रामदास बोटीच्या जलसमाधीस आज, 17 जुलै, 2023 रोजी बरोबर 76 वर्षे झाली. या निमित्ताने या बोट दुर्घटनेत बळी पडलेले कै. पांडुरंग पोसू घरत, यांचे चिरंजीव श्री श्रीरंग घरत यांनी हृद स्मरण पुढे देत आहे.
या दुर्घटनेत बळी पडलेल्या सर्वांना विनम्र अभिवादन.
– संपादक
देशाच्या जलवाहतुकीच्या इतिहासातील एक सर्वोच्च दुर्घटना म्हणून उल्लेखलेल्या तसेच या दुर्घटनेने अलिबाग, मुरुड, म्हसळा, रोहा, श्रीवर्धन, महाड, माणगांव, पोलादपूर, दापोली, वेंगुर्ला, रत्नागिरी आणि परळगाव, लालबाग, गिरणगाव पट्टा आणि गिरगांव येथील कोकणवासियांच्या व मुंबईकरांच्या हृदयाचा ठोका चुकविणाऱ्या, रेवस धक्क्यापासून केवळ 4 कि.मि. अंतरावर काष्याच्या खडकावर आपटून झालेल्या रामदास बोटीच्या जलसमाधीस आज बरोबर 76 वर्षे झाली.
अलिबाग हे अलिबाग तालुक्यातील 4/5 किलो मिटरपेक्षा जास्त आकारमान नसलेले शहर. जणू काही ते एक बेटच होते. दोन बाजूला समुद्र, तिसऱ्या बाजूला रेवदंडा-साळावची खाडी आणि चैाथ्या बाजूला धरमतरची खाडी. या खाड्यांवर त्यावेळी ‘‘होडी’’ किंवा ‘‘तर’’ या शिवाय पलिकडे जाण्यासाठी काहीच साधन नव्हते. पलिकडून निरनिराळ्या ठिकाणी जाण्यासाठी बस सेवा मात्र कार्यरत होती.
मुंबईत जाण्यासाठी निरनिराळ्या वाहनानी प्रवास करावा लागत असे. त्यामुळे रस्त्याच्या मार्गाने प्रवास करणे फार त्रासदायक होते. अलिबागवरून मुंबईला जायचे म्हणजे धरमतर खाडीपर्यंत बस नंतर ‘‘तर’’ किंवा ‘‘होडी’’ नंतर पुन्हा बसने पेण, पनवेल व मुंब्रा पुढे आगगाडीने प्रवास करावा लागत असे. परंतु अलिबागपासून सुमारे 15 मैलावर असलेल्या रेवस बंदरापासून रेवस ते मुंबई ही जलसेवा अखंडपणे सुरू होती.
रामदास बोटीची दुर्घटना वर्तमानकाळातील तरुण पिढीला इतिहासात जमा झाल्यासारखी आहे. परंतु रामदास बोटीच्या त्या अपघातामध्ये ज्या कळ्या उमलण्याआधीच खुडल्या गेल्या, ज्या अनेक उमलत्या फुलांचे निर्माल्य झाले, ज्या अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, त्या त्या घरातील जी माणसे आज हयात असतील त्यांच्या हृदयावरची ती जखम अजूनही चक्क ओलीच असणार.
17 जुलै 1947 हा गटारी अमावस्या सणाचा दिवस. सकाळी-सकाळीच भाऊच्या धक्क्यावर प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. प्रत्येकाला आपले दुपारचे जेवण आपल्या कुटुंबात बसून जेवणाची तीव्र इच्छा होती. रामदास बोट भाऊच्या धक्क्यावरुन नेहमीप्रमाणे सकाळी आठ च्या सुमारास 743 प्रवासी घेऊन रेवस धरमतरला प्रयाणास सज्ज झाली. माझे वडील कै. पांडुरंग पोसू घरत, मु. भुते, पो. थळ, ता. अलिबाग या गावचे रहिवासी. ते तोंडलीचे व्यापारी होते. त्यांना जराही उमगले नसेल की आपला शेवटचा श्वास हा आज काशाच्या खडकाजवळ घेतला जाईल. आम्ही पोरके झालो. आजी वय वर्षे 55, आई वय वर्षे 30, आत्या वय वर्षे 13, बहिण वय वर्षे 6 व मी वय वर्षे 4. पुढील वाटचालीत आम्ही जे हाल अपेश्टांचे दिवस काढले असे दिवस कोणत्याही मनुष्य प्राण्यावर येऊ नयेत, अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आमचा कुटुंब प्रमुखच आमच्यातून निघून गेला. पुढे कष्ट, कष्ट आणि कष्टच.
नेहमीप्रमाणे दर्याचे पाणी सळसळ कापत, मोठमोठयाने भोंगा वाजवत, तीन मजली असलेली ही अवाढव्य रामदास बोट मोठ्या दिमाखाने सकाळी 8.00 वा. रेवस बंदराकडे निघाली. हवामान पावसाळी होते. जोराच्या, उंचीच्या लाटा होत्या. धक्क्यावर तीन नंबरचा म्हणजे तुफानी वादळाचा धोक्याचा इषारा देणारा बावटा लागला होता. परंतु असा बावटा त्याआधी बोटीने अनेक वेळा पाहिला होता. बोटीतील उतारूने अशा वादळी वातावरणात अनेक वेळा प्रवास केला होता. गटारी अमावस्या सणाचा दिवस, घरचे जेवण असल्यामुळे उतारुंचे चेहरे काहीसे आनंदीच झाले होते.
बोट तासाभरात बहुतांश अंतर कापून आल्यानंतर आवचित तुफान वारा सुटला. दर्यावर अचानक घनदाट काळे ढग जमा झाले आणि मुसळधार पाऊस सुरु झाला. सोसाटयाच्या वादळाने रामदास बोट हलू लागली. दर्या चारही बाजूने फेसाळलेला होता. पुढचे काहीच दिसत नव्हते. किनारा कुठे आहे हे समजत नव्हते. मुसळधार पाऊस, फेसाळलेला दर्या, चक्री वादळ, तुफान वारा आणि प्रचंड लाटा सुरु होत्या. अशात बोटीच्या एका भागात पाणीही शिरले. त्यामुळे प्रवाशांत घबराट निर्माण झाली. महासागराने आक्राळ विक्राळ रुप धारण केले होते. पुढे काय करावे हेच कप्तानाला कळत नव्हते. बोटीवर बिनतारी यंत्राची सोय नव्हती. त्यामुळे मुंबईशी संपर्क तुटला होता. जेमतेम बोट काश्याच्या खडकाजवळ आली. उंचच उंच लाटांमुळे आणि तुफान वारा आणि मुसळधार पावसामुळे कप्तानाच्या दृश्टीक्षेपात काषाचा खडक आला नसावा. त्यामुळे बोट जाऊन खडकावर आपटली. निव्वळ दुर्दैवाने त्याच वेळेस एक जोरदार लाट स्टार बोर्डाकडून येऊन आदळली. त्यामुळे बोट कलली. सर्व प्रवासी घाबरुन दुसऱ्या बाजूला पळाले.
बाया बापडयांनी व लेकरांनी आकांत केला. पुरुष मंडळी देखील भयभित झाली. कॅप्टन शेख व चिफ ऑफिसर आदमभाई हे जीवाच्या आकांताने ओरडून पळू नका, एका बाजूस जाऊ नका म्हणून सर्वांना सांगत होते. पण प्रवाशांनी भयापोटी कोणाचेच ऐकले नाही. दुसरी लाट येण्याच्या मधल्या वेळात बोटीला तोल सावरला नाही व दुसरी लाट ही उतारूंची काळ लाटच ठरली. काय होत आहे हे कळण्याच्या आतच बोट समुद्राच्या तळाशी गेली. रामदास बोटीला जलसमाधी मिळाली. बहुतांशी प्रवासी बोटीबरोबरच तळाशी गेले. जे काही वर येऊन वाचले परंतु ते थोडा वेळच टिकले. लाटांचा जोर व समुद्रात पोहून थकल्यामुळे तेही बहुतेक बुडाले.

रेवस येथील कोळ्यांच्या रोजच्या दिनचर्येनुसार ताजी मासळी घेऊन मुंबई येथे काही कोळी बांधव 5 गलबते घेऊन चालले होते. त्या गलबतांमध्ये सुमारे रु. 2000/- हजारांची मासळी होती. ते काही अंतरावर गेल्यावर त्यांना समुद्रावरील वातावरणात काही फरक जाणवला. दर्या तुफान झाला होता. सोसाट्याचा वारा सुटला होता. काळ्याकुट्ट ढगांनी सगळीकडे अंधार पसरला होता. वादळाची शक्यता वाटू लागल्याने त्यांनी आपली गलबते वळवून पुन्हा रेवस बंदरात आणली. परंतु तासाभरात आकाश निरभ्र झाले. वादळी वाऱ्याची चिन्हे नाहीशी झाल्यामुळे ते आपली गलबते घेऊन मुंबईच्या दिशेने पुन्हा निघाले.
रेवसपासून चार साडेचार किलोमिटरवर त्यांची गलबते आली असतील नसतील तोच त्यांना अघटीत असे दृष्य पाहावयास मिळाले. समुद्रामध्ये अनेक माणसे पोहत असून त्यांच्यामधूनच प्रेते वाहत चालली आहेत. हा काय प्रकार ? हे त्यांना कळलेच नाही. ही इतकी माणसे येथे कशी काय ? याचा ते विचार करू लागले. परंतु ती विचार करण्याची वेळ नव्हती. कोळी बांधवांनी आपली गलबते त्वरीत माणसांच्या जवळ नेली व त्यातील जी जीव वाचवण्यासाठी धडपडत होती त्यांना त्यांनी भराभर आपल्या गलबतामध्ये घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी या कोळी बांधवांनी आपल्या गलबतात असलेली सुमारे दोन हजार रुपयांची मासळी समुद्रात फेकून देऊन माणसांच्या जिवितापुढे आपल्या मालाची पर्वा केली नाही. काही कोळी बांधवांनी समुद्रात प्राणांची पर्वी न करता उड्या टाकून भराभर माणसांना गलबतावर चढविण्यास मदत केली. सुमारे 75 माणसे गलबतावर घेऊन ती पाचही गलबते रेवस बंदराकडे आली. हे सर्व प्रवासी रामदास बोटीतीलच होते. कॅप्टन शेख व चिफ ऑफिसर आमदभाई हे दोघे वाचले. त्यांनी पोहत आणि गलबतातून रेवस बंदराला येऊन नजीकच्या तार ऑफिसमधून तार केली. एक कोळी बांधव पोहून मुंबई बंदरात पोहोचला. त्यांनी रामदास बोट बुडाल्याची वार्ता दिली. परंतु त्यावर कंपनी ऑफिसरने विश्वास ठेवला नाही. थोडयाच अवधीत दुसऱ्या एका मच्छिमार कोळी बांधवाने महापालिकेच्या कर्मचाऱ्याचे प्रेत आपल्या गलबतामधून मुंबईला आणले. त्यानी कंपनी ऑफिसरला वार्ता दिली तेव्हा कुठे बोट बुडाल्याची खात्री पटली.
मुंबईला वार्ता पसरल्यामुळे उतारूंच्या नातेवाईकांनी भाऊच्या धक्क्यावर येऊन कंपनी ऑफिसरला घेराव घातला. आमचे लोक कोठे आहेत ? त्यांची प्रेते तरी द्या असे ते ओरडू लागले. या रामदास बोटीच्या दुर्घटनेमध्ये आमच्या भुते आणि बामणोली गावातील तिघेजण सापडले. हे तोंडलीचे व्यापारी होते. तिघेही कर्ते पुरुष होते. कुटुंबाचे आधारस्तंभ होते. मालाचे पैसे आणण्यासाठी मुंबईस गेले होते. त्यांत माझे वडील कै. पांडुरंग पोसू घरत, भुते तसेच कै. नाना म्हात्रे, बामणोली या दोघांना जलसमाधी मिळाली. तिघांपैकी श्री. नारायण म्हात्रे हे वाचल्यामुळे जीवंत घरी आले. त्यांच्याकडून डोळ्यादेखत घडलेली रामदास बोटीची कहाणी कळली.
रामदास बोट एकूण 743 प्रवाशांनी खच्चून भरली होती. त्यापैकी बोटीचा कॅप्टन शेख सुलेमान व चिफ ऑफीसर आमदभाई यांसह 169 प्रवासी वाचले. बाकी सर्वच बुडाले. बोटीत मुलांसह इतर 30 खलाशी होते. बोटीची लांबी 179 फूट होती. रुंदी 29 फूट तर उंची 3 मजल्यांची होती. श्री. रामजी नावाचा कोळी बांधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सुमारे 75 उतारुंना वाचविले. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील भुते या गावचे श्री. नारायण सखाराम म्हात्रे, मुळे ता. अलिबाग येथील तुकाराम हिरु घरत, अलिबाग शहर कोळीवाडयातील श्री. बारकू मुकादम हे तर फक्त 14 वर्षांचे होते. ते पोहून आले. मृत्यू पावलेल्या प्रवाशामध्ये अलिबाग शहरातील, माझे मित्र श्री. प्रकाश जोशी यांचे वडील, श्री. सदानंद विरकर सरांचे वडील आणि गंभीर शेट होते. हे तिघेही व्यापारी होते. तसेच श्री. गजानन चव्हाण यांचे वडील. या सर्वांना रामदास बोटीने जलसमाधी दिली.
रेवदंडा येथील हरी मढवी हे जीवंत घरी आल्यानंतर पुढे जन्मलेल्या त्यांच्या मुलाचे नाव रामदास ठेवले असे समजते. रोहा तालुक्यातील जयराम चोरगे, मुरुड तालुक्यातील मजगावमधील जगन्नाथ गोरखनाथ मुंबईकर, श्रीवर्धनचे केशवराव वैद्य, पेण तालुक्यातील वाषी गावचे मंगलदास पद्मजी पाटील, तसेच कोळीवाड्याातील दोन कोळी बांधव, पेण तालुक्यातील दिव मधील गोविंद नाईक, बोर्डीचे कृष्णा म्हात्रे, भाल ता. पेण येथील हरिभाऊ म्हात्रे आणि मुंबईमधील विश्वनाथ कदम हा मुलगा तर 16 वर्षाचा होता. त्यावेळी त्यांची मुंबईतील एका मासिकात विस्तृत मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. हे सर्व ज्यांच्या त्यांच्या सुदैवाने वाचले. हे परमेश्वरा तुझी लिला अगाध आहे आणि तू ललाटी जे लिहून ठेवलेले आहे ते अटळ आहे. त्या घटनेचा उल्लेख आज 76 वर्षांनी देखील करताना आम्हा कोकणवासियांना व मुंबईकरांना दुःख होत आहे. आमचे कुटुंब पूर्ण उध्वस्त झाले. कुटुंब प्रमुख गेल्यानंतर कुटुंबाची काय वाताहत होते हे ज्यांनी अनुभवले आहे हे त्यांच्याच हृदयापर्यंत भिडेल.
आमच्याप्रमाणे अशी अनेक कुटुंबे वाऱ्यावर पडली होती. कोण होते त्यांचे अश्रू पुसायला ? कोणाला वेळ होता ? बोट बुडाल्याच्या तिसऱ्या दिवसापासून बोटीतील माणसांचे मृतदेह अलिबाग ते मांडव्यापर्यंतच्या समुद्र किनाऱ्यावर लागू लागले. आपापल्या नातेवाईकांचे देह ओळखण्यासाठी लोकांच्या झुंडी जमू लागल्या. ज्यांच्या नातेवाईकांची ओळख पटली त्यांनी ते मृतदेह ताब्यात घेतले. परंतु जे बिनवारस होते ते मृतदेह कुजत पडून राहिले. अलिबाग मधील एक माजी नगराध्यक्ष, मानवतेचा करुणाकर आणि कोकण ऐज्युकेशन सोसायटी मधील समाजसेवेचा वसा घेतलेले हाडाचे माजी शिक्षक कै. वि. ना. टिल्लू सर हे पुढे सरसावले. त्यांनी पुढाकार घेऊन वीस जणांची एक टीम तयार केली. त्यामध्ये नंतर त्यांच्या या अलौकिक समाजकार्यात अनेकजण स्वखुशीने सामिल झाले. त्यांनी कुदळ, फावडे घेऊन 110 कुजलेल्या प्रेतांना समुद्र किनाऱ्यावरच मुठमाती दिली.
एकमेकांना मिठया मारलेल्या मोठया माणसांचे आणि एकमेकांना बिलगलेल्या माय लेकरांचे मृतदेह पुरताना त्यांना काय वाटले असेल याचे वर्णन करण्यास शब्दच अपुरे पडतात. कुठे कुजलेल्या मृतदेहाच्या बोटातील सोन्याच्या आंगठ्या काढण्यासाठी बोटे कापून मानवतेला काळिमा फासणारे नराधम आणि कुठे स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता कुजलेल्या प्रेताना मुठमाती देणारे महामानव. अशा या महामानवाला आणि त्याच्या टीमला सलाम.
रामदास बोटीच्या दुर्घटनेकडे शिपींग कंपनीने तसेच शासनाने देखील दुर्लक्ष केले. कारण तो काळ पण तसाच होता .स्वातंत्र्य मिळालेले होते. त्याच्या आनंदात स्वातंत्र्यपूर्व काळातील घटनेकडे स्वतःचा जम बसविण्याच्या धुंदित नवीन शासनाने दुर्लक्ष केले. ती वेळेच चमत्कारीक होती. इंग्रज आपला झेंडा उतरवून जाण्याच्या घाईत तर भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्याचा सुवर्णकलश घेण्याच्या गर्दीत. कोकणातील चाकरमानी आपल्या बायका मुलांना भेटण्यासाठी या बोटीने जात असत म्हणून रामदास बोटीला हजबंडस बोट म्हटलं जायच.
सन 1936 मध्ये बांधलेल्या, 406 टन वजनाच्या, 1942 मध्ये सरकारने युद्ध कार्यासाठी घेतलेल्या, रामदास बोटीला त्या दिवशी म्हणजे 17 जुलै 1947 रोजी काश्याच्या खडकावर रेवस बंदराजवळ आपटून जलसमाधी मिळाली. इतका कालावधी होऊन देखील या घटनेचा उल्लेख करताना आम्हा अलिबाग व रायगडवासियांना अति दुःख होते. बोटीबरोबरच समुद्राच्या तळाशी गेलेल्या व काही वर राहिलेल्या परंतु थोड्याच वेळ पाण्यावर टिकलेल्या प्रवाशांना तसेच रामदास बोटीत जलसमाधी मिळालेल्या सर्व प्रवाशांना भावपूर्ण 76 वी दुःखद श्रध्दांजली.
— लेखन : श्रीरंग घरत. भुते – अलिबाग
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
रामदास बोटची दुर्घटना, अंगावर काटा उभा राहतो. खुप दुःखदायक घटना, दुर्दैवी अकस्मात होत्याचे नव्हते होत सर्व जलसमाधीस्थ झाले.