Wednesday, September 17, 2025
Homeलेखराजकारणातील राजहंस : लोकनेते विलासराव देशमुख

राजकारणातील राजहंस : लोकनेते विलासराव देशमुख

राजकारणात शत्रुत्व न ठेवता मैत्री जपणारा खरा राजहंस म्हणजे कै.लोकनेते विलासराव देशमुख होय. आज त्यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख…..

दिवसेंदिवस राजकारण गढुळ होत आहे. हेवेदावे, द्वेष, मत्सर वाढत चालला आहे. तेंव्हा आज विलासरावांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. निखळ हास्य, तरल व शब्दकोटीचे विनोद, निर्णयक्षमता, वाकचातुर्य आणि दिलखुलास स्वभाव त्यामुळे राजकारणात त्यांचा खास असा चाहता वर्ग निर्माण झाला.

राजकारणा पलिकडे जाऊन त्यांनी मैत्री जोपासली. राजकिय अस्पृशता त्यांनी कधी बाळगली नाही. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, शरद पवार, प्रमोद महाजन या सर्वांशी त्यांची मैत्री होती. त्यांनी स्वःताच्या व्यक्तीमत्वाला कधी कुंपण घातले नाही. साहित्यीक मांदियळीत ते रमत असत. पत्रकार, अभिनेते, कलाकार या सर्वांशी त्यांची मैत्री होती.

मुख्यमंत्री असताना त्यांना स्व पक्षातीलच एका नेत्याने प्रखर विरोध केला. विरोध एवढा तीव्र होता की तेंव्हा विलासराव पदावर राहतात की नाहीत ? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हायकमांड त्यांना पदावरुन काढुन टाकेल असे वाटत असतानाही ते शांत होते. त्यावेळी दिल्ली दौरा करताना प्रसार माध्यमांसमोर ते हसत सामोरे गेले. पत्रकारांनी प्रश्न विचारला, ‘आता पुढे काय ?’ या प्रश्नाला हसत हसत त्यांनी उत्तर दिले, “श्रध्दा आणि सबुरी” यावर विश्वास ठेवा.

दिल्लीवरुन परत आल्यानंतर हायकमांडनी त्यांना पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी हसतमुखाने उत्तर दिले, “मी ज्या पक्षात वाढलो, मोठे झालो तेथे टिका करुन, मागुन काही मिळत नाही ? त्यामुळे वेळ आणि संधी आली की आपोआप जे हवे ते मिळते. “श्रध्दा व सबुरी ठेवा” हा संदेश त्यांनी दिला. अशा प्रकारे राजकारणात ते अचुक टाईमिंग साधत.

मुख्यमंत्री असो की केंद्रिय मंत्री, त्यांनी आपले छंद कधी सोडले नाहीत. नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेला ते आवर्जुन हजेरी लावत. त्यांची काजोल नावाची घोडी दरवेळेस यात्रेचे लक्ष वेधुन घेत असे. त्यांना घोड्यांची प्रचंड आवड होती. ते गावी हुरडा पार्टी करत असत. या हुरडा पार्टीला राजकारण्यांबरोबर समाजकारी, पत्रकार,
साहित्यीक अशा लोकांची हजेरी असे. मित्रांबरोबर गप्पा मारणे, वाचन हे छंद त्यांनी जोपासले होते.

मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी भुकंपग्रस्तांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्यासाठी शासन आदेशच काढला. त्यामुळे लातुर व उस्मानाबाद जिल्ह्यातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना त्यांनी नोकरी मिळवुन दिली. लाखो लोकांच्या चुली पेटविल्या.त्यांचा रोजगाराचा प्रश्न कायमचा मिटवला.

मांजरा, रेणा असे साखर कारखाने काढुन दुष्काळी पट्यात ऊसाचे क्षेत्र काढुन नंदनवन फुलवले. मराठवाड्यात त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी दै.एकमत हे वृत्तपत्र सुरु केले. पत्रकारांना कै.सुशिलादेवी देशमुख प्रगल्भ पत्रकारिता पुरस्कार देवुन गौरविण्याची परंपरा सुरु केली.

शिक्षण क्षेत्रात पहिली पासुन इंग्रजी लागु करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भविष्याच्या दृष्टीने किती ऐतिहासिक होता ते आज लक्षात येत आहे.

त्यांच्याकडे राजकीय दुरदृष्टी होती. राज्यांत सर्वच सेवा क्षेत्रात कंत्राटी कर्मचारी नेमून पेन्शन कायमची बंद हा निर्णयही त्यांचाच. राज्य सक्षम करायचे असेल तर धोरणात्मक निर्णय घेताना धाडस दाखवावे लागते असे ते नेहमी म्हणत. राजकारणात नेहमीच त्यांनी असे धाडस दाखवले.

बाभळगावचा सरपंच, पंचायत समितीचा उपसभापती, सभापती, जि.प.अध्यक्ष, ते आमदार हा प्रवास त्यांनी स्वःताच्या क्षमतेवर केला. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रिय अवजड उद्योग मंत्री हा प्रवास त्यांचे अचुक टाईमिंग दाखवितो. राजकारणात अचुक टाईमिंग साधणार्‍या या लोकनेत्याला काळावर मात्र मात करता आली नाही. त्यांच्यावर प्रेम करणार्‍या लोकांच्या र्‍हदयपटलावर हा लोकराजा कायमचा राज्य करीत राहील हेच खरे !

आज मात्र राजकारणात हा राजहंस नाही ही बाब मनाला खटकते.
राजकारणातील या राजहंसाला जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन.🙏

– लेखन : पंकज काटकर. सहशिक्षक, काटी,
जि.उस्मानाबाद
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं