लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते श्री देवेंद्र भुजबळ यांना पनवेल येथे पहिला “गौरव महाराष्ट्राचा : राज्यस्तरीय माध्यमभूषण पुरस्कार” नुकताच प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री रामशेठ ठाकूर म्हणाले की, १९९८ साली मी पहिल्यांदा खासदार झालो, तेव्हा श्री देवेंद्र भुजबळ हे कोकण विभागाचे माहिती उपसंचालक होते. तेव्हापासून मी त्यांचे काम जवळून पाहिले आहे. सतत लोकाभिमुख, कार्यतत्पर, सर्व माध्यमातील व्यक्तींशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केलेले, त्यांना मदत, मार्गदर्शन करणारे आणि विशेष म्हणजे, निवृत्त झाल्यावरही स्वस्थ न बसता प्रसार माध्यमांमध्ये आजही ते सक्रिय असून त्यांना माध्यमभूषण पुरस्कार देताना आपल्याला आनंद होत आहे. त्यांना हा पुरस्कार दिल्याने या पुरस्काराचीच प्रतिष्ठा वाढली आहे असे सांगून त्यांनी श्री भुजबळ यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कोकणातील दि म्हसळा टाइम्स या वृत्तपत्राच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त रुक्मिणी पांडुरंग पोटले चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आणि आदर्श शैक्षणिक समूह संचलित, डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालय व आदर्श टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला. खरं म्हणजे, मुख्य पुरस्कार प्रदान समारंभ हा ११ ऑक्टोबर रोजी पार पडला. पण त्यावेळी श्री देवेंद्र भुजबळ हे ईशान्य भारतात गेलेले असल्याने उपस्थित राहू शकले नाही. म्हणून आयोजकांनी रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पुरस्कार निवड समितीचे प्रमुख, जेष्ठ लेखक श्री सुनील चिटणीस यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत करून श्री देवेंद्र भुजबळ यांच्या प्रसार माध्यमातील सततच्या उपक्रमशिलतेमुळे तसेच नवोदित पत्रकार, लेखक,कवी यांना सतत प्रेरणा देऊन, मार्गदर्शन करून व्यासपीठ उपलब्ध दिल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड केल्याचे सांगितले. त्यांच्या माध्यमभूषण या पुस्तकाचेच नाव पुरस्कारासाठी समर्पक वाटल्याने तेच नाव या पुरस्काराला दिले आहे असेही ते म्हणाले.
दि म्हसळा टाइम्स या वृत्तपत्राच्या दिवाळी अंकाचे प्रकाशनही श्री रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी दि म्हसळा टाइम्स या वृत्तपत्राचे संपादक श्री रमेश पोटले, न्यूज स्टोरी टुडे च्या निर्मात्या सौ अलका भुजबळ, पत्रकार सर्वश्री गणेश कोळी, रवींद्र मालुसरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमापूर्वी श्री रामशेठ ठाकूर यांना देवेंद्र भुजबळ यांनी, त्यांनी लिहिलेले माध्यमभूषण पुस्तक भेट देऊन, पुस्तकातील व्यक्तिरेखांविषयी सविस्तर माहिती दिली. पुस्तक चाळल्यानंतर श्री रामशेठ ठाकूर यांनी या पुस्तकामुळे मराठी साहित्यविश्वात एका वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकाची भर पडली, असे गौरवोद्गार काढून श्री देवेंद्र भुजबळ यांचे अभिनंदन केले.

यावेळी बोलण्याच्या ओघात रामशेठ ठाकूर यांनी, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःची जडणघडण कशी झाली, हे भावूक होऊन सांगितल्याने सर्व उपस्थित भारावून गेले. त्यांचे हे ७५ वे वर्ष असल्याने काही नवे उपक्रम सुरू करण्याबाबतही त्यांनी सुतोवाच केले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.

नमस्कार देवेंद्र साहेब..!
गुरुकृपा संस्थेच्या सर्व सभासदांच्या वतीने आपलं मनःपूर्वक अभिनंदन..!!
असेच कार्य आपल्या हातून घडत राहो, आणि असेच पुरस्कार आपणास प्राप्त होत राहोत; ही मनापासून शुभेच्छा..!!
… प्रशान्त थोरात,
पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था .
9921447007