“मी घराचा सर्वेसर्वा पण ‘हि’च्या परवानगीनं !” सुखी संसाराचं रहस्य ह्या वाक्यातच दडलं असावं.
लग्न, मानव-संकृतीतील एक अत्युन्नत कल्पना म्हणायला हवी. समाज नियोजनाची या पेक्षा उत्कृष्ट योजना काय असावी ?
लग्न म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारा क्षण. तसं म्हटलं तर ‘अंधा मोड’ पण न जाणवणारा. काहींच्या मते ‘जुगार’ही असावा. ‘जॅक पाॅट’ लागल्याचा आनंद व्हावा असा हा क्षण.
अपूर्ततेतून पूर्ततेकडे टाकलेलं पाऊल असं काही रसिक म्हणतात. त्यातलं ‘सत्य’ शोधायला जाणं हे एक जोखमीचे कार्य म्हणायला हवं. ते टाळावं हा सूज्ञ सल्ला.
‘ठेविले अनंते तैसेच रहावे’ ह्यात ‘अनंते’च्या जागी योग्य बदल हाच एक सुख शोधण्याचा मार्ग.
‘या पेक्षा अधिक चांगलं घडलं नसतं’ असा भाव सतत मनात असला की लग्न साफल्याचा लाभ आपल्या कुंडलीत असतो, अन्यथा …
श्रीधर म्हणतो तसं प्रत्येकाचं आकाश वेगळं असतं, पण शेवटी ते “मोठ्या आकाशाचा भाग” असा समजूतदारपणाचा प्रकाश आकाशभर पसरलेला असला की झालं.
तसं लग्न हा एक सोहळा असतो. ‘त्या दोघांचं’ सोडा इतर बऱ्याच जणांना आपली ‘वेगवेगळी’ हौस भागवता येते.
पूर्वी लग्न ‘लावून’ देण्याची जबाबदारी मुख्यत्वे पालकांची असायची, पण नवी पिढी पालकांवरचा बोजा कमी करतांना दिसते आहे. ही पीढी आपले ‘भविष्य’ स्वत:च शोधण्यावर विश्वास ठेवणारी वाटते.
लग्नाबरोबर घटस्फोट हा कधीमधी ऐकू येणारा शब्दही समाजात रुढ होत चालला आहे.
कुणा आकडे-शास्त्रज्ञानं ‘लग्नापेक्षा घटस्फोटाची संख्या’ जास्त असं विचित्र विधान केलं तर आश्चर्य वाटू नये.
लग्नात प्रेम हे सामावलेलं असतं पण प्रेमात लग्न सामावलेले असायला हवंच असा आग्रह नसला की प्रेमभंग असा प्रकार होणार नाही. पण हे सोपं नसावं.
‘प्रेमाचं अंतिम लक्ष लग्नापर्यंत हे सूत्र’ एवढं कोरलं गेलं असल्यामुळे लग्न ह्या क्लिष्ट प्रक्रियेपर्यंत प्रेम पोहचलं नाही की मग प्रेमभंग ठरलेला…
… आणि मग त्यातून स्फुरणारं बरंच काही…
…कविता, गझला, कादंबऱ्या, आणि चित्रपट.
लग्न म्हटलं की उठणारे असे बरेच तरंग.
आपलं लक्ष असावं मात्र ते लग्नाच्या आनंद-तरंगांवरच!
तुम्हाला काय वाटतं ?
— लेखन : डॉ विनायक भावसार. सूरत
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
डॉ विनय भावसार यांचा लेख आवडला.