मागच्या रविवारी अचानकपणे मुंबईला जाण्याचा योग आला. मी, माझे मित्र नितीन आव्हाड आणि प्रशांत वाणी, आम्ही तिघे होतो.
नितीन, नाशिक मधील एक यशस्वी प्रिंटिंग व्यवसायिक आणि प्रशांत, एक प्रथितयश बिल्डर. माझं म्हणाल तर मी एका वित्तीय कम्पनीत वरिष्ठ व्यवस्थापक आहे.
आम्हा तिघांचे भिन्न भिन्न व्यवसाय आहेत परंतु मैत्री बालपणापासून घट्ट आहे. नितीनने फक्त मोघम कल्पना दिली होती, की एका अतिशय विलक्षण व्यक्तीमत्वाची गाठ घेण्यासाठी मुंबई गाठायची आहे. त्या प्रमाणे आम्ही साधरणपणे साडेचारच्या सुमारास प्रभादेवी येथील, पॉप्युलर प्रकाशन चे सर्वेसर्वा श्री रामदास भटकळ यांच्या निवासस्थानी पोचलो. दारावरची बेल वाजवताना आम्हाला बिलकुल अंदाज नव्हता की पुढे साक्षात एक चालता बोलता इतिहास आम्हाला भेटणार आहे.
दार भटकळ काकांचा मदतनिस दीपक ने उघडले. त्याने त्यांना हाक मारली आणि काका बाहेर आलेत. नितीन ची आणि त्यांची नाशिक च्या नुकत्याच पार पडलेल्या साहित्य सम्मेलनात ओळख झाली होती आणि ओळखीचं रूपांतर स्नेहात झाले. नितीन ने आमची ओळख वगैरे करून दिली आणि आमच्या गप्पा रंगायला सुरवात झाली. सुरवातीला प्रकृती बद्दल विचारले असता अतिशय मिश्किल पणे त्यांनी सर्व आजारांना कसे स्वबळावर पिटाळून लावले ह्याचे गमतीदार वर्णन केले आणि आज ८७ व्या वर्षी ही ते कसे ऍक्टिव्ह आहेत हे आम्हाला क्षणोक्षणी जाणवत होते. ते सध्या एक थिसिस लिहीत आहेत आणि त्याच बरोबर आत्मचरित्र. त्यांच्या बोलण्यात प्रखर गांधीवाद होता आणि महात्मा गांधींच्या विषयी प्रचंड भक्ती ओसंडून वाहात होती.
त्यांचा जन्म १९३५ सालाचा त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्य संग्राम अगदी जवळून बघितलेला. अनेक उदाहरणे देऊन त्यांनी आम्हाला माहीत नसलेले गांधीजी उलगडून दाखवलेत. त्यांच्या बोलण्यातुन एक लक्षात आले की इतिहास चोहोबाजूंनी अभ्यास करण्याची गोष्ट आहे. वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी पॉप्युलर ही प्रकाशन संस्था काढली आणि आजवर लक्षावधी पुस्तके प्रकाशित केली आहेत. इंग्लंड मध्ये जाऊन त्याविषयी चा अभ्यास केला. पुढे बोलता बोलता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विषय निघाला, तेंव्हा जरी ते गांधीवादी असले तरीही एका विशिष्ट विषयावरून ते त्यांच्या आगामी पुस्तकात सावरकरांची बाजू मांडणार आहेत आहे असे कळलं.
भटकळ काकांच्या बोलण्यातून व्यासंग जाणवत होता. मधेच संगीताचा विषय निघाला, त्यावरून कळलं कि ते उत्तम गातात सुद्धा आणि ह्या वयात सुद्धा त्यांचा रोज रियाज सुरु आहे. दिवसभर कॉम्प्युटर वर बसून लिहीत असतात. अतिशय उत्साही स्वभाव आणि त्याच बरोबर उत्तम व्यासंग असा दुहेरी पैलू त्यांच्या व्यक्तीमत्वाला आहे.
आगामी उदगीर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाची त्यांनी नितीन जवळ आस्थेने चौकशी केली. नितीन ने नासिक चे सम्मेलन यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी अत्यंत परिश्रम घेतले होते.सर्व साहित्यिकांची निवासाची तथा सम्मेलन स्थळी जाण्या येण्याची जबाबदारी नितीन वर होती. ती त्यानें उत्तमरीत्या पार पाडली होती आणि त्यामुळेच काकांचे आणि त्याचे स्नेहबंध जुळले आहेत.
सुमारे दिड दोन तास आमच्या छान गप्पा झाल्या आणि त्यानंतर आम्ही पन्नाशीतील तिघाही म्हाताऱ्यांनी त्या ८७ वर्षाच्या तरुणाचा निरोप घेतला. त्यांच्या भेटी चे गारुड गेला आठवडाभर मनाला उभारी देते आहे.एक विलक्षण ऊर्जा घेऊन आम्ही त्यादिवशी बाहेर पडलो होतो. ह्या उत्साह मूर्तीला परमेश्वर उदंड आयुष्य देवो आणि त्यांच्या कडून अशीच साहित्य सेवा घडत राहो हीच प्रार्थना.
– लेखन : दीपक ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
दीपक ठाकूर यांनी माननीय रामदास भटकळ या अलौकिक व्यक्तीमत्वाविषयीच्या भावना आदरपूर्वक उलगडल्या आहेत.
खरोखरच ही जुनी खोडे.यांच्याकडून शिकण्यासारखं खूपच.
मृत्युच्या हातात हात घालून कार्यक्षमतेने जगणारी ही निष्ठावान माणसे.यांना सप्रेम,सादर प्रणाम!!