महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रा. जगदीश संसारे यांचा राजभवनात नुकताच सत्कार करण्यात आला. प्रा. जगदीश संसारे यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ‘चला नारायण अस्त्राला शरण जाऊया’ या लघुनाटिकेला विशेष पुरस्कार देण्यात आला. त्यासाठी राज्यपालांच्या हस्ते संसारे यांचा सत्कार करण्यात आला.
महाभारतात अश्वत्थाम्याने पांडवांचा नाश करण्यासाठी सोडलेले नारायण अस्त्र आणि कोरोनाचा हाहाकार यांचा संबंध हा या नाटिकेचा विषय होता. या नाटिकेत सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा, विरार पश्चिम येथील कॅथॉलिक समाजातील विद्यार्थ्यिनींनी भूमिका केली होती, हे विशेष.
या सत्काराबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना प्रा जगदीश संसारे म्हणाले, “हा पुरस्कार मला मिळाला नसून माझ्या महाविद्यालयाला मिळाला आहे. संपूर्ण व्यवस्थापन वृंद आणि खास करून प्रभारी प्राचार्य डॉ सुभाष डिसोझा यांचे मार्गदर्शन फार मोलाचे आहे. सध्याचे प्राचार्य डॉ प्रकाश डोंगरे यांना सुद्धा धन्यवाद !
आणि अर्थातच माझ्या सहाही कलाकारांना मानाचा मुजरा !”

समाजामध्ये धार्मिक वृत्ती जोपासली जावी तसेच घराघरात कृष्ण महिमा पोचावा, हा उद्देश समोर ठेऊन महाराष्ट्र एंटरप्रिनर चेंबर आणि धन्वंतरी आरोग्य सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘कृष्ण महिमा अर्थात अध्याय २०२१’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ९५० सहभागी स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धेत ‘चला नारायण अस्त्राला शरण जाऊया’ ही लघुनाटिका विशेष उल्लेखनीय पुरस्काराची मानकरी ठरली.
प्रा .जगदीश संसारे हे रेडिओ पुणेरी आवाज एफ एम 107.8 वर आर. जे. म्हणून अती लघु कथा (अलक) खूप सुंदर पद्धतीने सादर करतात.

– लेखन : विलास कुलकर्णी
– संपादक : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

🌹मनःपूर्वक अभिनंदन 🌹
अशोक साबळे
अंबरनाथ