लुकलुकणाऱ्या ताऱ्यांची
आज मैफल होती सजलेली
ताऱ्यांच्या त्या मैफिलीत
होती एक चांदणी रुसलेली
तिचे ते फुगरे गाल बघून
हसला चंद्र गालातल्या गालात
चांदणी मात्र रुसून फुगून
जाऊन बसली कोपऱ्यात
हळूच करुन इशारा चंद्राने
साऱ्या तारकांना खुणावले
तारंकानीही घोळका करून
चांदणीला जवळ बोलावले
चांदणीने फिरविली पाठ
तारका झाल्या उदास बघून
चांदोबा सगळे बघत होता
गालातल्या गालात घेतले हसून
हळूच मग घालून शीळ
चांदोबा ने गाणे सुरू केले
ऐकून सुर सुरेल आवाज
चांदणीचे मन तृप्त झाले
रुसवा फुगवा सोड सखे
तुझाच आहे मी सखा ग
नेहमीच देईन साथ तुला
देतो तुला मी वचन ग
ऐकून चांदोबाचे हे बोल
चांदणीचे अश्रू ओघळले
शिरुन मिठीत चांदोबाच्या
सुर सुरांत मिसळले गेले

– रचना : परवीन कौसर. बेंगलोर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800