महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.
राजे का कुणास ठाऊक, आज मन भरून आलंय. डोळ्यातील अश्रू सुकलेयत. तुमची खूप आठवण येतेय.
तुमचा काळ म्हणजे शिवशाही. तुमच्या काळातील प्रजा खरंच खूप भाग्यवान, ज्यांना तुमच्यासारखा एक प्रशासकीय कुशलता असणारा, धर्मनिरपेक्ष राज्य करणारा असा जाणता राजा लाभला होता.
पण आज हे चित्र पार पलटून गेले आहे. राजे, तुमच्या छत्रछायेखाली कोणत्याही शेतकऱ्याने कधीही आत्महत्या केली नाही. पण आज अराजकांच्या मनमानीपुढे आमचा बळीराजा हताश झाला आहे. कित्येक शतेकरी कर्जापायी आत्महत्या करत आहे. नकळत मुखातून येते की, शिवबा तुम्ही आजही हवे होता.
राजे तुम्ही आणि तुम्हीच ते राजे, ज्यांच्यासाठी प्रजा आपले सर्वस्व बलीदान करायला तयार असायची. काय ही त्यांची श्रद्धा आणि काय हा तुमच्यावरचा त्यांचा विश्वास ! आज खरी तुमची गरज आहे जनतेला. जिथे तिथे भ्रष्टाचार माजला आहे. मानवातील दानवांची साक्ष या पेटलेल्या होळ्या देत आहे. त्यांच्या या होळीत गरिबांची भाकर जळून गेली. धर्मापायी साधीभोळी माणसे हकनाक मेली. ठायी ठायी क्रूर बंडाळी माजली. बंदुकीच्या गोळ्यांना कित्येकजण बळी पडले. सर्वस्वाची राखरांगोळी झाली. राजे, सांगा कशा पेटवायच्या ह्या विझलेल्या चूली ? गरीब जनता टाहो फोडून बोलते की, शिवबा तुम्ही आजही हवे होता.जिथे तिथे जातीय वाद, धर्मवाद त्यांच्या भांडणात माणूस रक्ताने भिजला. हिंसाचाराने इतके क्रूर रूप घेतले की त्याच्या पुढे मृत्यू ही लाजला. आता वाटते की आम्ही नाहक ही बांडगुळे पोसतो. याच लोकशाहीच्या विळख्यात आमची संस्कृती जळून खाक झाली. या जुलमी भ्रष्टाचाराने, अत्याचाराने जनता टाहो फोडते, शासना आता तरी जागा हो !
काय तर म्हणे आम्हाला स्वातंत्र्य मिळाले, कसले स्वातंत्र्य ? अहो स्वातंत्र्य मिळाले इथल्या चोरांना, नक्षलवाद्यांना आणि मोकाट सुटलेल्या ढोरांना. सत्ताधारी नेते मोठमोठी भाषणे करतात, खोटी आश्वासने देतात, साम्यवादाचे भाष्य करतात, पण वेळ आली की हीच मंडळी जात पात आणि धर्माच्या नावावर कलह करतात.
आपल्या देशाच्या कुंडलीतील परराष्ट्राचे राहू केतू आपल्याला नडतात. दिवसेंदिवस देशाची अधोगती होते.
खरं तर अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या प्रमुख गरजा. पण नित्यउपयोगी वस्तूंचे दर इतके वाढले की गरीबांना एका वेळेची भाकर मिळणे मुश्कील झाले आहे. अंगभर कपडे मिळेनात आणि निवाऱ्याचे तर बोलूच नका ! एक छोटीशी झोपडी पण ती ही कर्जापाई सावकाराच्या ताब्यात. हाल बघवत नाही. म्हणून म्हणते की, शिवबा, तुम्ही आजही हवे होता.परस्त्री मातेसमान मानणारे तुमचे संस्कार लुप्त होत चालले आहेत. आज लेकी बाळी सुरक्षीत नाहीत. एकट्या दुकट्या मुलीला चार चौघात अडवून तिच्यावर अत्याचार केला जातो. तिची इज्जत चव्हाट्यावर आणली जाते.
आजकाल कोणत्याही नात्यावर विश्वास राहिला नाही. कधी भाऊ बहिणीवर, तर कधी वयाने मोठे, पण वासनेच्या आहारी गेलेल्या पित्यानेच आपल्या स्वतःच्या मुलीवर, तर कधी वयातही न आलेल्या कोवळ्या पोरीवर अत्याचार केला जातो, बलात्कार केला जातो. अशा वासनेच्या अधीन झालेल्या नराधमांना वेळीच ठेचून काढले पाहिजे. निदान यांच्या रक्षणासाठी तरी तुम्ही हवे होते, राजे तुम्ही हवे होता,
राजे तुम्ही आजही हवे होता…!!

– लेखन : सौ. अनिता नरेंद्र गुजर.
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800
आजही राजे तुम्ही हवे होतात…
अगदी खरे..सद्यस्थिती इतकी शोचनीय आहे की अशा युगपुरुषाची आज समाजाला गरज आहे..