राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त, स्वानुभवावर आधारित लिहिलेला हा लेख आपल्याला नक्कीच विचार करायला प्रवृत्त करेल असा आहे…..
— संपादक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने बातम्या, लेख वाचून, दूरचित्रवाणी वाहिनीवर विविध कार्यक्रम पाहून माझे मन अनेक वर्षे मागे गेले. घराजवळ एके काळी दर संध्याकाळी रिंगणात जमणाऱ्या शाळकरी पालव्यांचा हा असा मोठा महावृक्ष झाल्या चे पाहून कौतुक आणि आश्चर्य दोन्ही ही वाटत होते. गेल्या अनेक वर्षात आपण ही या प्रवाहाचा वेगवेगळ्या रूपात, पण छोटासा भाग होतो याची जाणीव दुणावत होती.
अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. मी शाळेत असताना घराजवळ एका मोकळ्या पटांगणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रोज संध्याकाळी “शाखा” भरायची. वेगवेगळ्या वयाची मुले शिस्तीत उभी किंवा रिंगणात दिसायची. नेहमीच लक्ष वेधुन घेणाऱ्या गोष्टी म्हणजे त्याकाळी संघाचा असलेला गणवेश -काळी टोपी, पांढरा शर्ट आणि मातकट अर्धी पाटलोण. सोबत संचालकाच्या हातातला लाकडी दंड आणि या सर्वावर जणू नजर ठेवून असलेला भगवा झेंडा ! त्या शाळकरी वयात, माझ्याच नव्हे तर त्या वयातल्या सर्व मुलांमध्ये हे दृश्य नेहमीच कुतूहल निर्माण करायचे. काय बरे करतात ही मुले जमून रोज संध्याकाळी ?
मला आठवते, सोसाटीतला माझा मित्र जेव्हा शाखेत रोज जाऊ लागला तेव्हा परत त्याच कुतूहलापोटी मी सुद्धा त्याच्यामागोमाग शाखेत गेलो होतो पण मग स्वतःहून परत गेलो नाही, कारण प्रश्न पडायचा की संध्याकाळी मित्रमंडळींबरोबर क्रिकेट खेळावे का शाखेत जावे ? अर्थात क्रिकेट ला नेहमीच झुकते माप असायचे. पण इथेच मला संघाचे पहिले वैशिष्ट्य जाणवले. मी शाखेत परत फिरून गेलो नाही पण संघाची मुलेच घराच्या दारात संध्याकाळी न चुकता ठराविक वेळेला बोलवायला यायला लागली ! बेल वाजायची आणि “चला” असे म्हणत हसतमुख चेहऱ्याने मुले दरवाज्यासमोर उभी राहायची. किती छान पद्धत आहे पहा. एखादे तरुण रक्त चुकून जरी संपर्कात आले, तरी संघ ती एक संधी समजून त्याला आपल्या बोधनात समावेश करण्याचा जीवापाड प्रयत्न करते. मग कधी त्यांच्या आग्रहामुळे तर पुढे ओढीने, मी नेमाने शाखेत आणि पुढे “बैठकांनाही” जाऊ लागलो. सर्वच नाविन्यपूर्ण होते तेव्हा. संघाचे नेहमी वापरात येणारे शब्द वेगळे होते – शिक्षक, बैठक, साधना वगैरे. खेळ वेगळे, संघ प्रक्रिया अगदी वेगळ्या, सर्व प्रकारच्या माणसांचा समावेश होईल असे कार्यक्रम आणि त्यांची उद्दीष्टे वेगळी आणि मुख्य म्हणजे वाढत्या वयातल्या तरुणाई ला पकडून ठेवण्याचा आटापिटा ही अगदी वेगळा.

संघ कार्यक्रमात जेव्हा नियमित हजेरी होऊ लागली तेव्हा त्या शाळकरी वयातही कळले कि हे प्रकरण नेहमी पेक्षा वेगळे आहे. अनेक साधना वर्गातून हिंदू संस्कृतीचा न समजलेला अर्थ कानी पडायला लागला. ही सर्व बोलणारी मंडळी आपापल्या क्षेत्रात मातबर आणि मुरब्बी तर वाटतात, पण वागायला, पेहरावात एवढी साधी कशी? असे अनेक प्रश्न त्याकाळी पडायचे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक माणूस तुम्हाला आयुष्यात जरी पहिल्यांदाच भेटला, तरी वर्षानुवर्षांची ओळख असल्या सारखा कसा वागवतो हे गौडबंगाल काही उलगडत नव्हते. हे रसायन वेगळे होते. मी स्वतः आजूबाजूच्या बघ्या गर्दीत उभा राहून अर्ध्या चड्डीला हसण्यापासून, हातात दंड घेऊन रोज संध्याकाळी शाखेत “नमस्ते सदा वत्सले मातृभूमे” ही प्रार्थना केव्हा म्हणू लागलो हे मलाच कळले नाही.
संघाच्या संस्कृती ची ओळख आणि सर्वंकष शक्ती खरी पाहायला मिळाली ती माझ्या शालेय वयात १९८३ च्या सुमारास झालेल्या तळजाई च्या पठारावरच्या शिबिरामध्ये ! अक्षरशः हजारो भारलेल्या संघकर्मींचा आणि अनेक माझ्या सारख्या, जीवनाची नक्की दिशा चाचपणाऱ्या होतकरू तरुणांचा भरलेला तो मेळावा होता. जणू संघाने कात टाकून नव्याने शक्तिप्रदर्शन करावे तसे काहीसे वातावरण होते. “हिंदू सारा एक मंत्र हा दाही दिशा ना घुमवूया” त्या कार्यक्रमाच्या ह्या ब्रीद काव्याने प्रत्येकाच्या मनावर ठाशीव मोहोर उठवली होती.
विद्यार्थी दशा संपली आणि माझे आयुष्य प्रवाही झाले. पुढचा मार्ग शोधताना संघापासून, त्यांच्या कार्यक्रमापासून मी तसा दूर गेलो. बाकीच्या असंख्य भारतीयांप्रमाणे माझ्या पोटापाण्याच्या विवंचनेत बुडालो. आता संघ तेव्हाच दृग्गोचर व्हावयास लागला जेव्हा जेव्हा राष्ट्रीय संकटे आपल्यावर कोसळली. अगदी मोरवी नदीच्या पुराशी सामना करायचा असो वा उत्तराखंड च्या अतिवृष्टीशी लढा द्यायचा असो. कुठलेही संकट असेना, मदतीसाठी संघकर्मीं आपल्याला सर्वात पुढे दिसतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून धावत येतात, निर्भीडपणे लागेल ती मदत करतात आणि कोणीही पाठ थोपटायची वाट न बघता परत आपापल्या गावी निघून जातात.
या सर्व कालावधी दरम्यान जेव्हा संघ आपल्या संस्कृती चे विविध पैलू हळू हळू माझ्या सारख्या कुतूहल असलेल्या तरुणांसमोर उलगडत होता, तेव्हा काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. त्यात सर्वात प्रथम जाणीव ही की हा समुदाय “राजकीय” अजिबात नाही.
हे सर्व प्रबोधन आणि हिंदू संस्कृती ची नव्याने ओळख हे काही मते मिळवायला केलेला उपदव्याप नक्कीच दिसत नाही. आपली उद्दीष्टे काय, ध्येय काय हे सांगायची कळकळ सर्व संघकर्मीं मध्ये दिसत होती आणि मनाला भिडत ही होती, परंतु दिसत नव्हती ती कुठल्याही प्रकार ची बळजबरी, किंवा त्यांची मते आपल्यावर लादायचा प्रयत्न. राष्ट्रीय संकटांचा सामना करावयाचा असो वा समाजोपयोगी कामासाठी मनुष्यबळ उभारणे असो. त्यासाठी फक्त आवाहन केले जायचे ‘ गरज आहे, आम्हाला सामील व्हा’ परंतु सक्ती कधीच दिसली नाही; कारण जेव्हा हातातल्या मनुष्यबळाला समाजाभिमुख व्यक्तिमत्व बनवण्यावर दिवस रात्र मेहनत घेतली जाते, तेव्हा कठीण प्रसंग येताच अतिरिक्त सक्ती ची आवश्यकता नसते.
समाज बांधताना असे म्हणतात, की स्वतःचीच झीज झाल्याशिवाय सुसंस्कृत व्यक्ती निर्माण होत नाही आणि संघाच्या बाबतीत तर सर्व प्रकारची झीज सोसून, समाजाला सुसंस्कृत करण्याचे हे शिवधनुष्य सर्वांनी मिळून उचललेले दिसते.

संघाचे सूत्र आता थोडे थोडे माझ्या सारख्या अराजकीय असणाऱ्या सामान्य माणसाला उलगडायला लागले होते. संघाची पहिली पायरी सुरु होते ती सवंगडी किंवा मनुष्यबळ गोळा करण्यापासून. अर्थात भर योग्य वयोगटातील तरुणाई गाठण्याकडे असतो. समविचारी सवंगड्यांतून साहजिकच निर्माण होतो तो “सहकार.” सहकारातून पुढे येते ते मनुष्यबळाचे “संघटन“. सुविचारी संघटनेपासून अपेक्षित आहे तयार होणारा “सुसंस्कृत समाज” आणि सरते शेवटी अशा समाजाकडून निर्माण होणारी “राष्ट्र बांधणी” ची अपेक्षा. अर्थात या सर्व टप्यांवर नेहमी पाठबळ पुरविणारा, दिशा आणि प्रेरणा दाखवणारा असतो तो एकमेव भगवा ध्वज! माझ्यापुरते मी काढलेले सार ते असे.
या वर्षीच्या विजयादशमी संचलनात सर्व स्तरातील आणि वयोगटातील कार्यकर्त्या महिलांना पाहून अभिमानाने मन भरून आले. सोबत अतिशय शिस्तीत संचलन करणाऱ्या शेकडो संघकर्मींना बघून सुरक्षिततेची मिश्र भावना ही नक्कीच आली. आपल्या सीमा रेषेवरील खडा पहारा देणाऱ्या सैनिकांना बघून शत्रू राष्ट्राच्या मनात ज्या भावना येत असतील, तश्याच भावना या कडक संचलन करणाऱ्या संघ कार्यकर्त्यांना बघून, देशाच्या आंतरिक शत्रूंच्या मनात ही येत असतील का?
माझ्या सारख्या नागरिकांसाठी मात्र एवढ्या वर्षात एक गोष्ट नक्कीच बदलली आहे. स्वतःच्याच देशात स्वतःचीच प्रतिमा डळमळीत करणाऱ्या छुप्या शक्तींच्या विरुद्ध उभे राहण्याचे धैर्य संघाने अथक प्रयत्नांती जनमानसाला दिले आहे. कुणाच्या अध्यातमध्यात नसणाऱ्या माझ्या सारख्या सामान्य हिंदू माणसाला, अस्थिर करण्याचे कुणी योजले तर त्या विरुद्ध जाब विचारण्यासाठी संघाने निश्चितच व्यासपीठ दिले आहे. एक हाक दिली तर शंभर समविचारी माणसे जमा करू शकू असा विश्वास हिंदू समाजात निर्माण केला आहे.
सध्याच्या भारतातील सर्व राजकीय, सामाजिक आणि लोकसंख्येच्या बदलात, माझ्या सारख्या अनेक सामान्य हिंदू माणसांना अश्याच सुरक्षा कवचाची नितांत आवश्यकता आहे आणि त्याच प्राथमिक सुरक्षिततेच्या आशेने, भविष्यात तो जर संघाकडे अजूनच खेचला गेला तर त्यात काही नवल वाटू नये.

— लेखन : उपेंद्र कुलकर्णी. सिंगापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
