‘रे ऑफ लाईट’ ही सामाजिक संस्था त्यांची २४ वी छायाचित्रणाची बॅच लवकरच सुरु करीत आहे.त्या निमित्ताने या संस्थेची आणि संस्थेचे जनक छायाचित्रकार डॉ नितीन सोनावणे यांची प्रकाशमय वाटचाल…….
छायाचित्रणात वाकबगार असणारे, पन्नासहून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आणि इतकेच नव्हे तर छायाचित्रणाच्या क्षेत्रात पीएचडी मिळविलेले सामाजिक बांधिलकी मानणारे संवेदनशील
छायाचित्रकार म्हणून डॉ नितीन सोनावणे ओळखले जातात.
छायाचित्रणाचे क्षेत्र तसे महागडे. त्यामुळे गरीब मुलामुलींच्या आवाक्याबाहेरचे. म्हणून त्या दृष्टीने आर्थिक परिस्थितीमुळे छायाचित्रणासारख्या महागड्या समजल्या जाणाऱ्या क्षेत्रापासून सर्व गरीब मुलांनी दूर राहू नये यासाठी धडपडणारे छायाचित्रकार म्हणूनही डॉ. नितीन सोनावणे यांच्याकडे पाहिले पाहिजे.
डॉ. सोनावणे हे गेली १८ वर्ष “द इकोनॉमिक टाइम्स” या ‘प्रतिथयश’ वृत्तपत्रात मुख्य वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून काम करीत आहेत. पण या पदापर्यंतची त्यांची वाटचाल अत्यंत बिकट परिस्थितीतून गेली आहे. १९९३ साली त्यांनी धारावीतील ‘श्रमिक विद्यापिठातून’ छायाचित्रणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी सर जे. जे. कला महाविद्यालयात छायाचित्रणाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर श्रमिक विद्यापिठात छायाचित्रणाचे शिक्षक म्हणून त्यांनी दोन वर्ष तेथे इतरांना फोटोग्राफी शिकवली.
पण डॉ. सोनावणे यांच्यातील छायाचित्रकार त्यांना गप्प बसू देत नव्हता. म्हणून त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडली आणि १९९५ पासून “मेट्रो बाजार पत्रिका” या हिंदी वृत्तपत्रात छायाचित्रकार म्हणून कामास सुरुवात केली. त्यानंतर राजस्थान पत्रिका, कला कौमुदी, दि फ्री प्रेस जर्नल, आफ्टरनून, बॉम्बे टाइम्स, मिड डे अशा अनेक वृत्तपत्रांमधून छायाचित्रकार म्हणून काम केले.
वृत्तपत्रासाठी छायाचित्रण करीत असताना त्यांच्यातील सामाजिक बांधिलकी त्यांना गप्प बसून देत नव्हती. समाजातील वंचित घटकांचे प्रश्न आपल्या कॅमेराच्या माध्यमांतून समाजापुढे आले पाहिजेत, समाजाची संवेदनशीलता जागी झाली पाहिजे आणि हे प्रश्न सोडविले पाहिजेत या जाणीवेतुन प्रेरित होऊन त्यांनी आपल्या नोकरीचे काम सांभाळून विविध सामाजिक विषयांवर छायाचित्रणाची प्रदर्शने भरविली. या छायाचित्र प्रदर्शनाच्या नावावरुनच त्यांची दाहकता आपल्या लक्षात येते.
त्यातील काही विषय म्हणजे मुंबईच्या लोकलच्या “रुळा शेजारचं लोकांचं जीवन”, “महाराष्ट्रातील आदिवासी भागातील मुलांचे कुपोषण”, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोठ्या पाईपलाईन्स शेजारीच राहणाऱ्या लोकांचं “तहानलेलं जीवन”, “गुजरातचा प्रलयकारी भूकंप”, “वीट भट्ट्यांवर काम करणारे बालकामगार”, “एचआयव्हीग्रस्त बालकांचं जगणं”, “ऊसतोड करणाऱ्या कामगारांचे जीवन”, “सांगलीच्या वेश्यांचं आयुष्य”, “बाबा आमटे यांच्या आनंदवनातील स्वावलंबी लोकांचे जीवन”, “पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावरील प्रदर्शन”, याशिवाय “बहुरुपी कलाकार”, “सिमरन या बारगर्लची दिनचर्या”, “महाराष्ट्रातील लोककलाकारांचे जीवन” असे अनेक विषय त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात आतापर्यंत टिपले आहेत.
डॉ. सोनावणे यांनी साल २००१ मध्ये काढलेली ८ छायाचित्रे आणि साल २००५ मध्ये काढलेली तीन छायाचित्रे जपानच्या ‘कियोसाटो म्युझियम ऑफ फोटोग्राफिक आर्ट्स’ मध्ये कायमस्वरूपी प्रदर्शनासाठी निवडण्यात आली.
तसेच साल २००३ मध्ये देखील जपाच्याच ‘निकॉन इंटरनॅशनल फोटोग्राफी कॉन्टेस्ट’ साठी देखील त्यांच्या छायाचित्राला पुरस्कार मिळाला.
डॉ सोनवणे यांना ४९ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ‘तोलाराम कुकरेजा’ या उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्काराचेही ते सलग दोनदा मानकरी ठरले आहेत.
छायाचित्रणातील पदव्यांबरोबरच त्यांनी पत्रकारितेतील पदवी, मास्टर्स पदवी ही संपादन केली आहे. एवढेच करुन ते थांबले नाहीत तर नुकतीच त्यांनी महाराष्ट्रातील १० लोककलाकारांच्या जीवन चरित्रावर पीएचडी देखील पूर्ण केली आहे. डॉ. नितीन सोनावणे यांनी वृत्तछायाचित्रणातून केलेले २९ वर्षाचे काम आपण त्यांच्या www.nitinsonawane.com या वेबसाईटवर पाहू शकता.
डॉ. नितीन हे जेव्हा कुठल्याही विषयावर फोटो काढायला जातात, तेव्हा फक्त फोटो काढणं इतकाच त्यांचा उद्देश नसतो. तर, त्या फोटोतील लोकांना ते कशाप्रकारे मदत करू शकतील ? त्यांच्यासाठी कशा प्रकारे मदत उभी करता येईल ? त्यांच राहणीमान सुधारण्यासाठी ते काय करू शकतात ? हा विचार सतत त्यांच्या मनात असतो. त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतील, याकडे त्यांचा जास्त कल असतो. त्यांच्यासाठी फोटो काढणं ही दुय्यम गोष्ट असते. लोकांचे दुःख दूर करण्यासाठी माणुसकीच्या नात्याने ते त्या जागी जातात. शक्य होईल ते त्यांच्यासाठी करतात.
डॉ नितीन यांनी आतापर्यंत जे काही थोडेसे काम या क्षेत्रात केले आहे, त्या कामाच्या मोबदल्यात समाजाने त्यांच्या फोटोतील गरजूंना भरभरून मदत केली आहे. उदाहरणं द्यायची झाली तर, जव्हार येथील दाभेरी आश्रम शाळेचे व मध्य प्रदेशातील सुमित्रा पब्लिक स्कूलचे देता येईल. येथील कुपोषित बालकांचा आहार, राहणीमान, शिक्षण यासाठी डॉर्फ केटल केमिकल्स इंडिया प्राइव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीने नवदृष्टी या सामाजिक संस्थेमार्फत गेल्या सात वर्षांत जवळपास १५ करोड रुपये खर्च करून त्या मुलांचा राहणीमानाचा आणि शिक्षणाचा दर्जा फारच बदलून टाकला आहे. हे सर्व नितीन सोनावणे यांचे फोटो पाहून घडले आहे. गेल्या २६ वर्षांपासून ते सातत्याने कुपोषित बालके, त्यांच राहणीमान, त्यांच शिक्षण या गोष्टींवर त्यांच्या फोटोंमधून प्रकाश टाकत आहेत.
दुसरे उदाहरण म्हणजे, मुंबईतील लोकलच्या रुळांशेजारील लोकांच्या जगण्याचं देता येईल. हे लोक किती धोका पत्करून २४ तास रेल्वेच्या सान्निध्यात राहतात, हे नितीन यांनी तीन वर्षं या विषयावर काम करून समाजापुढे मांडलं. त्याचा परिणाम होऊन या लोकलशेजारी राहणाऱ्या (सेफ्टी झोनमध्ये) लोकांना
मोफत अशी २३० चौ. फुटाची घरं इमारतींमध्ये मिळाली. यामध्ये नितीन यांच्या फोटोग्राफीचा फारच मोठा वाटा आहे. त्या लोकांची परिस्थिती त्यांच्या फोटोंमधून त्यांनी ज्वलंतपणे मांडली.
याचप्रमाणे सांगलीची वेश्यावस्ती, मेळघाटातील कुपोषण, भगिनी निवेदिता प्रतिष्ठानमधील एचआयव्ही बाधित बालके, या सर्वांना त्यांच्या फोटोग्राफीमधून आर्थिक मदत मिळवून देण्याचे काम डॉ. नितीन सोनावणे यांनी केले आहे.
समाजात चांगले लोक असतात. दानशूर लोक असतात. फक्त आपल्याला त्यांच्यापर्यंत सत्य परिस्थिती पोहोचवायची असते. ती डॉ. नितीन हे त्याच्या परीने पोहोचवतात आणि समाजही तेथे मदत करीत असतो.
वस्तुत: एखादा छायाचित्रकार आपल्या कामात एवढा व्यस्त असताना आणि विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असताना त्यातच मशगूल राहिला असता. परंतु आपल्याला ज्या अडीअडचणी भेडसावीत होत्या, ज्यांच्यामुळे आपल्याला छायाचित्रण शिक्षण घेण्यात अडचणी आल्या तशाच अडचणी वंचित मुलांना येऊ नयेत, त्यांनी सुद्धा आपल्यातील कला जोपासावी या उद्देशाने डॉ. सोनावणे यांनी २००९ पासून ‘रे ऑफ लाईट’ या नावाची सामाजिक संस्था सुरु केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून गरीब व गरजु विद्यार्थ्यांना अल्पखर्चात छायाचित्रणाचे शिक्षण देण्यात येते. भारतात छायाचित्रण शिकवणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी सुसज्ज असलेली महाविद्यालयेही आहेत. परंतु त्याची फी परवडणारी नसल्यामुळे अनेक गुणी मुले या छायाचित्रणापासून वंचित राहतात. म्हणून ‘रे ऑफ लाईट’ या सामाजिक संस्थेने या मुलांसाठी छायाचित्रणाचे नवे दालन उघडले आहे.
या संस्थेमार्फत गेल्या १३ वर्षात २५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना छायाचित्रण कला शिकवली गेली. त्याशिवाय फोटोशॉप व लाईटरूम वर्कशॉप, जव्हार आणि मोखाडा येथे सामाजिक कॅम्प, फोटोवॉक, नैसर्गिक सहली इत्यादींचे आयोजन या सामाजिक संस्थेमार्फत केले जाते.
‘रे ऑफ लाईट’ या संस्थेच्या छायाचित्रणाच्या अभ्यासक्रमात मुलांना फोटोग्राफीचा इतिहास, फिल्मस् आणि फिल्म्सचे प्रकार, कॅमेरा आणि कॅमेऱ्याचे प्रकार, लेन्सचे प्रकार, डिजिटल कॅमेरा आणि त्याची नियंत्रणे, रचनाकृती आणि फोटोग्राफीचे व्याकरण, टेबलटॉप फोटोग्राफी, मॉडेलिंग फोटोग्राफी, फ्लॅश फोटोग्राफी, आऊटिंग, फंक्शन फोटोग्राफी, ज्वेलरी फोटोग्राफी, प्रेस फोटोग्राफी आदी विषय सविस्तर पणे शिकवले जातात.
हे सर्व मराठी, हिंदी व इंग्रजी मधून शिकवले जाते. जेणेकरुन कमी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील या कोर्सचा पूर्ण फायदा घेता येईल. अतिशय माफक फीमध्ये बेसिक छायाचित्रणापासून ते डिजिटल छायाचित्रणापर्यंत शिक्षण येथे दिले जाते. हे शिक्षण तज्ज्ञ छायाचित्रकांरामार्फत दिले जाते.
खरं म्हणजे वृत्तपत्र छायाचित्रकाराचे काम अत्यंत धावपळीचे, काळ-वेळ न पाहता करावे लागते. कित्येकदा साधे जेवण तर सोडाच, चहा मिळणे सुद्धा मुश्किल असते. अशा बिकट परिस्थितीत काम करीत असताना सुद्धा सामाजिक बांधिलकीतून डॉ. सोनावणे यांनी वंचित घटकातील मुलांना गेली १३ वर्षांपासून छायाचित्रणाचे शिक्षण देण्याचे जे काम सुरु केलेले आहे त्यासाठी ते अभिनंदनास निश्चित पात्र आहेत. डॉ. नितीन सोनावणे यांच्या उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Excellent write up for person who is great photographer, teacher n working for social cause. He has inspired so many young people by imparting knowledge about photography in his lectures. All the best for his future endeavors.
अत्यंत कौतकास्पद.
Excellent work
डॉक्टर नितीन सोनवणे यांची सर्व छायाचित्रे बोलकी आहेत. त्यांच्या चित्राततूनच त्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव असल्याचे जाणवते. धन्यवाद