सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नुकताच रानडे इन्स्टिट्यूट मध्ये अत्यन्त आनंदी वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्यास विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. प्र. ना. परांजपे, प्रा डॉ किरण ठाकूर, विभागाचे माजी विद्यार्थी व ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हेमंत जोगदेव, ज्येष्ठ संपादक अरविंद गोखले व विभागाचे अनेक आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.
“२४ वर्षांनंतर देखील या विभागाने माझी आठवण ठेऊन मला निमंत्रित केले हे माझ्यासाठी विशेष आहे. मुळात या विभागातल्या एकंदरीत वातावरणामुळे आणि इथल्या वाचन संस्कृतीमुळे आजवर अनेक विद्यार्थी घडले आहेत” असे विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. प्र. ना परांजपे म्हणाले.
यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असणाऱ्या १९९५-१९९६ च्या माजी विद्यार्थ्यांचा याप्रसंगी परांजपे सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पदव्युत्तर पदवीच्या द्वितीय वर्षाच्या मिहिर शेटे आणि रिद्धी चंद्रचूड ह्या विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या ‘मीडिया राइज्’ नियतकालिकाचे अनावरण, माजी विद्यार्थी ‘न्यूज स्टोरी टुडे’ चे संपादक देवेंद्र भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, पंढरपूरच्या महापूजेचा मान जसा सर्व प्रथम येणाऱ्या वारकऱ्यास देण्यात येतो, त्या धर्तीवर या नियतकालिकाच्या प्रकाशनाचा मान श्री भुजबळ यांना मिळाला.
निवृत्त विभाग प्रमुख प्रा डॉ किरण ठाकूर यांचा ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सपत्नीक सत्कार करण्यात आला💐. तसेच प्रा संजय तांबट यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला.😊
या संपूर्ण मेळाव्याचे आयोजन विभागाच्या पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले होते.
दरवर्षी अशा स्नेहमेळाव्याचे आयोजन रानडे इन्स्टिट्यूट येथे केले जाते. अगदी ज्येष्ठ संपादकांपासून ते नवख्या पत्रकारांपर्यंत, विभागाचे आजी-माजी विद्यार्थी असलेले सगळेच ह्या मेळाव्यास उपस्थित असतात. अल्पोपहारासोबत, जुन्या आठवणींना उजाळा देत दिलखुलास गप्पा होतात.
११० वर्ष जुन्या ‘रानडे इन्स्टिट्यूट’ ह्या इमारतीला विद्युत रोषणाई करून तेथील वर्ग सजवले जातात. नव्याने या विभागाचा ‘भाग’ झालेल्या विद्यार्थ्यांना थोर मोठ्या व्यक्तिमत्त्वांचे मार्गदर्शन या निमित्ताने होते.

– लेखन : शंतनु वेल्हाळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🌹छान उपक्रम 🌹