Thursday, February 6, 2025
Homeलेखराजकारणी समाजकारणी कधी होतील?

राजकारणी समाजकारणी कधी होतील?

कोरोनाच्या कहरामुळे गेल्या वर्षांपासून अनेक दैनंदिन गोष्टी थांबल्या आहेत ज्याचा आपण कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. सामान्यांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय थांबले, शाळा कॉलेज बंद झाले, पर्यटन थांबले, सतत धावणारी, काम करणारी पावलं थांबली. पण केवळ एक गोष्ट थांबली नाही ते म्हणजे राजकारण. मान्य आहे ना सर्वांना? सरकारने एखादा निर्णय घेतला, की तो योग्य किंवा अयोग्य आहे की नाही? ह्याचा विचार करण्याच्या अगोदर विरोध करायचा. थोडक्यात सांगायचे तर काम करणाऱ्या सरकारला विरोध करणे एवढेच विरोधकांचे एकमेव काम झाले आहे. लोकांचे हित कशात आहे ह्याची त्यांना जराही पर्वा नसते. केवळ विरोध करून, भाषणे देऊन, आंदोलन करून लोकांमध्ये भांडण लावायचे व स्वतःची पोळी भाजून घ्यायची असे हे स्वार्थी लोक आहेत. आणि ह्या सगळ्यात बळी जातो तो सामान्यांचा. ह्यांना फक्त सत्ता हवी आहे व लोकांवर राज्य करायचे आहे. आपल्या गावाची, शहराची अथवा देशाची प्रगती कशी होऊ शकते? तेथे विकास कसा साधला जाऊ शकतो? ह्याचा विचार फार कमी जण करतात.

आज ही अनेक गावात साध्या साध्या सुविधा नाही. पाण्याचे योग्य नियोजन नाही, चांगले रस्ते नाही, उत्तम कॉलेज नाही, रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे युवा पिढीला भविष्यासाठी इतर ठिकाणी जावे लागते. आपल्या आई वडिलांपासून दूर रहावे लागते. जर प्रत्येक गावात रोजगाराच्या संधी मिळाल्या तर गावाची प्रगती तर होणारच, शिवाय कोणीही आपल्या जीवलगांपासून दुरावले जाणार नाहीत व फक्त पुणे मुंबई सारख्या मोठया शहरात गर्दी होऊन कोंडमारा होणार नाही. प्रत्येक नगरसेवकाने, आमदार, खासदाराने ही जबाबदारी घेतली पाहिजे. खरे तर हेच त्यांचे प्रथम कर्तव्य आहे की आपली जनता सुखी झाली पाहिजे. पण त्यासाठी त्यांच्यात एकी असली तरच ह्या अशक्य गोष्टी शक्य होतील. त्यामुळे प्रत्येकाने आपला मी पण सोडून काम केले पाहिजे. त्यासाठी आपल्या गावाबद्दल प्रेम, आपुलकी असली पाहिजे व तळमळीने लोकांसाठी निस्वार्थी पणे काम केले पाहिजे.

हे घरात बसून शक्य नाही. त्यासाठी आपल्या जनतेच्या घरा घरापर्यंत पोहचले पाहिजे व त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवल्या पाहिजे. असे केले तर तुम्हाला मत मागायला त्याच्या घरात जावे लागणार नाही. कारण त्यांचा विश्वास तुम्ही संपादन कराल व असे प्रामाणिक काम केले असेल तर तुम्हीच पुन्हा निवडून याल ह्यात तिळमात्र शंका नाही. पण असे चित्र फारसे पाहायला मिळत नाही. लोक बोलत नाही. सहन करतात. सोयी नसल्या तरी गप्प बसतात. हे अत्यंत चुकीचे आहे. काही गावात तर एखाद्याचीच सत्ता वर्षांनूवर्ष असते. त्यांना खुर्चीचा मोह आवरता येत नाही. जणू तेथे केवळ त्यांची दहशत असते आणि जर कोणी विरोध केला अथवा निवडणुकीत उभे राहण्याचं धाडस दाखवले तर त्या व्यक्तीला अथवा त्याचा घरातल्याना धमकवले जाते. त्याला मारहाण केली जाते. त्यामुळे ही गुंडगिरी फोफावत आहे. सत्य हे कधीही लपत नाही आणि जेव्हा एक व्यक्ती ते दाखवण्याचे धाडस करते तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. खरे तर आज लोकांनीच जागृत झाले पाहिजे व मतदान करताना योग्य व्यक्तीला निवडले पाहिजे. तो आपला अधिकार आहे व तो आपणच चोख बजावला पाहिजे तरच आपल्या मुलांचे भविष्य सुखकर असेल.

 

आजकाल युवा पिढीला ह्या राजकारणात फारसा रस दिसत नाही. कारण त्यांचे विचार अगदी स्पष्ट असतात. ते कोणालाही घाबरत नाही. त्यांना कट कारस्थान अजिबात मान्य नाही. त्यांना राजकारणापेक्षा समाजकारण हवे आहे. त्यांना एकमेकांना मदत करून त्यांचे संकट सोडवणे व प्रामाणिकपणे काम करायला आवडते. त्यामुळे आज देखील अनेक लोक जनहितासाठी कोणतेही पद प्रतिष्ठा नसताना काम करतात, त्यांना सलाम.

सामान्य व्यक्तीत असामान्य ताकद आहे. ही त्यांनी ओळखली पाहिजे व योग्य वेळी न घाबरता योग्य निर्णय घेतला पाहिजे. आज आपल्या देशावर संकट असताना सर्व पक्षांनी एकजुटीने ह्या कोरोनारुपी राक्षसाचा सामना करून सर्वांना त्याच्या भीतीतून बाहेर काढले पाहिजे. स्वतः घरात न बसता बाहेर येऊन स्वखुशीने मदत केली पाहिजे. जसे की रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे, स्वत:मार्फत लोकांना मोफत लस पुरवणे, ऑक्सिजन मशीन विकत घेऊन लोकांपर्यंत पोहचवणे, अन्नधान्य पुरवणे अथवा गरजवंतांना मोफत घरपोच डब्बा देणे, जेष्ठ व्यक्तीना लागणारी मदत करणे.

आज ही कामं करणाऱ्यामध्ये अनेक सामाजिक संस्थांचा पुढाकार आहे, कलाकार मंडळी आहेत, युवा पिढी आहे. ही कामं खरे तर तेथील आमदार, खासदारांची व नगरसेवकांची आहेत. आज जनता जागृत झाली आहे. ती सर्व पाहत आहे. आज सकारात्मक बदल होण्याची आवश्यकता आहे. लोकांची सेवा करण्यातच सर्वांचे भले आहे. कारण जेव्हा सामान्य लोकांची सहनशीलता संपेल तेव्हाच योग्य बदल घडेल आणि तेव्हा ते ह्या राजकारणी लोकांना धडा शिकवतील. लोकांचा अंत पाहु नका व सर्वांनी एकजुटीने काम कराल तेव्हा हा क्षण सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. कारण एकीचे बळ खूप मोठे असते ज्यात अशक्य ही शक्य करण्याचे सामर्थ असते.

अजूनही वेळ गेलेली नाही. सर्व जनतेने, कलाकारांनी, राजकारण्यांनी सरकारच्या नियमांचा आदर करून, नियमांचे काटेकोर पालन करून हातात हात घेऊन आपला देश कोरोना मुक्त करू या व पुन्हा आपले स्वातंत्र्य साजरे करू यात.जय हिंद!

लेखन : रश्मी हेडे.
संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी