Thursday, December 25, 2025
Homeलेखलघुकथा : पळवाट

लघुकथा : पळवाट

सारे रस्ते बंद झाले आहेत, असे समजून संकटांनी त्रासलेला एक इसम एका संतश्रेष्ठास शरण गेला. त्याचे रडगाणे ऐकून संतश्रेष्ठाच्या मुखावर करूणा प्रगटली. “लोभ हे दुःखाचे मूळ आहे !” संथ स्वरात संतवाणी झिरपली. त्रस्त इसम अधिकच त्रस्त झाला. “मी लोभी नाही !” तो चिडून तार सप्तकात करवादला, “संतकृपेने हा गुंता सुटला तर मी राहत्या घराचाही लोभ धरणार नाही. कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून मी घर विकून ती रकम संतचरणी धरीन !”

“गुरुजी पैसा, प्रसिद्धी आणि परस्त्री यांच्यापासून दूर असतात !” शिष्याने माहिती दिली.

“त्यांनी स्वतः ती संपत्ती न घेता दानधर्मात वापरावी. पण मी लोभी नाही, हे मी सिद्ध करीनच. अर्थात संतकृपेने संकटमुक्त झालो तर !”

“तू नक्की संकटमुक्त होशील !” संतवाणीत आश्वासन झिरपले. संकटग्रस्त इसमास धीर आला. पण शिष्य नवलाने गुरूकडे बघत राहिला. त्याच्याकडे विजयी दृष्टिक्षेप टाकून गरजू इसम निघून गेला.

संतश्रेष्ठ भोंदू नव्हते. चमत्कार दाखवून महानत्व सिद्ध करण्यात मोठेपणा मानणारेही नव्हते ! पण त्यांच्याकडून खात्रीचा शब्द मिळाल्याने संकटग्रस्त इसम आश्वस्त झाला. तो संकटासमोर दंड थोपटून उभा राहिला. त्याच्या स्वच्छ नजरेस समस्येची उकल दिसू लागली. त्याने प्रयत्नांची कास धरली. हळू हळू संकटाचे ढग विरळ होत गेले. गुंता सुटू लागला.

कालांतराने संकटांच्या ढगांनी व्यापलेले आकाश निरभ्र झाले. निरभ्र आकाशात तळपणाऱ्या सूर्यासारखी त्याची मूळ वृत्ती झळाळली. म्हणजेच त्याच्या लोभी स्वभावातील बेरकीपणाने उचल खाल्ली. संतास दिलेला शब्द पाळला तरी आपल्या समृद्धीत घट होणार नाही, असा मार्ग तो शोधू लागला. स्वभावतः बेरकी इसमास तसा मार्ग सापडलाही. लगेच तो कामाला लागला.

त्याने तातडीने एक मांजर विकत घेतले. मग नगरात मांजराचा लिलाव करण्याची दवंडी पिटवली. मांजर चढ्या भावाने विकत घेणाऱ्यास तो राहते घर एक रुपायात बक्षिस देणार होता. कुतूहलापोटी बरेच लोक जमले. घराच्या किंमतीचा विचार करून ते मांजराची बोली लावू लागले. मनाजोगा व्यवहार करणाऱ्या इसमास त्याने मांजर आणि घराची चावी सुपूर्द केली.

लिलाव बघण्यास आलेल्या बघ्यातून त्याने एक चुणचुणीत इसम हेरला. त्याने त्यास घर एक रुपायात विकले या व्यवहाराचा साक्षीदार होण्याची विनंती केली. त्याने याचे कारण विचारणे स्वाभाविक होते. उत्तर ऐकून त्याने या चातुर्याची तोंडभरून प्रशंसा केली. दोघे संतशिरोमणींच्या आश्रमात गेले. आश्रमाबाहेर शिष्य दिसला. त्यास पाहून संकटमुक्त झालेला इसम म्हणाला, “संतकृपेने मी संकटमुक्त झालो आहे. म्हणून कबूल केल्याप्रमाणे मी घराची किंमत संतचरणी धरण्यास आलो आहे. संतशिरोमणींना तसे सांग !”

त्याच्या मुखावरील उर्मट भाव, दात्याची मानसिकता दर्शवत नव्हते. तरी शिष्य गुरूस निरोप सांगण्यास आत गेला. गुरु-शिष्य परतताच त्या इसमाने एक रुपाया संतचरणी धरला. आता शिष्य घराची किंमत एव्हढीच असण्याबद्दल अविश्वास व्यक्त करील अशी अपेक्षा होती. समर्थनास साक्षीदार तयार होता. पण शिष्य काही बोलण्यापूर्वी शिष्यासाठी संतवाणीतून आदेश झिरपला…

“वत्सा, घर फक्त एका रुपायात विकावे लागावे इतका गरजू आपण आजवर बघितलेला नाही. आपल्या दानपेटीतून एक पावली आण आणि या रुपायावर ठेऊन सव्वा रुपया या गरजूस दान कर !” इतके बोलून संताने शिष्याच्या हातात घराची किंमत म्हणून मिळालेला एक रुपाया ठेवला. त्या बेरकी इसमास सव्वा रुपाया देऊन गुरु-शिष्याने आश्रमात जाण्यास पाठ फिरवली.

स्वतःस चतुर समजणारा लुच्चा माणूस आणि त्याच्या चातुर्यावर अफ्रीन झालेला साक्षीदार तोंड वासून या अनोख्या गुरु-शिष्याच्या पाठमोऱ्या जोडीकडे बघत राहिले. ही जोडी दिसेनाशी झाली. पण पायात मणामणाच्या बेड्या पडल्या असाव्यात असे ते उभ्या जागी खिळून होते.

“छोट्या आशयघन कथा” या आगामी संग्रहातून !

स्मिता भागवत

– लेखिका : स्मिता भागवत. कॅनडा
– संपादक : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800

RELATED ARTICLES

17 COMMENTS

  1. साधुसंतांना पण बेरकी माणसांशी वागताना वेगवेगळी शस्त्र वापरावी लागतात. रोजच्या आयुष्यात सगळ्यांना हा धडा घेण्यासारखा आहे.😊

    • मस्त प्रतिसाद. संतांच्या आसपास सर्व प्रकारचे लोक असणार, हे ते जाणून असणार. त्यामुळे ज्या त्या प्रकारच्या लोकांशी योग्य ते शब्द बोलण्याची प्रतिक्षिप्त क्रिया होत असणार! 😂🙏
      लोका

  2. साधुसंतांना पण बेरकी माणसांशी वागताना वेगवेगळी शस्त्र वापरावी लागतात. रोजच्या आयुष्यात सगळ्यांना हा धडा घेण्यासारखा आहे.

  3. कथा खूपच छान आहे कोणी काही म्हणत असे तरीसुद्धा विश्वास न ठेवता आपली फसवणूक झाली नाही पाहिजे .हे लक्षात ठेवले पाहिजे. आपण आपल्या सत्य मार्ग .धरायला हवा .

  4. संतशिरोमणी खरा, पण ठकास धडा शिकवायला तो त्याच्यासाठी तेवढ्यापुुता महाठक बनला.

    • मला हा अर्थ अवश्य जाणवला. पण कुणालाही संतश्रैष्ठास अनवधानाने माझी मैत्रीण महाठग म्हणाली, असे वाटू नये यासाठी मिश्किल कोपरखळी मारली.🙈😛

  5. मूळस्वभाव जाईंना …
    शब्द पाळणे काय असते ,हे अशा माणसांना कळणे कठिणच!
    म्हणूनच अशा पळवाटा काढून , दुसऱ्याला फसवणारे समाजात दिसतात.
    संतश्रेष्ठ त्यांच्या स्वभावा नुसार वागले ,जे लोभी माणसाला अपेक्षित नव्हते.

    • खरं आहे. कारण माणसास स्वतःसारखे जगच दिसते. लोभी व्यक्तीला कुणी संत असू शकेल यावर विश्वास कसा असणार? मला वाटते की संतशिरोमणींनी बेरकी माणसाचा अहिंसक रीतीने कान धरला. 😂😀

  6. बरा भेटला ठकास महाठक. चांगला धडा शिकवला. Interesting आणि उद्बोधक कथा.

    • छान. पण ठकास भेटला मिश्कील संत असे हवे. कारण संतशिरोमणी भोंदू संधीसाधू संत नाही. खरे ना? 😂😛

  7. अश्या बोध कथा ची नेहेमी गरज असते. आपले पाय जमीनी वर राहतात. तुमच्या कथा संग्रह ची अतुरते ने वाट पाहते. @smita bhagwat, सरळ आणि सोप्या भाषेत लिहिलेले लिखाण मनाला भिडते आणि तुमचा त्यात हातखंडा आहे. छोटी कथा पण अर्थ मोठा. अतिशय आवडली.

  8. अश्या तात्पर्य- कथांची सदैव गरज असते. त्यांतून आपल्याला योग्य तो बोध घेता येतो. स्मिता भागवतांच्या ह्या छोट्या कथेने पुढच्या पिढीची गरज भागविण्याचा हेतू साध्य होईल.

    • अशा आशयगर्भ लघुकथांचे संकलन करण्याचा विचार मनात आला आणि काही कथा लिहिल्याही. पण मग आत्मविश्वास डळमळला आणि काम ठप्प झाले. ही प्रतिक्रिया वाचून आत्मविश्वास तरारला आहे. त्यासाठी विशेष आभार. 🙏

  9. खरं आहे. कुणाला फसवू नये या मूलमंत्रासोबत आपली फसवणूक होऊ देऊ नये, ही शिकवण ही पुढच्या पिढीस द्यायलाच हवी. ❤️🙏

  10. स्मिता, आपण संत नसलो तरी समाजात असे बेरकी लोक आपल्याला पावलोपावली भेटतातच. त्यात नवल नाही. फक्त त्यांना लवकरात लवकर ओळखून त्यंच्याकडे पाठ फिरवून आपण आपल्या सत् मार्गांवर चालावे हे बरे. होय ना?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”