बालपणातली मजा वाटे पुन्हा पुन्हा यावी
मांडीवर आईच्या मी, तिने म्हणावी अंगाई
तीट लावताच मला माझ्या गाली फुटो हसू
कोपऱ्यात बसावी मी रूसू बाई रूसू रूसू…
बित्तू खेळलो नि कोया सया माया झाल्या गोळा
बाभळीची शेंग पायी वाजे कसा खुळखुळा
सागरगोट्या नि ते खडे हातचलाखी ती किती
सारे पांगले हो आता गेली सोडूनच नाती …
घरघर जात्यासवे आईच्या त्या मांडीवर
घाम गळतसे तिचा नाही केली कुरकुर
ओव्या मुखातल्या तिच्या डोक्यावरून त्या गेल्या
पण आता समजले होत्या मनात रूजल्या…
हळूवार फुटलेत कोंभ नाजुक सुंदर
कवितेने बांधले हो मनी आईचे मंदिर
देव बनला हो तिचा रोज करते मी फेड
छत्रछाया ती शीतल आई घरोघर वड…
रोज पुजावी आईला रोज आठवावी तिला
आठवली नाही आई असा दिवस ना गेला
कधी कधी वाटते हो कुठे पडलो का कमी
किती सोसले हो तिने होती कष्टाची ती धनी…
देऊन ती गेली खूप, दान संस्कारांचे धन
हेच धन अनमोल चोरू शकते हो कोण ?
हीच पुरावी शिदोरी, नाही मागणे हो काही
अमृताचा कुंभ घरी .. अशी आई आई आई…
रचना : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
रोज पुजावी आईला
कवयित्री सुमती ताईंच्या या कवितेत अतिशय सुंदर
शब्दात मातृप्रेमाचा महिमा वर्णन केला आहे.बित्तू,
खळखळ वाजणाऱ्या शेंगा अशा अनेक शब्दातून
बालपण जागं झालं.लहानपणचे खेळ आठवले आणि
माझं मन रम्य त्या बालपणातल्या आणि आईच्या
प्रेमळ सहवासात हरवून गेलं.खूप खूप अभिनंदन ताई.