नाद वेणूचा ऐकता
राधा धावत आली
सावळ्याला शोधताना
ती स्वतः ला विसरली….
राधेच्या पैंजणांचा ऐकुनी नाद
कृष्णमूर्ती लपून बसली
त्याच्या सोन खुणांच्या पावलांनी
राधा त्याला शोधीत आली….
राधेच्या मुख कमलावरची
अधीरता त्याला दिसत होती
तरीही लीला करण्यास्तव
खट्याळ कान्हा बाजुला लपती….
कधी मंदिरी कधी डोंगरी
कृष्णमुर्ती हसत होती
राधा भ्रमित होऊनी
कान्हास्तव रडवेली झाली….
राधेच्या प्रेमापोटी
कृष्ण किनारी आला
अन राधेच्या डोळ्यात पाहुनी
तिच्याच डोळ्यात हरवुनी गेला….
कृष्णाला पाहुनी राधा हसली
अन लाजून थोडी बावरी झाली
मोरपिसाच्या स्पर्शाने राधा थोडी शहारली….
कृष्णबाधा झाली बहुदा
कृष्णसख्या रे सावर मजला
सावळ्या ह्या तुझ्याच लीला
नको खेळूस हा खेळ जीवघेणा….
तुझी शाम निळाई पसरू दे
माझ्या डोळ्यांवरती
घे हातात हात माझा
जाऊ कालिंदीच्या काठावरती….
चल जाऊ कालिंदीच्या काठावरती….
– रचना : सौ. मंजुषा किवडे