समोरच्याला जिव्हारी लागेल असं आपलं बोलणं, वागणं “रिकॉल” करता आलं असतं, मागे घेता आलं असतं तर आयुष्यभर पश्चाताप करायची वेळच आली नसती, हो ना ? याच विषयीचा हा विचार प्रवर्तक लेख…..
अमेरिकेत आल्यापासून सुरवातीच्या काळात बरेच वेळा, साल्मोनेला (एक प्रकारचा बॅक्टेरिआ) सापडल्याने अमूक अमूक दुकानातुन लेट्यूस रिकॅाल केलं, टोमॅटो रिकॅाल केले, कधी कधी लहान मुलांच्या कार सिट्स् सदोष असल्याने रिकॅाल केल्या अशा बातम्या बरेचदा ऐकायचो. काहीवेळा तर गाड्या सुद्धा रिकॅाल केलेल्या ऐकू यायच्या.
सुरवातीला ही काय भानगड आहे ? असं वाटायचं. मग लक्षात आलं की भाज्यांमधे किंवा तयार केलेल्या गोष्टींमधे काही दोष आढळल्यास त्या त्या वस्तू बनवणारी कंपनी बाजारातून त्या वस्तू काढून घेतात.
काही वेळा विशिष्ट गाड्यांचे विशिष्ट पद्धतीने अपघात होतात व ही बाब समोर येते. मग त्या बनावटीच्या गाड्या बाजारातून काढून घेतल्या जातात. यामधे कायद्याचा प्रचंड वचक आणि लोकांच्या सुरक्षिततेला खूप प्राधान्य दिलं जातं.
या गोष्टीचा बारकाव्याने विचार केला तर कायदा पाळण्याची तळमळ, शिवाय लोकांच्या सुरक्षिततेला दिलेलं प्राधान्य तसेच झालेली चूक प्रांजळ पणे कबूल करण्याची वृत्ती दिसून येते. सर्व वस्तू तयार होऊन, सर्व प्रकारचे वेष्टण घालून विक्रीस सज्ज असलेली वस्तूही
सदोष आढळल्याने परत घेतली जाते. मग होणाऱ्या नुकसानाची पर्वा केली जात नाही. यात काही विम्याची तजवीज असेल तरीही समोरच्याच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य दिलं जातं व त्याविषयी कमालीची जागरुकता दाखवली जाते. इतकेच नाही तर दिलगिरीचे निवेदनही दिले जाते. समजा त्यातुनही कुणाचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई अथवा विनामुल्य दुरुस्ती करून देण्यात येते. ग्राहकांचा पूर्ण विचार केला जातो.
सहज मनात आलं, हीच गोष्ट आपण आपल्या बोलण्याविषयी, वागण्याविषयी, विचारांविषयी अमलात आणू शकतो तर ? कित्येकदा असं होतं आपण बोलण्याच्या ओघात काही गोष्टी बोलून जातो व नंतर लक्षात येत, अरे ! असं बोलायला नको होतं. आपल्याला फार पश्चात्ताप होतो पण एकदा बोललेलं वाक्य परत घेता येत नाही. तिथे रिकॅालची सोय नाही.
कधीतरी आपण प्रचंड चिडलेले असतो. काय बोलतोय त्याचं भान देखिल रहात नाही. याबरोबरच समोरचा आपल्या बोलण्याने दुखावला जातोय हे आपल्या गावीही नसतं.
कित्येकदा काही व्यक्तीना तहान भूक सहन होत नाही, मग उगीचच कोणताही विषय भलतीकडे जातो व नको ते घडतं. कधी कधी दुसऱ्याच कोणा माणसाचा राग आपल्याच माणसांवर निघतो.
वस्तू सदोष तयार झाल्या किंवा भाजी खराब झाली तर ती कोणाचं नुकसान होऊ न देता परत घेता येते. सुधारणा करता येते. पण वाग्बाण एकदा सुटला की सुटला. त्याला परत घेता येत नाही. मग त्याने कोणाचे नुकसान होवो वा न होवो. किती बरं झालं असतं अशी रिकॅालची सोय असती तर ? आपण उच्चारलेला प्रत्येक वाईट वा नकारात्मक शब्द परत घेता आला असता.
पण कदाचित् माणसाने कायमच विचारपूर्वक बोलावं, बोलण्याने सुद्धा कोणाचे नुकसान करू नये यासाठीच ही सोय नसावी. ही सोय नाही म्हणूनच कुठेतरी आपण आपल्या विचारांवर, बोलण्यावर ताबा ठेवायला शिकत असू कदाचित्.
रिकॅालची सोय नसल्याने आपण खचितच अंतर्मुख होऊन आपलेच विचार, आपण संवाद कसा साधतो, आपली प्रतिक्रिया काय होते ? ह्या सर्व बाबी पारखण्याची आपल्याला संधी आहे.
बोलण्यामुळे होणारं नुकसान कधीकधी फारच जिव्हारी असतं. बोलणाऱ्याच्या हे कित्येकदा लक्षातही येत नाही. त्याला कळतच नाही की समोरचा माणूस आपल्या बोलण्याने दुखावला जातोय. पण बोलण्याने होणारी जखम मात्र वर्षानुवर्ष वेदना देत राहते, भळभळत राहते.
परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या वाणीच्या चार अवस्था आहेत. यातली वैखरी म्हणजे प्रत्यक्ष बाहेर येणारी वाणी. या शुद्धतेचं काम आतूनच व्हायला हवं खरं तर पण तरीही प्रत्यक्ष बाहेर पडणाऱ्या वाणीने जे नुकसान होते ते भरुन काढणे कदापिही शक्य नाही. म्हणून फार विचारपूर्वक बोलावे.
कधी कधी मस्करी मस्करीतही कित्येकदा दुसऱ्याला जिव्हारी लागेल अस बोललं जातं. त्याचं जो बोलतो त्याला सोयर सुतक नसतं, पण ज्याला झेलावं लागतं त्यासाठी मात्र ते कठीण असतं.
आपण आपल्या स्वत:साठी काही नियम तयार करून घेऊ शकतो. यात मी अमूक प्रकारे कधीही व्यक्त होणार नाही किंवा होईन हे ठरवता येईल. निदान जे व्यक्त करीन ते चांगलच असेल असा पक्का विचार जरी केली तरी सुधारणा होत राहील. एका दिवसात नाही पण सतत प्रयत्नशील राहीलो तर प्रत्येकाला जमेल नक्कीच.
वाणी सुधारण्याचा चंग बांधला की विचारही सुधारु लागतील. विचार सुधारले की व्यक्तिमत्व सुद्धा …
व्यक्तिमत्व सुधारले की त्याचा परिणाम आपल्या
संपर्कात येणाऱ्यांवर पडल्यावाचून राहणार नाही. म्हणजे एक प्रकारची अंतर्बाह्य शुद्धीकरणाची प्रक्रीयाच सुरु होईल, ज्याची सुरवात केवळ जरा थांबून आपल्या विचार व वाणी यांकडे लक्ष देवून होईल.
चला, तर मग आजपासून लक्षात असू द्या आपल्या बोलण्या, वागण्याला रिकॅाल नाही ! तेव्हा बोलण्या, वागण्याआधी विचार हे सूत्र कायम स्वरूपी लक्षात असू द्या !

– लेखन : शिल्पा कुलकर्णी, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ +91 9869484800
खुप सुंदर लेख . 👌
नमस्कार,
आजच्या Newsstorytoday मधून शिल्पा कुलकर्णी मॅडम अमेरिका, यांनी मांडलेली Recall ची संकल्पना अतिशय मौलीक विचार पध्दतीने मांडली आहे. खरंच आपल्या दैनंदिन जीवनात अनवधानाने किती तरी लोकांशी बोलतांना- वागतांना अनपेक्षितपणे जे बोलायला नको ते बोलून जातो आणि आपल्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीच्या मनाला इजा होते. मात्र, आपल्या तोंडातून निघालेले वाग्बाण परत घेता येत नाही. जर अशी Recall ची सोय झाली तर ?
या आणि इतरही विषयावर उत्तम विचार मांडले आहेत मॅडमनी, आपले मनःपूर्वक अभिनंदन!!
राजाराम जाधव,
नवी मुंबई,
9867262675
धन्यवाद ! 🙏🏻
रिकॉल ची concept सुंदरच! लेखही भावला. देवेंद्र जी आपले web portal खूपच आधुनिक होऊ लागले आहे.अशाच नवनवीन कल्पना याव्यात! आम्ही स्वागत करू.