Friday, May 9, 2025
Homeपर्यटनराजधानीचे वैभव : देवगिरी

राजधानीचे वैभव : देवगिरी

महाराष्ट्र राज्य गडकिल्ल्यांसाठी प्रसिध्द आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी गडाविषयी जाणून घेऊ या दुर्गप्रेमी साईप्रसाद कुंभकर्ण यांच्याकडून….

देवगिरी या गडाची समुद्र सपाटीपासूनची उंची ९०१ मीटर आहे. देवगिरी जरी उंचीने कमी असला तरी तो दिमाखात व डौलात उभा आहे. हा गड औरंगाबादपासून पंधरा कि. मी. अंतरावर आहे. आपण देवगिरी या ठिकाणी आल्यानंतर किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर रस्त्यापलीकडे शाही स्नानगृहे म्हणजे शाही हमाम आहे. जी आजही राजवैभवाची साक्ष देत उभी आहेत. यानंतर किल्ल्यात मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर ‘महाकोट’ ही भव्यदिव्य वास्तू नजरेस पडते. महाकोट म्हणजे सर्वात मोठी भिंत.

या किल्ल्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात असलेले प्रवेशद्वार किंवा अन्य दरवाजे मनुष्य लोटू शकत नाही ही द्वारांची खासियत आहे. महाकोटमध्ये आल्यानंतर सैनिकांसाठी किल्ल्यात ज्या लहान लहान खोल्या केल्या आहेत त्या आपल्या नजरेस पडतात. या खोल्यांमध्ये आता धातूंच्या तोफा ठेवलेल्या आहेत.
हे पाहून आपण पुढे गेल्यानंतर टेहळणी बुरूज आपल्या नजरेस पडतो. बुरुजाची भव्यता व भक्कमपणा यावरून बांधकामाचे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन आपल्याला घडते.
यानंतर आपण पुढे गेल्यानंतर किल्ल्यातील सर्वात मोठी विहीर ज्या विहिरीला ‘सरस्वती कुआँ’ म्हणून ओळखले जाते व त्या जवळील भागातच जैन मंदिर देखील आपल्या नजरे पडते.

आपण किल्ल्याची भव्यता व सौंदर्य न्याहळत असताना पुढे हाथी हौद व तेथून थोडेच अंतरावर जवळच भारत माता मंदिर दृष्टीस पडते. शिल्पकलेचा व प्राचीन कलेचा, वैभवाचा उत्कृष्ट ठेवा हे मंदिर आहे. वास्तवात हे मंदिर जैन मंदिर होते; पण हे “भारतमाता मंदिर “म्हणून ओळखले जाते. या मंदिरात भारत मातेची सुंदर, आकर्षक व मोठ्या स्वरूपाची मूर्ती आहे. हे पाहून आपण पुढे चढत गेल्यास आपणास राजधानीच्या वैभवाची साक्ष देणारा चॉंदमिनार दिसतो. या मिनाराबद्दल विशेष म्हणजे कुतुबमिनारानंतर नाव घेतात ते या चॉंदमिनाराचे. या चॉंदमिनाराची उंची सत्तर मीटर आहे. इ. स.१४३५मध्ये अलाउद्दीन बहमनी (दुसरा) याने आपल्या विजयाची स्मृती म्हणून तो बांधला; पण या मिनाराची उंची किल्ल्यापेक्षा कमी आहे. या मिनारावर उभे राहिले तर किल्ल्याची सुंदरता, भव्यता आपल्याला न्याहळता येते. याच मिनाराच्या थोडेसे पुढे चालत गेल्यास पुरातत्त्व खात्याने किल्ल्यातील सापडलेले शिल्प एकत्रित करवून शिल्प संग्रहालय साकारले आहे. या संग्रहालयात विविध धर्मातील देवांचे शिल्प व अन्य सुंदर शिल्प कलाकृती पाहावयास मिळतात.

हे पाहून पुढे गेल्यानंतर आपल्या नजरेस पडतो तो कालाकोट या नावाचा दरवाजा . या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे शत्रुला या दरवाजातून प्रवेश मिळणे त्याकाळी अशक्‍य असे आणि दुसरे म्हणजे या दरवाजाचा भक्कमपणा अजूनही तसाच टिकून आहे. दरवाजातून प्रवेश केल्यानंतर आत आल्यावर समोर दृष्टीस पडतो तो चिनी महल. या चिनी महलात चिनी मातीच्या तुकड्याचा उपयोग फरश्‍यांसाठी केला आहे. या महलाच्या भिंतीवर त्यावेळचे रंगकाम अजूनही आहे. हा चिनी महल पर्यटकांना भुरळ घालतो.

अहमदनगरच्या निजामशाहीच्या अधिकाऱ्यांनी या किल्ल्यावर बरेच महाल बांधले. त्यापैकीच किल्ल्यावर “निजामशाही महल” म्हणून तिथे तो आपणास पाहावयास मिळतो. निजामशाही महालासमोरच एका गोल चबुतऱ्यावर काही पायऱ्या चढून गेल्यावर आपणास तोफ दिसते. हिच्या मागील बाजूस मेंढीची आकृती असल्याने या तोफेस ‘मेंढा तोफ’ म्हणतात. या तोफेवर लेख लिहिलेला आहे. या लेखात औरंगजेबाचा अधिकारी मोहम्मद हुसेन अरबी याची कारकीर्द सांगितलेली आहे. ही तोफ फार प्रसिद्ध आहे. आपण ही मेंढा तोफ पाहून बाले किल्ल्याभोवतीच्या खंदकापाशी पोहोचायचं. हा खंदक डोंगरातच खोदून काढलेला असून, १६ मीटर रुंद आहे. याच्या माथ्यावर पोहोचल्यावर देवगिरीचे चखोट ताशीव कडे आपले लक्ष वेधून घेतात. कड्यांचा ताशीवपणाबद्दल इ. स. १३४०या किल्ल्याला भेट देणाऱ्या इब्जबतुताने मोठे मार्मिकपणे लिहून ठेवलेले आहे. ते असे की ‘शत्रूलाच काय, तर सापांना आणि मुंगीलाही हा सरळसोट ताशीव व निसरडा कडा चढून जाणे दुष्कर आहे.’

या किल्ल्याचा बालेकिल्ला हा दोनशे मीटर उंचीचा पटावरच्या सोंगटीसारखा दिसतो. बालेकिल्ल्यात प्रवेश करताना ‘अंधेरी’ लागते. अंधेरी म्हणजे अंधारी रस्ता. खंदक पार करताच अंधेरीची सुरुवात होते. उजेडाशिवाय किंवा काहीही प्रकाशाचे साधन न आणता अंधेरी पार करणे अवघडच दिव्य. हा मार्ग ३७ मीटर लांब भुयारी मार्ग आहे. याला “मशाल बंगला’ ही म्हणतात.
अंधेरीपासून वर चढत गेल्यास गणेश मंदिर लागते व त्यानंतर बारादरी आणि त्यानंतर सर्वात वरती दुर्गातोफ आहे.

या किल्ल्यात फसव्या वाटा व घुसखोरांना जाळून टाकणारा तवा आहे. गार वारा येणाऱ्या वाटेवर गेले, तर सुसरी-मगरीच्या खंदकातच रवानगी ! याशिवाय न दिसणाऱ्या झरोक्‍यातून शत्रूच्या अंगावर उकळते तेल ओतण्याचे ठिकाणही येथे आहे. असा हा किल्ला अजिंक्‍य आहे. कोणी फितूर झाले तरच जिंकणे शक्‍य.

संत एकनाथ महाराजांचे गुरू जनार्दन स्वामींची समाधी येथे आहे व रसोईमातेचे मंदिर देखील.
असा हा एकमेवाद्वितीय देवगिरीचा किल्ला पाहणे, त्याचा इतिहास अभ्यासणे हा मोठा विलक्षण अनुभव आहे. प्रत्येक दुर्गप्रेमीने या दुर्गाला आवर्जून भेट दिलीच पाहिजे.

– लेखन : साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
शितल अहेर on रेघोट्या…
शितल अहेर on हास्य दिन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on समस्यांना कॉमा करा आणि पुढे जा…– अलका भुजबळ
सौ.मृदुलाराजे on कामगार चळवळीचा इतिहास