Thursday, February 6, 2025
Homeसाहित्यराष्ट्रभक्त राष्ट्रसंत: तुकडोजी महाराज

राष्ट्रभक्त राष्ट्रसंत: तुकडोजी महाराज

कोरोनाच्या जीवघेण्या , भयंकर संकटाशी भारत सरकार, महाराष्ट्र शासन,सर्व संबंधित यंत्रणा अहोरात्र लढत आहे.या परिस्थितीत समाजाची अनुकुल मनोभूमिका घडविण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आज हवे होते, असे क्षणोक्षणी वाटतंय. तुकडोजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांचं प्रेरणादायी स्मरण ……….. .

‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ यांची ३० एप्रिल २०२१ रोजी ११२वी जयंती होती. तुकडोजी महाराज यांचा जन्म ३० एप्रिल १९०९ रोजी, अमरावती जिल्ह्यातील यावली येथे झाला. आई मंजुळाबाई आणि वडील बंडोजी ठाकूर यांनी त्यांचं माणिक नाव ठेवलं. वडील शिवणकाम करत. आई वरखेड येथील तुकाराम बुआ वानखेडे यांची मुलगी होती. बालपणीच आई बरोबर त्यांना घर सोडून वरखेड इथे यावं लागलं. वरखेड येथे संत अडकूजी महाराज यांच्या सहवासात तुकडोजी महाराज यांचं अंतरंग फुललं. अभ्यासापेक्षा खेळण्याची त्यांना विशेष आवड होती, तरी तिसरी पर्यंत त्यांचं शिक्षण झालं. अडकूजी महाराज यांना त्यांनी गुरू मानलं. अडकूजी महाराज यांनीच त्यांना तुकड्या हे नाव दिलं.

दरम्यान तुकडोजी महाराज आपल्या यावली गावी आले. तिथे आल्यावर काही दिवसांनी गुरू अडकोजी महाराज यांचे देहावसान झाल्याचं कळालं. गुरू वियोगामुळे त्यांना वैराग्य आलं. घरचं शिवण यंत्र त्यांनी विकलं. तपश्चर्या करण्यासाठी ते निघून गेले. त्यांनी पुढील जीवन राष्ट्रभक्ती, समाज सुधारणा, ग्राम विकास, सक्रिय अध्यात्म यासाठी अर्पण केले. तुकडोजी महाराज यांनी ३ हजार मराठी हिंदी भजने, २ हजार अभंग, ५ हजारो ओव्या लिहिल्या. खंजिरी वाद्य वाजवून रसाळ पणे ते कीर्तन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करत. लेखनात शेवटी ते  तुकड्या म्हणे असे लिहीत. म्हणून लोक आदराने त्यांना तुकडोजी महाराज म्हणू लागले. सामान्य माणूसच नाही तर तत्कालीन थोर राष्ट्रीय नेते, संपादक, पत्रकार, समाज धुरिण त्यांच्या विचारांनी, कार्यांनी प्रभावित झाले होते.

तुकडोजी महाराजांनी १९४२च्या चले जाव आंदोलनात सक्रिय भाग घेतला होता. त्यामुळे त्यांना ४ महिन्यांची सजा भोगावी लागली. त्यानंतरही इंग्रज सरकारने त्यांना चन्द्रपूर, वर्धा जिल्हा बंदी केली होती. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकारच्या समाज कल्याण, परिवार नियोजन, नशा बंदी अशा अनेक उपक्रमात त्यांनी सतत सहभाग घेतला. अमेरिकेत १९५२ झालेल्या, जपानमध्ये १९५५ मध्ये झालेल्या विश्व धर्म परिषदेत त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. १९५६ मध्ये त्यांनी भारत साधू समाज निर्माण केला. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत भाग घेऊन ११ दिवसात ११ हजार एकर जमीन त्यांनी मिळवून दिला होती. पुणे येथील पानशेत धरण प्रलय, विदर्भातील पूर,नागपूर येथील हिंदू मुस्लिम दंगा, कोयना भूकंप अशा अनेक अटी तटीच्या वेळी ते सरकार बरोबर उभे राहिले.

चीनने भारतावर १९६२ साली आक्रमण केले. त्यावेळी त्यानी संरक्षण निधी उभारण्यासाठी मोलाचे योगदान दिले. सैनिकी शाळांना प्रोत्साहन दिले.१९६५च्या भारत- पाक युद्धात सीमावर्ती भागात प्रत्यक्ष जाऊन त्यांनी भारतीय सैनिकांना जोश दिला. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत त्यांनी ११ दिवसात ११ हजार एकर जमीन मिळवून दिली होती. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे सुरू केलेला गुरुकुंज आश्रम आज जणू एक विद्यापीठ बनला आहे. त्यानी लिहिलेले ग्रामगीता म्हणजे ग्राम विकासाचा धर्मग्रंथच होय. स्त्री सक्षमीकरण, अस्पृश्यता निर्मूलन,  दुबळ्यांचं सबळींकरण या साठीही ते आयुष्यभर झटत राहिले.

अशा या थोर राष्ट्रभक्त, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे १० नोव्हेंबर १९६८ रोजी देहावसान झाले. नागपूर येथील विद्यापिठास त्यांचे नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने काही उपक्रमांना त्यांचे नाव दिले आहे. काळ जसजसा पुढे जात आहे, तसे त्यांचे विचार अधिकच पटत आहेत. आजच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

लेखन – देवेंद्र भुजबळ. 9869494800 .

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी