कवी, गीतकार राजा बढे लिखित “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताला महाराष्ट्र शासनाने नुकतेच राज्यगीत म्हणून घोषित केले आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिवशी म्हणजेच १ मे १९६० रोजी हे स्फूर्तीगीत शाहीर साबळे यांनी प्रथम सादर केले.
कवी राजा नीळकंठ बढे यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांना अवघा १९१२-१९७७ असा जीवन कालावधी लाभला. पण एकाच जीवनात त्यांनी साहित्य, कला, संगीत क्षेत्रात दिलेले योगदान थक्क करणारे आहे. त्यांच्या प्रतिभेने सांस्कृतिक क्षेत्र श्रीमंतच केले नाही तर या क्षेत्रात नवनवीन दालनेही उघडली. लेखक, कवी, गीतकार, गझलकार, अनुवादक, संपादक, चित्रकार, नखचित्रकार, अभिनेते, नभोवाणीचे संगीत विभाग प्रमुख, अनेक
माहितीपटांचे निर्माते, ‘रायगडचा राजबंदी’ चित्रपटाचे निर्माते असा त्यांच्या कार्याचा फार मोठा जीवनपट आहे.
त्यांचे शिक्षण छिंदवाडा, नागपूर ते पंजाबला झाले. आईच्या निधनाच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी ते कविता लिहू लागले. पण याच कवितानी लाखो रसिकांवर चांदणे शिंपत त्यांना आनंदी केले. मराठीसह संस्कृत आणि उर्दू वर त्यांचे प्रभुत्व होते. आईच्या पश्चात त्यांनी भावंडांची जबाबदारी सांभाळली. ते अविवाहित राहिले.
राजा नावाप्रमाणेच ते वागायचे. ते उत्तम संघटक होते. त्यांनी अनेक कार्यक्रम घडवून आणले. त्यांनी पैशापेक्षा माणसे जोडली. त्यांनीच पु. लं, गदिमा यांच्या कथाकथनाचा मुंबईत प्रारंभ केला. संगितीका हा नवा प्रकार त्यांनीच रुढ केला.
स्वतःच्या कथा, कादंबऱ्या, नाटके, नाट्यपदे, चित्रपट गीते, भावगीते, श्रुतीका, संगितीका इ. लिखाणाशिवाय त्यांनी केलेल्या जगविख्यात रचनांच्या अनुवादाने मराठी साहित्य अधिकच समृद्ध केले. ज्यामध्ये रसलीना, लावण्य लळित, शृंगार श्रीरंग (जयदेव कवींचे गीत गोविंद), शेफालिका (महाराष्ट्राचे प्राचीन राजे सातवाहनची गाथा सप्तशती हे सहलेखकासह ) हे प्रमुख आहेत.
‘रामराज्य’ चित्रपटात गीते लिहिण्यासाठी स्वा. सावरकर यांनी स्वतः ऐवजी राजा बढे यांचे नाव सुचविले. सावरकर यांची सूचना किती योग्य होती, पुढे या चित्रपटातील राजा बढे यांची गीते खुप गाजली. या वरूनच सावरकरांची सूचना किती योग्य होती, हे दिसून आले. हा एकमेव मराठी चित्रपट आहे जो महात्मा गांधींनी बघितला.
राजा बढे जीवनाविषयी म्हणतात, “रानटी श्वापदांच्या भयातही चंचल हरिणीचे आनंदात बागडणे, केशरी देठाचा पारिजातकाचे हसत हसत, स्वतः रिक्त होत मन मोहरविणारा सुगंध बहाल करणे, स्वतःच्या हृदयी होणारे आघात सहन करुन इतरांची हृदये काबिज करणारा वेळू, स्वतः संपेपर्यंत सुगंध पसरवतच चंदनाचे झिजणे, स्वतः संपूनही इतरांचे जीवन पवित्र, सुगंधी, मंगलमय करणे हेच खरे जीवन होय”.
राजा बढे यांच्या काव्याचे सगळेच चाहते होते. त्यांच्या लिखाणात वैविध्य, देशभक्ती आहे. गीत मग कोणतेही असो, शौर्यगीत असो वा लावणी, राजा बढे म्हणजे दर्जेदार, रसिकप्रियता हे ठरलेलेच होते.
अजरामर साहित्य लिहणाऱ्या कविवर्य राजा बढे यांचे महाराष्ट्र राज्यगीत पुढे देत आहे.
राजा बढे यांना आपल्या पोर्टल तर्फे विनम्र अभिवादन.
– संपादक
– टीम एनएसटी ☎️ 9869484800
कै राजा बढे यांचा परिचय छान आहे. धन्यवाद