रातराणीचा गंध,
जाणवे संध्याकाळी
अवचित सख्याची सय कातरवेळी
राधा होऊनि कावरीबावरी शोधिते
अवखळ कान्हा
कुठे लपे सांजवेळी
मोहरलेल्या आमराईतून सुगंध येई
बहरल्या वृक्षवल्लरी
सजे नव्हाळी
अलगुजाचे सुस्वर मधुर येता कानी
प्रेम बावरी राधा हरखुनिये अवेळी
पर्णफुलांतून सळसळते ते हितगुज
हृदयीसाठवून होई
धुंद संध्याकाळी
राधिका बावरी
तुज साठी कान्हा
अवचित ये प्रियकरा मज जवळी
युगानुयुगे वाट पाहते मी प्रेमबावरी
प्रिय कान्हा
मी तुझीच सांज वेळी
नको लपंडाव जीव कासावीस होई
रोमरोमी तुझाच ध्यासवेळी अवेळी
तुझीच राधिका, मनोरमणा प्रिया
कृष्णसखा तू माझाच रे वेळोवेळी

– रचना : स्वप्नगंधा सतीश आंबेतकर