/वाईट वागण्याचा रस्ता हा तुमच्या बालपणात लपलेला आहे
रम्य ते बालपण.
रम्य ते दिवस आणि रम्य त्या आठवणी..

– लेखन : स्मिता लोखंडे.
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800
बालपण अगदी छान शब्दात उभे केले आहे. अतिशय छान. प्रत्येकाला आपले बालपण आठवल्याशिवाय रहाणार नाही.
आपल्या पिढीचे बालपण हे असेच होते. म्हणुन तर आपसूक ओठांवर ओळी येतात…..
कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन
रम्य ते बालपण खूप छान लेख बालपणीचा काळ सुखाचा चित्रपटा सारखा डोळ्या समोरून तरळून गेला. लेखिकेचंच स्वतःच तणाववीरहित बालपण फारच सुरेख!स्मिता, मॅडम छान वास्तवादी, लिहिता खूप खूप शुभेच्छा💐