जुलै महिन्याची सकाळ! आज सकाळी ऑफिस ला पोहोचायला नेहमीपेक्षा एक तास लवकर तयार झालो. आज अमेरिकेतून एका एंटरप्राईस विभागाचा प्रमुख आपल्या नवीन टीम बरोबर येणार होता. त्याच्या नवीन टीम ला माझ्या विभागाची तोंडओळख हवी होती. आठवडाभर मुक्काम होता त्यांचा ऑफिस मध्ये. सर्व मुख्य माणसांच्या मुलाखती, इंडस्ट्री रेलशनशिप बिल्डिंग इव्हेंट, ग्रुप डिनर्स असा भरगच्च कार्यक्रम होता. सवयी प्रमाणे मी तयार होऊन सर्वात शेवटी कंपनीचे ओळख पत्र गळ्यात चढवले आणि मनाशी “पुन:श्च हरी ओम” म्हणत घराबाहेर पाऊल टाकले. आठवडाभर चालणाऱ्या नवीन परीक्षेला परत एकदा सुरुवात झाली होती !
या अशा कॉर्पोरेट भेटींना आताशी सरावलेल्या आम्हा सर्वांना, या भेटींचे दूरगामी परिणाम अनुभवाअंती कळाले होते. म्हणूनच एखाद्या परीक्षेला सामोरे जावे तसे आम्ही या वरवर फक्त बिझनेस मीटिंग भासणाऱ्या या भेटींना तयार झालो होतो. संपूर्ण आठवडाभर राहणारी आणि भेटीगाठी घेणारी ही टीम काही आमच्या विभागाची तर नव्हतीच. मग आम्ही त्यांना एवढा वेळ किंवा महत्व का द्यावे बरे ?
या प्रश्नाचे उत्तर सर्वसाधारणपणे बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या टीम विषयी, त्यांच्या कार्याविषयी अभिप्राय जाणून घेण्यासाठी वापरणाऱ्या यंत्रणेत दडले आहे. हे विशिष्ट भागधारक, व्यावसायिकरित्या महत्वाचे मानले जातात कारण तुमच्या विभागाच्या कामगिरीचा बरा वाईट परिणाम त्या विभागावर सुद्धा होऊ शकतो. भेट देऊन परत येणाऱ्या विभागप्रमुखाला तुमच्या विभागाचे श्रेष्ठी अगदी सहज अनौपचारिक संभाषण असावे तसे त्यांच्या हाताखालील टीम विषयी, त्यांच्या कार्याविषयी अभिप्राय विचारतात. अगदी भेटी मध्ये कोण माणसे चांगली वाटली आणि कोणामध्ये सुधारणा पाहिजे वगैरे संभाषण सुद्धा व्यवस्थित केले जाते. ही सर्व माहिती नंतर वर्षअखेरीस होणाऱ्या विभागाच्या आणि त्यातल्या माणसांच्या कामगिरीचे मूल्यांकन करताना वापरली जाते.
काय दैवदुर्विलास आहे पहा.. वर्षभर तुम्ही कितीही मेहनत केलीत, तुमच्या विभागाचे मापदंड कितीही उच्च ठेवले तरी एखादी अशी भागधारकाची भेट आणि त्याने तुमच्या विषयी तुमच्या वरिष्ठांना सांगितलेलं अभिप्राय हा चांगला नसेल, तर तुमच्या बाकीच्या सर्व वर्षभराच्या कामगिरीवर पाणी फिरवू शकतो.. आणि या प्रक्रियेला “अपील” नसते.
असे विविध भागधारक वर्षभरात तुम्हाला भेटीगाठी देतच असतात, म्हणजे तुमची “परीक्षा” ही वर्षभर चालूच असते. काही भागदारक “खट्याळ“ असतील, काही कारणाने तुमच्याकडून अजाणतेपणे दुखावले गेले असतील, तर त्यांच्या तुमच्या मॅनेजरकडे व्यक्त केलेल्या अभिप्रायाला राजकीय रंग चढू शकतो. या सर्वातून तावून सुलाखून तुम्ही यशस्वीरीत्या कसे बाहेर पडता, यातच शेवटी तुमचे व्यावसायीक यश सामावले असते.
उमेदवारीच्या काळात आम्हाला या प्रक्रिया म्हणजे विनाकारण लादलेले काम वाटायचे. अनेक वर्षांनंतर जेव्हा आम्हीही जबाबदारीची पदे सांभाळू लागलो तेव्हा आमची नजरही परिपक्व झाली आणि हिरीरीने आम्ही याच प्रक्रियेत एका जबाबदार भागधारक विभागाच्या दृष्टिकोनातून केव्हा सामील झालो हे आम्हाला कळालेच नाही. फरक एवढंच होता की आम्ही आता “परीक्षक” होतो आणि परीक्षा देणारे बहुतेक वेळा दुसरे होते. आम्हाला अशा भेटीनंतर त्या त्या विभागप्रमुखाला अभिप्राय देताना, कंपनीला अपेक्षित असलेला या प्रक्रियेचा खरा रचनात्मक फायदा कसा करावा हे पुरेपूर कळाले होते. परीक्षा चालूच राहिल्या, पण प्रक्रियेचे चक्र सुधारले!
नवीन कंपनीत आम्ही आमचा जम बसवण्याच्या मार्गावर असताना माझ्या तत्कालीन मॅनेजरकडून, कंपनी संस्कृतीत पक्क्या मुरलेल्या महिला बॉस कडून एक अतिशय कमालीची शिकवण मिळाली आणि पुढे आयुष्यभर लक्षात राहिली.
दिवसभराच्या एका ग्रुप मीटिंग मधून आम्ही बाहेर पडून खास रेस्टॉरंटमध्ये जेवण घेत होतो. त्या जेवणाच्या मोठया टेबलावर जमून आम्ही काही तरुण मंडळी बॉस च्या उपस्थितीत राजकीय उलाढालीवर उगाचच चकाट्या पिटत होतो. मोठ्याने हसणे, एकमेकांना टाळ्या देणे, फालतू पीजे करणे चालूच होते आणि त्यासगळ्या वातावरणात बॉसची आणि बाकी विभागप्रमुखांची उपस्थिती आम्ही जणू विसरूनच गेलो होतो. नाहीतरी कामाविषयीचे संभाषण दिवसभरात संपलेच होते आणि ही काही औपचारिक मीटिंग ची जागा ही नव्हती. त्यामुळे आम्ही सर्व आरामात होतो.
दुसऱ्या दिवशी ऑफीसमध्ये पोहोचल्या पोहोचल्या बॉस समोर दत्त म्हणून उभ्या राहिल्या. ईकडली तिकडली जुजबी बोलणी झाल्यावर त्यांनी मूळ विषयाला हात घातला. संथ आवाजात अजिबात न रागावता त्यांनी बोलायला सुरवात केली.
“कालची मीटिंग चांगली झाली. सर्व पाहुण्यांसाठी संध्याकाळच्या जेवणाच्या पाककृती ही चांगल्या निवडल्या होत्या. पण तू तुझे स्वत:चे जेवणाच्या टेबलावरचे वर्तन (बिझनेस बिहेविअर) आठवून पाहिलेस का ?” मॅडम श्वास घ्यायला थांबल्या. आठवतय.. पण नक्की काय खटकते आहे मॅडम तुम्हाला ?” मी धैर्य गोळा करून विचारले. “मला असे वाटते की तुझे दिवसभरातले व्यावसायिक वर्तन अगदी बिनचूक झाले, परंतु जेवताना तू अगदी वाहवत चालला होतास. कदाचित दिवसभराचे मीटिंग चे टेंशन उतरल्यामुळे असेल कदाचित पण तुझे वागणे तुझ्या पदाला आणि अधिकाराला साजेसे नव्हते.
मॅडम पुढे विचारपूर्वक बोलू लागल्या “लक्षात ठेव की, तू कंपनीतल्या एक प्रमुख विभागाचा प्रतिनिधि म्हणून, तुझ्या टीमचा लोकप्रतिनिधी म्हणून या मीटिंग मध्ये भाग घेत आहेस. येणारे अतिथि, मग ते कंपनीतले असोत किंवा कंपनीबाहेरचे; ते सतत तुला, तुझ्या वर्तुणुकीला, तुझ्या पदाबरोबर येणाऱ्या अधिकाराच्या जोरावरच जोखत असतात.. आणि त्यावरून मनातल्या मनात ते विचार करत असतात की जर अधिकारीवर्ग असा असेल तर त्या कंपनीची संस्कृति कशी असेल ? त्यांची ही परीक्षा आणि तुम्हाला पडताळण्याची क्रिया सतत चालू असते. त्याला जागेचे किंवा वेळेचे बंधन राहत नाही. मग ती जागा कंपनीची मीटिंग रूम असो किंवा एक डिनर टेबल.” मॅडम जरा स्मितहास्य करत आपल्या सांगण्याचा समोरच्यावर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी थांबल्या.

“हे माझ्या गळ्यातले कंपनीचे कार्ड बघतो आहेस ना ?” मॅडम आम्हा सर्वांच्या गळ्यात नेहमी लटकणारे कंपनीचे ओळखपत्र दाखवत पुढे म्हणाल्या “मी घरातून निघताना हे कार्ड गळ्यात घालूनच बाहेर पाऊल ठेवते. त्याचा अर्थ असा की ज्याक्षणी मी हे कार्ड घालते त्याक्षणी मी संपूर्णपणे कंपनी प्रतिनिधीच्या भूमिकेत शिरली असते… आणि त्या क्षणापर्यंत मी त्याच भूमिकेत रहाते जोपर्यंत कार्ड गळ्यातून काढत नाही. तू हे कधीही विसरू नकोस की जोपर्यंत हे कार्ड गळ्यात घालून तू वावरतोस, तोपर्यंत तुझ्या आजूबाजूची मंडळी तुला कंपनी प्रतिनिधी च्या नजरेतूनच बघत असतात आणि त्या भूमिकेशी प्रामाणिक राहणे हे तुमचे कर्तव्य ठरते. हे गळ्यात घातले की मी सतत माझ्या कंपनी रोल मध्ये दुसऱ्यांच्या परीक्षेला सामोरी जाण्यास सज्ज असते कारण स्वानुभावावरून तुला आता कळले असेल की आपल्या व्यवसायात ही परीक्षा वेळ आणि जागेच्या बंधना शिवाय सतत होत असते.” बॉस चा निर्णायक आवाज माझ्या कानात आणि मनात बराच काळ रेंगाळत राहीला.
थोडक्यात काय की शाळा कॉलेज च्या परीक्षा संपल्या की हायसे वाटायचे दिवस लगेच संपतात, जेव्हा तुम्ही अशा व्यवसायात शिरता जिथे परीक्षेचा मापदंड न वापरता, विविध प्रक्रिया तुम्हाला सतत मापत असतात. बाकीच्या शैक्षणिक परीक्षांचे निकाल ठराविक कालावधीत लागतात, पण वरील परीक्षा घेतल्या जात आहेत हेच त्या प्रसंगात असणाऱ्या लोकांना फार ऊशीरा कळते. त्यांचे निकाल ही अधिकृतरित्या घोषित होत नसतात तर त्यात असणाऱ्या माणसांच्या सर्वसाधारण व्यावसायिक यशावरून जोखले जातात. मोठेच गौडबंगाल असते हे !
..आणि ही गुंतागुंत अजूनही पुढे वाढते जेव्हा तुम्ही स्वतः परिक्षकाच्या भूमिकेत शिरता आणि लोकांविषयीचे निर्णय घेण्याची पाळी आता तुमच्यावर येते.
बाकी काही नाही.. ही तर तुमच्याच परीक्षेची पुढील पायरी असते !
— लेखन : उपेंद्र कुलकर्णी. सिंगापूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800