आघाडीचे गायक, संगीत शिक्षक आणि नाट्य अभिनेते माननीय रामदास कामत यांच्या निधनाची दुःखद वार्ता आपल्याला धक्का देऊन गेली. एक बुलंद दमदार आवाज अस्तंगत पावला.
रामदास कामत म्हटले की आठवते ते त्यांचे “देवाघरचे ज्ञात कुणाला” हे मत्स्यगंधा नाटकातले पद ! अभिषेकी बुवांचे संगीत आणि रामदास कामतांचा स्वर. अगदी मणी कांचन योग…! मत्स्यगंधातील “नको विसरू संकेत मीलनाचा” हे पदही त्यांनी अजरामर करून ठेवले आहे. ह्याच बरोबर “चिरंजीव राहो जगी नाम”, नाटक ~ धन्य ते गायनी कळा, “तम निशेचा सरला” आणि “प्रेम वरदान” ही ययाती आणि देवयानी या नाटकांतील गाणी खास त्यांचीच आहेत.
नाट्यसंगीताखेरीज त्यांनी अनेक भक्तीगीते, भावगीते, स्तोत्रे गायिली आहेत. १८ फेब्रुवारी १९३१ रोजी गोव्यातील साखळी या गावी त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. त्यांचे वडील बंधूही गायक होते. तेच त्यांचे सुरवातीचे संगीत गुरू. पुढे यशवंतबुवा जोशी यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना पूर्णवेळ संगीताला वाहून घेणे शक्य झाले नाही.
मुंबईत अर्थशास्राची पदवी घेतल्यानंतर नोकरी सांभाळून त्यांनी आकाशवाणीवर गाणे, जमेल तसे नाटकात काम करणे चालू ठेवले होते. वयाच्या सातव्या वर्षी, १९३८ साली त्यांनी बेबंदशाही नाटकात बाल संभाजीचे काम केले होते, वास्तविक हे गद्य नाटक, परंतु त्यातही त्यांनी दोन पदे सादर केली होती. पुढे तर जवळ जवळ सगळ्याच संगीत नाटकांतून त्यांनी भूमिका केलेल्या आहेत.
एकच प्याला~रामलाल
मानापमान~धैर्यधर
मृच्छकटिक~चारूदत्त
सौभद्र~अर्जून, कृष्ण, नारद.
मात्र मत्स्यगंधा~पराशर,धन्य तू गायनी कळा~तानसेन, मदनाची मंजिरी~सारंगधर, व ययाती आणि देवयानी~कच या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
बीड येथे २००९ मध्ये झालेल्या ८९ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. तसेच २००८ च्या विष्णुदास भावे पुरस्काराचे ते मानकरी ठरले. एका थोर कलावंताला आज आपण पारखे झालो आहोत.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच माझी त्यांना भावंजली !

– लेखन : अरूणा मुल्हेरकर. अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
अरूणाताईंनी रामदास कामतांच्या जिवनाचा उत्तम आढावा घेतला आहे. त्यांच्या परिवारा बरोबर सगळ्या मराठी संगीत, नाटक रसिक लोकांना त्यांची उणीव जाणवेल. पण कामतांचे संगीत, गाणी सर्वांच्या कानात, मनांत अमर असतील. माझी पण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
अरुणा मुल्हेरकर यांनी रामदास कामत या चतुरस्त्र व्यक्तीमत्वाच्या सांगितीक आणि रंगभूमीवरील प्रवासाचा छान आढावा घेतला…
रामदास कामत यांच्या स्मृतींस आदरांजली..