जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील उज्जैनकर फाउंडेशन तर्फे मराठी भाषा संवर्धनासाठी व विद्यार्थ्यांच्या प्रबोधनासाठी गेल्या पंधरा वर्षापासून विविध शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला, आरोग्य, कृषी व पर्यावरण क्षेत्रातील विविध उपक्रम सतत राबविण्यात आलेले आहेत.
त्यामध्ये ८ मे २०१० ला कु-हा- काकोडा येथे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले राज्यस्तरीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन, त्यानंतर सहा व सात जून २०१९ ला ५७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन, त्याचप्रमाणे तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य, मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रियाचे आयोजन, राज्यातील विविध नामवंत व्याख्यात्यांना आमंत्रित करून तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रबोधन, ग्रामीण लेखक निंबाजीभाऊ हिवरकर यांच्या “लावण्यांची चंद्रकोर “या कादंबरीवर चंद्रकोर हा पहिला चित्रपट २०१५ मध्ये मुक्ताईनगर तालुक्याच्या इतिहासात प्रथमच प्रदर्शित झाला. मराठी भाषा संवर्धनासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम सतत राबवले गेलेले आहेत.
मुक्ताईनगर तालुक्यातील बाल, किशोर व युवकांना अशा संमेलनाचा लाभ व्हावा म्हणून, पहिल्या शिव राज्यस्तरीय बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन १३ फेब्रुवारी २०२२ रोजी करण्यात आलेले आहे. या संमेलनामध्ये ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा, तापी-पूर्णा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा, कथाकथन, परिसंवाद, कविसंमेलन व महाराष्ट्र लोककला लावणी नृत्य, वासुदेव, गोंधळी गीतं व मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन केलेले आहेत.
या संमेलनासाठी राज्यातील विविध मान्यवर तज्ञांची उपस्थिती लाभणार आहे. तरी हे संमेलन यशस्वी करण्यासाठी साहित्यिक, रसिक, सुजाण नागरिक बंधू भगिनींनी या संमेलनासाठी मदत करून सहभाग नोंदवावा असे आवाहन या संमेलनाचे मुख्य आयोजक तथा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी केले आहे.

– टीम एनएसटी. 9869484800