लोकमान्य टिळकांची सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना केवळ महाराष्ट्रापर्यंतच मर्यादित राहिली नसून प्रांताबाहेर, देशाबाहेरही ‘जिथे मराठी तिथे गणपती‘ स्थापना होते आहे. आझ़ादीच्या अमृत महोत्सवाच्या या अमृतकालात बृहन्महाराष्ट्रात सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सवाची स्थापना ही परंपरा वर्षागणिक संवर्धित होते आहे.
दिल्लीतील करोल बाग, पहाडगंज येथे वर्षोनुवर्षे वास्तव्यास असणारा मूळ मराठी समाज त्यांच्या पुढच्या पिढीसोबत आणि नव्याने राजधानी येथे येणारा ‘मराठी माणूस’ कार्यक्षेत्र आणि निवासस्थान जवळच असावे या शोधात यमुनेच्या काठापासून हिंडण नदीच्या किनाऱ्यापर्यंत विस्तारला आहे. याशिवाय आय.टी.हब गुरुग्राम ते नोएडा, गाझ़ीयाबाद, फरिदाबाद, द्वारका, जनकपूरी, पीतमपूरा या दिल्ली एन.सी.आर.च्या पूर्व- उत्तर सीमांवर ही विविध मंडळांत ‘ बाप्पा ‘चें आगमन, गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वाजत गाजत ढोल ताश्यांच्या गजरात महाआरती ने झाली आहे.
गेली दोन वर्षे कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे सामाजिक दूरीचे अनुपालन करण्यासाठी बाप्पांना ही आभासी विश्वातील एक साक्षीदार व्हावे लागले होते. यंदा मात्र भक्त ही कसर दूर करुन जल्लोषात गणोशोत्सव साजरा करीत असल्याचे चित्र बृहन्महाराष्ट्रात दिसून येते आहे. गणेशोत्सव मंडळांची वाढती संख्या आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल गणेश मंडळातील कार्यकर्त्यांचा उत्साह दर्शवितो.
राजधानी दिल्लीत केंद्रीय मंत्री कै.वसंतराव साठे यांच्या काळापासून गणेशोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यात आवर्जून उल्लेख करावा असे सार्वजनिक उत्सव समिती मंडळ गेली अनेक वर्ष मध्यवर्ती दक्षिण दिल्ली हाट आय.एन.ए. येथे गणपतीची स्थापना करते आहे.
यंदा पहिले पाच दिवस
तबला वादन अलका मनकानी, मुंबई येथील दिपाली काळे यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .
याशिवाय मंडी हाऊस येथील श्रीराम सेंटर येथे प्रसिद्ध अभिनेते श्री.प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन निर्मित ् ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या माईलस्टोन नाटकाचे सादरीकरण बुधवारी, सात सप्टेंबर रोजी होणार असल्याचे सार्वजनिक उत्सव समितीच्या पदाधिकारी नीना हेजीब यांनी सांगितले.
लक्ष्मी नगर हा पूर्व दिल्लीतील व्यापारी व्यावसायिक वर्गाचा भाग येथे ही महाराष्ट्रातील लातूर येथून आलेले सुरुवातीला केवळ दिवाळीचे दिवे विक्री करणारे सामान्य व्यावसायिक श्री.महेंद्र लढ्ढा व्यवसायातील वृध्दी सोबतच सामाजिक ऋण जपण्याच्या भावनेतून सप्त्नीक सार्वजनिक कार्याचा श्री गणेशा सुरुवात गणेशोत्सवाच्या स्थापनेतून केला. या मंडळातर्फे वर्षभर सार्वजनिक उपक्रम गोशाळा, सामुहिक विवाह, सूर्यकला लढ्ढा यांच्या मार्गदर्शनखाली राबवले जातात.
‘दिल्लीचा महाराजा’ सवाद्य शोभायात्रेने ‘लवली पब्लिक स्कूल’ येथे वीराजमान झाला आहे. ‘श्री गणेश सेवा’ मंडळाची यंदाची संकल्पना ‘आझ़ादी चा अमृतमहोत्सव’ ही आहे. येथील देखावा आणि आरास तिरंगामय आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. यंदा ही पूजेसाठी स्वतंत्र ११ फूट उंचीची श्रीं ची मूर्ती येथे स्थापित केलेली आहे. ४ सप्टेंबर पर्यंत येथे भजन, अमृतवर्षा आणि रंगारंग कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
बाप्पा आणि बालगोपाळ हे विलक्षण नातं पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ नेहमीच जपत आले आहे.
महाराष्ट्र बाहेर आलेल्या ‘होमसिक’ होणा-या कुटूंबांना वर्षभर विविध महाराष्ट्रीयन सार्वजनिक सण- उत्सव साजरा करुन मायेची ऊब, स्नेह- आशीर्वाद देण्याचं कार्य हे मंडळ करते. या मंडळातील साठे परिवार विशेषतः परिवारातील दोन बंधू आणि आजी त्यांच्या समवेत श्री.विश्वास ढमढेरे, करंजगावकर, चित्रे परिवार उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात. या गणेशोत्सवात स्थानिक कलाकारांपासून बृहन्महाराष्ट्रातील विविध प्रांतातील कलाकारांना ही व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.
याशिवाय सामुदायिक अथर्वशीर्ष, पाककृती आणि मुलांच्या व्यक्तीमत्व विकासाच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचं कार्य पूर्वांचल मंडळ करते.
‘सह्याद्री’ महाराष्ट्र मंडळाच्या नावातूनच मंडळाच्या कार्याचा हेतुबोध होतो. सह्याद्री अपार्टमेंट येथील गणपती हा पतपडगंज येथील केवळ महाराष्ट्रीयनांची वसाहत असलेल्या वसाहतीत विराजमान होतो. येथे ही दरवर्षीप्रमाणे यंदा श्री.वैभव डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली वसाहतीतील स्थानिक कलाकार, गृहिणी, बालगोपालांसाठी विविध सामुहिक स्पर्धा, खेळ आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
आय.टी.हब आणि बुध्दीजीवींचा बाप्पा सार्वजनिक गणेशोत्सव समिती भक्तांसाठी दर्शना सोबतच नितळ सुरांची अभिनव मैफल भेट देणार आहे. या मंडळाने प्रथम स्वर, सा रे ग म प मराठी लिटील चॅम्पस् फेम गायक प्रथमेश लघाटे याच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. याशिवाय मुंबई येथील अभिनेता संदीप पाठक “व-हाड निघालयं लंडनला” ही हास्य प्रस्तुती सादर करणार आहे .
महाराष्ट्रातून दिल्लीत आल्यानंतर अनेकांची जेथे प्रथम बॅग टेकून आसरा आणि रहाण्याची व्यवस्था होते असे महाराष्ट्रीय स्नेह संवर्धक समाज आणि त्यांचा सार्वजनिक श्री गणेशोत्सव नेहमी प्रमाणेच आकर्षक आरास आणि आपलेपणाच्या भावनेतून यंदा ज्येष्ठ नागरिक सदस्य सत्कार आणि होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहनासाठी बक्षिस समारंभाचे आयोजन केले आहे असे मंडळाचे सचिव श्री. अभिजीत गोडबोले यांनी सांगितले.
चांदनी चौक हा खरं तर मुस्लिम बहूल व्यावसायिक खरेदीचे माहेरघराचा भाग आहे. पण तेथे ही ‘मराठी माणूस’ गणेशजी च्या आशीर्वादाने गुण्यागोविंदाने व्यवसाय करतो. तेथील गणेश मंडळ महाराष्ट्राची लोकधारा सादर करुन मुस्लिम बांधवांना ही ठेका धरायला लावणार असल्याचे मंडळाचे पदाधिकारी श्री.विनोद देशमुख यांनी सांगितले.
ग्रेटर कैलास येथील अलकनंदा मराठी मंडळ या काहीश्या उच्चभ्रृ वस्तीतील गणेशोत्सवात ‘छत्रपती शिवाजी महाराज एक सिध्द योगी’ या विषयावर मुंबई येथील छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचे अभ्यासक्रम श्री. सतीश जोशी विचार मांडणार आहेत. याशिवाय ही मनोरंजनाच्या कार्यक्रमात आठवणीतील कवी – वैदर्भीय कवींचा स्वर आविष्कार सादर करतील.
जनकपूरी, द्वारका येथील सिद्धिविनायक मंदिरात ही श्रींची स्थापना आणि त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
दिल्लीतील पीतमपूरा येथे महाराष्ट्रीयन वस्ती तुलनेने कमी आहे. पण बाप्पांचं अस्तित्व आणि उपस्थिती निश्चितच आहे. लाल बागच्या राजाची प्रतिकृती स्थापन करून येथे ही अमराठी भाषिक भव्य गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे तेथील पदाधिकारी श्री.नरेश गोयल यांनी सांगितले.
राज नगर येथे नव्याने विकसित होणाऱ्या दिल्ली नजीकच्या भागात तर श्रीं चे स्वागत महाराष्ट्रातील पारंपरिक ढोलताशांच्या गजरात झाल्याचे पदाधिकारी श्री. प्रदीप यांनी सांगितले.
स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकमान्य टिळकांची सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना सर्वार्थाने स्वातंत्र्याच्या ही अमृतकाळात ‘ग्लोबल’ होते आहे.
जाळी स्थळी काष्ठी पाषाणी पाषाणातील मंगलमूर्तीचं मूर्त रुप बाप्पाला साकारण्यासाठी ‘गल्ली पासून दिल्ली’ पर्यंत मंडळामंडळातील कार्यकर्ते जल्लोषात कार्यरत आहेत.

– लेखन : निवेदिता मदाने-वैशंपायन. नवी दिल्ली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800